scorecardresearch

क.. कमॉडिटीचा : स्पॉट गोल्ड एक्स्चेंज

सुमारे पाच वर्षांपूर्वी तेव्हाचे अर्थव्यवहार सचिव आणि सध्याचे रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी देशामध्ये ‘स्पॉट गोल्ड एक्स्चेंज’ असावे असे आपले मत व्यक्त केले होते.

श्रीकांत कुवळेकर

सुमारे पाच वर्षांपूर्वी तेव्हाचे अर्थव्यवहार सचिव आणि सध्याचे रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी देशामध्ये ‘स्पॉट गोल्ड एक्स्चेंज’ असावे असे आपले मत व्यक्त केले होते. त्यानंतर सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पात तेव्हाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘स्पॉट गोल्ड एक्स्चेंज’ स्थापण्याची घोषणादेखील केली होती आणि त्यानंतरच्या काळात निती आयोगानेदेखील यावर अभ्यासपूर्ण मत मांडत हे एक्स्चेंज कसे असावे याबद्दल अहवाल बनवून वित्त मंत्रालयाला दिले होते. या कामी ‘वल्र्ड गोल्ड कौन्सिल’ या जागतिक सोने उत्पादकांच्या संघटनेची आणि भारतीय सुवर्ण धोरण केंद्राची मदत घेण्यात आली होती. दुसरीकडे खासगी क्षेत्रात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) आणि एमसीएक्स या वायदे बाजार मंचांकडूनदेखील व्यापारी संघटनांच्या मदतीने ‘बुलियन स्पॉट एक्स्चेंज’ उभारण्यासाठी मोर्चेबांधणी सातत्याने सुरूच राहिली आहे. मुख्य मुद्दा होता या बाजाराचे नियंत्रण कोणाकडे सोपवायचे ते. मग पुढचे काम सोपे होणार होते.

गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ‘सेबी’कडेच ‘स्पॉट गोल्ड एक्स्चेंज’चे नियंत्रण दिल्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यावर असे एक्स्चेंज प्रत्यक्षात येण्याची खात्री वाटू लागली. अखेर अलीकडेच ‘सेबी’ने मुंबई शेअर बाजाराला अर्थात बीएसईला सोन्यामध्ये स्पॉट व्यवहार करण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर असे एक्स्चेंज प्रत्यक्षात येण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे असे म्हटले तरी चालेल. बीएसईने यापूर्वीच महाराष्ट्रातील तीन आणि तमिळनाडूमधील एक अशा चार सराफा उद्योग संस्थांशी या स्पॉट गोल्ड एक्स्चेंजच्या बाबतीत सामंजस्य करार केले आहेत. सुमारे पाच वर्षांहून जास्त काळ चाललेल्या स्पॉट गोल्ड एक्स्चेंजबाबतच्या चर्चाना आता विराम मिळेल. परंतु हे स्पॉट एक्स्चेंज म्हणजे नक्की काय? ते कसे चालेल? त्याचा फायदा कुणाकुणाला आणि कसा? सामान्य गुंतवणूकदारांना त्यात स्थान आहे का? वगैरे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. या लेखामधून त्याबाबतची माहिती प्रयत्न केला आहे.तसे पाहाता स्पॉट गोल्ड एक्स्चेंज या नावामधूनच सूचित होते त्याप्रमाणे, ती सोन्याची व्यापारी उद्देशाने देवाण-घेवाण (खरेदी-विक्री) करण्याची जागा आहे. भारतातील बहुसंख्य लोकांच्या सोन्याबाबतच्या पारंपरिक भावना विचारात घेतल्या तर, सोने हे फक्त विकत घेण्याची कमॉडिटी आहे अशी धारणा असल्याचे दिसून येते. मुळात कमॉडिटी हा शब्दच भारतीय लोकांना निदान सोन्याच्या बाबतीत तरी मान्य नसावा. म्हणूनच भारतातील घराघरांमध्ये आणि देवळांमध्ये २५,००० ते २६,००० टन सोन्याचे साठे अनुत्पादक मालमत्ता म्हणून पडून आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दुर्दैवी असले तरी तो आपल्या लेखाचा विषय नसल्यामुळे आपण चर्चा तूर्त स्पॉट एक्स्चेंजपुरती सीमित ठेवू या.

तसे पाहता या स्तंभातून सोने या विषयावर लिहिल्या गेलेल्या अर्धा डझनाहून अधिक लेखांमध्ये सोन्याकडे पाश्चिमात्य राष्ट्रांप्रमाणे कधी कमॉडिटी तर कधी चलन, तसेच सर्वात जास्त तरल मालमत्ता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भक्कमपणाची मोजपट्टी अशा विविध दृष्टिकोनातून पाहाण्याचे महत्त्व विशद केले गेले आहे. परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक असूनदेखील आजपर्यंत भारताला सोन्याच्या भाव निश्चितीमध्ये (प्राईस डिस्कव्हरी) काडीचे स्थान नाही. याला कारण सोन्याबाबतची आपली पारंपरिक भावनिक दृष्टी. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये माणूस जन्माला येण्यापूर्वीच विविध समारंभांमध्ये सोन्याची देवाण-घेवाण सुरू होते ती माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालते. परंतु हळूहळू का होईना या दृष्टिकोनात निश्चित असा बदल दिसू लागला आहे. स्पॉट एक्स्चेंजच्या निमित्ताने त्याला निश्चित दिशा प्राप्त होईल हे नक्की.

स्पॉट एक्स्चेंजमुळे काय बदल घडतील हे पाहण्यापूर्वी सध्या सराफा बाजारात काय स्थिती आहे हे पाहू या. सोन्याकडे अजूनही देशात प्रचंड काळा पैसा निर्माण करणारा मौल्यवान धातू या रूपातच पाहिले जाते. सराफा बाजार तर कधीच पारदर्शी नव्हता आणि आजही नाही. मैलामैलावर सोन्याची किंमत बदलते. एवढेच नव्हे तर सोन्याची शुद्धता याबद्दल न बोलावे तेवढे बरे. मागील दशकाच्या सुरुवातीला सरकारी सर्वेक्षणातून असे सिद्ध झाले आहे की, २४-कॅरेट म्हणून विकलेल्या सोन्याचे नमुने तपासले असता ते मोठय़ा प्रमाणात १६ कॅरेट ते २२ कॅरेट शुद्धतेचे निघाले. दुकानात सोन्याचे बिस्कीट किंवा नाणे विकत घ्यावे तर भारतीय बनावटीच्या आणि स्वित्र्झलड किंवा ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथून आयात केलेल्या सोन्याच्या किमतीमध्ये १०-१५ टक्के तफावत असते. सोन्यासाठी असलेल्या वायदे बाजारातील सौदे बाजारातील जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी चांगले असले तरी त्याबद्दल असलेल्या एकंदरीत अज्ञानामुळे त्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती आणि अतिश्रीमंत व्यापाऱ्यांखेरीज सामान्य गुंतवणूकदारांना रस असलेला दिसत नाही. यावरून असे दिसते की, येथील सराफा बाजारावर कडक नियंत्रणाबरोबरच ग्राहकांना चांगले सोने देशभर एकाच किमतीमध्ये, तेदेखील शुद्धतेच्या गॅरंटीसह, मिळण्यासाठी एका सशक्त बाजारपेठेची गरज आहे.

शत-प्रतिशत पारदर्शकता

राष्ट्रीय स्तरावरील स्पॉट गोल्ड एक्स्चेंजमध्ये वरील सर्व समस्यांचे समाधान करण्याची ताकद आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असणाऱ्या या स्पॉट एक्स्चेंजचे परिचालन पूर्णत: शेअर बाजाराप्रमाणेच चालेल. म्हणजे सर्व व्यवहार टी १ किंवा २ पद्धतीने सेटल केले जातील. या बाजाराचे अंतिम स्वरूप आणि त्याचे बारकावे अजून पूर्ण स्पष्ट झाले नसले तरी उपलब्ध माहितीनुसार यामध्ये डिमॅट पद्धतीने सोन्याचे इलेक्ट्रॉनिक मंचावर व्यवहार होतील. अगदी शेअर बाजारासारखेच. जो सोने विकणार आहे त्याला आपले अधिसूचित सोने साठवणूकदाराकडे (गोल्ड व्हॉल्ट) द्यावे लागेल. या सोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे डिपॉझिटरी कंपनीच्या मदतीने डिमॅट केले जाऊन सोन्याच्या बदल्यात इलेक्ट्रॉनिक गोल्ड रीसिट (ईजीआर) दिली जाईल. ही रीसिट म्हणजेच ‘ईजीआर’चे व्यवहार स्पॉट एक्स्चेंजवर होतील. ज्याला सोने विकत घ्यायचे असेल त्याने शेअर्सप्रमाणे आपली ऑर्डर देऊन ईजीआर खरेदी केल्यावर दुसऱ्या दिवशी पूर्ण पैसे द्यायचे म्हणजे तिसऱ्या दिवशी डिमॅट खात्यात सोने जमा होईल. ज्याला सोन्याची डिलिव्हरी हवी असेल त्याला तसे सांगावे लागेल आणि त्यानुसार रिमॅटआणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर प्रत्यक्ष सोने ग्राहकाला दिले जाईल. यामध्ये शुद्धतेची गॅरंटी हा सर्वात मोठा फायदा असेल. तसेच हाजिर बाजारात दुकानदार जसे खरेदी ही बाजारभावापेक्षा अधिक दराने करतात किंवा विकत घेताना घट काढून बाजारभावापेक्षा कमी पैसे देतात, अशा गोष्टी स्पॉट गोल्ड एक्स्चेंजवर कालबाह्य होतील. आजपर्यंत अशी पारदर्शक आणि खरेदी-विक्री भावात फरक नसलेली प्रणाली फक्त वायदे बाजारात उपलब्ध आहे. परंतु वर म्हटल्याप्रमाणे ते समजून घेण्यात लोक कमी पडल्यामुळे बाजारातील दुकानांमधून त्यांच्या गळय़ात अनेकदा अधिक भावात कमी प्रतीचे सोनेच पडत आले आहे. हे सर्व स्पॉट एक्स्चेंजमधील ईजीआर ट्रेडिंगमध्ये टाळले जाईल.

याचे लोकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी फायदे आपण वर पाहिले आहेत. परंतु सरकारी स्तरावरदेखील सोन्याचे व्यवहार औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये आल्यामुळे  सरकारला सोन्याच्या व्यवहारांबाबत रीअल-टाइम पद्धतीने माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे देशातील काळय़ा पैशाच्या उगमस्थानावर पूर्ण नियंत्रणदेखील ठेवणे शक्य होईल. सुरुवातीला बीएसईवर ईजीआर व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे. याकरिता एक्स्चेंज स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याऐवजी ‘गोल्ड स्पॉट एक्स्चेंज’ हा वेगळा विभाग काढेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  तर लवकरच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि इंडियन बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) यांच्या भागीदारीतून एक स्वतंत्र स्पॉट गोल्ड एक्स्चेंज उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत. सुरुवातीला केवळ सराफा उद्योगासाठी प्रस्तावित असणाऱ्या एक्स्चेंजवर कालांतराने सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांना सामावून घेतले जाईल. त्यामुळे शेअर बाजाराबरोबरच सोन्याच्या व्यवहारांमध्येदेखील बीएसई आणि एनएसई यांच्यामुळे स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण होऊन ग्राहकांना त्याचा फायदा होईल.

सुरुवातीला लंडनस्थित ‘एलबीएमए’ने (लंडन बुलियन मार्केट असोसिएशन) मान्य केलेल्या शुद्धतेच्या मापदंडाप्रमाणे असलेले म्हणजेच इंटरनॅशनल गोल्ड स्टॅण्डर्ड दर्जाचे सोनेच स्पॉट एक्स्चेंजवर व्यवहारांसाठी उपलब्ध असेल. मात्र कालांतराने इंडियन गोल्ड स्टॅण्डर्डनुसार भारतातील रिफाइनरीजमधून उत्पादन केलेले सोन्याचे बार आणि बिस्किटेदेखील स्पॉट एक्स्चेंजमध्ये उपलब्ध केले जातील.या घडामोडी चालू असताना तिकडे गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’मध्ये इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजदेखील कार्यरत होत आहे. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांऐवजी या उद्योगातील मान्यताप्राप्त देशांतर्गत व्यापाऱ्यांना सोन्याची खरेदी थेट विदेशातून करता येईल. यामुळे सोने आयात अधिक सोपी आणि कमी खर्चाची व अधिक कार्यक्षम पद्धतीने होऊन सरकारसाठीदेखील सोने आयातीबाबतची इत्थंभूत माहिती त्वरित व विनाविलंब उपलब्ध होईल.

थोडक्यात सराफा बाजारात सोन्याच्या व्यवहारांमध्ये अनेक वर्षांपासून येऊ घातलेली क्रांती अखेर उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे. सोन्याच्या बाजारात ग्राहक राजा होण्याच्या दृष्टीने वातावरणनिर्मिती झालेली आहे. आता वाट बघणे आहे ती प्रत्यक्ष गोल्ड स्पॉट एक्स्चेंजच्या चालू होण्याची. सुमारे पाच वर्षांहून जास्त काळ केवळ चर्चा आणि संकल्पनेतच असलेल्या ‘स्पॉट गोल्ड एक्स्चेंज’ लवकरच कार्यान्वित केले जाण्याच्या दिशेने हालचालींनी गती पकडली आहे. हे स्पॉट एक्स्चेंज म्हणजे नक्की काय? ते कसे चालेल? त्याचा फायदा कुणाकुणाला आणि कसा? सामान्य गुंतवणूकदारांना त्यात स्थान आहे का? वगैरे प्रश्न आणि त्याची उत्तरे..

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ग्राहक असूनदेखील आजपर्यंत भारताला सोन्याच्या भाव निश्चितीत (प्राईस डिस्कव्हरी) काडीचे स्थान नाही.

( लेखक वस्तू बाजार विश्लेषक )

ksrikant10@gmail.com

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Commodity gold exchange economy budget national stock exchange trade associations amy

ताज्या बातम्या