श्रीकांत कुवळेकर

शेअर बाजाराप्रमाणेच कमॉडिटी बाजारामध्ये देखील विक्रम संवत्सर या हिंदू कॅलेंडर पद्धतीला खूप महत्व आहे. त्यामुळेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या दोन्ही बाजारांना सुट्टी असली तरी संध्याकाळी तासाभराची एक नवीन संवत्सराचा शुभारंभ साजरा करण्यासाठी मुहूर्ताचे ट्रेडिंग केले जाते. सध्या आपण २०७८ या संवत्सरामध्ये प्रवेश केला असून २०७७ हे वर्ष अनेक बऱ्या वाईट अर्थाने संस्मरणीय ठरले आहे. केवळ बाजाराधिष्ठित विचार केला तरी मागील वर्षांमध्ये कमॉडिटी बाजारामध्ये ज्या प्रमाणावर उलथापालथ किंवा चढ-उतार झाले आहेत ते क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे बाजारातील हा अतिपणा सोडला आणि निव्वळ गुंतवणुकीचे साधन या निकषावर जरी पाहिले तरी कमॉडिटी बाजाराने शेअर बाजाराच्या बरोबरीने, किंबहुना अधिक सातत्याने चांगला परतावा दिला आहे असे दिसेल. 

त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये कमॉडिटी बाजारासंदर्भात असलेली उदासीनता सोडण्याची गरज आहे आणि गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजार ही मानसिकता बदलून कमॉडिटी बाजाराकडे पाहण्याची गरज आहे. सोने, चांदी आणि खनिज तेल म्हणजेच कमॉडिटी बाजार हा समज देखील सोडून इतर अनेक कमॉडिटीज्चा विचार करावा लागेल. ज्याप्रमाणे शेअर बाजारात स्टार्ट-अप, ई-कॉमर्स किंवा झोमॅटो, नजारा आणि पेटीएमसारख्या नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक कल उदयास येताना दिसतो त्याप्रमाणे गेल्या वर्षभरामध्ये कमोडिटी बाजारामध्ये कृषिमाल देखील चांगलाच भाव खाऊन राहिला आहे हे लक्षात येईल. एकंदरीतच करोना काळामध्ये सर्वत्र हाहा:कार उडालेला असताना कृषी क्षेत्र हे एकच असे क्षेत्र होते ज्याने अर्थव्यवस्थेचा तंबू एकहाती सांभाळला होता. त्यामुळेच गुंतवणुकीच्या माध्यमातून देखील या क्षेत्राकडे नव्याने आणि गंभीरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

आज आपण सरलेल्या संवत्सरामध्ये कमोडिटी बाजाराची कामगिरी कशी झाली याचा आढावा घेऊया. त्यातही कुठल्या कृषीमालाने गुंतवणूकदारांना किंवा उत्पादकांना मालामाल केले त्याची माहीती घेऊ .

अकृषी वस्तू बाजारात कच्चे तेल कायमच चर्चेत राहिले आहे. ओपेक या तेल उत्पादक देशांच्या समूहाने रशियासारख्या देशाच्या सहकार्याने तेल उत्पादनात कपात करण्याचे आडमुठे धोरण कायम ठेवल्याने आणि दुसऱ्या बाजूला करोना परिस्थिती सुधारल्याने आर्थिक गतिविधी जोरात सुरू झाल्याने देखील तेलाच्या मागणीतील प्रचंड वाढ यांच्या व्यस्त प्रमाणामुळे तेलाच्या किंमती अनेक वर्षांच्या विक्रमी पातळीवर म्हणजे ८५ डॉलर प्रति-बॅरल पर्यंत पोहोचले. मागील संवत्सराच्या सुरुवातीला साधारण ४५ डॉलरवर असलेल्या तेलातील ही वाढ गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त होती. केवळ संवत्सराचा आणि तेलातील गुंतवणुकीचा विचार करता तेलाने जवळपास ९० टक्कय़ांहून अधिक परतावा दिल्याचे पाहायला मिळेल.

संपूर्ण संवत्सरामध्ये सोन्याने आणि चांदीने मात्र घोर निराशा केली असून सोन्यामध्ये १-३ टक्के एवढा तोटा झालेला दिसून येईल तर चांदी थोडय़ा फार फरकाने मागील वर्षांच्या पातळीवरच फिरत राहिलेले दिसले. अर्थात, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करण्यासाठी या स्तंभामधून यापूर्वीच अनेकदा सांगितले होते. या पाष्टद्धr(२२८र्)ाभूमीवर तांबे गुंतवणूक जवळपास दुप्पट करताना दिसले तर निकेल, जस्त आणि अल्युमिनियम यांनी देखील ४०-५० टक्के असा चांगला परतावा दिल्याचे दिसते.

कृषीवस्तूंच्या किंमती मात्र विक्रमी पातळीवर गेल्यामुळे मागील संवत्सर चांगलेच लक्षात राहील. या वर्षभरात सोयाबीन या कृषी मालाच्या किमतीत झालेली तेजी जवळपास कमॉडिटी मार्केटपासून अलिप्त असलेल्याना देखील लक्षात राहील अशी होती. वर्षांनुवर्षे २,५००-४,५०० रुपयांच्या कक्षेत राहिलेल्या सोयाबीनने मागील वर्षी १०,००० रुपयांची पातळी गाठल्याने ही कमॉडिटी कायम चर्चेत राहिली होती. उत्पादकांना जरी या तेजीचा पूर्ण फायदा झाला नसला तरी गुंतवणूकदारांनी मात्र बऱ्यापैकी पैसे कमावले आहेत. सोयाबीनच्या यशाने थोडी झाकोळली असली तरी सोयाबीन पेक्षा देखील मोहरी या कमॉडिटीने मागील वर्षांत अधिक सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे लक्षात येते. संपूर्ण हंगाम हमीभावाच्या खूप वर राहून विशेष म्हणजे गुंतवणूकदारांबरोबर उत्पादकांना देखील मोहरीने चांगले उत्पन्न दिल्यामुळे ६०-६२ टक्के एवढा परतावा मिळाला आहे. अर्थात सोया तेलदेखील गुंतवणूकदारांसाठी ३०-३५ टक्के एवढा घसघशीत परतावा दिला आहे. सर्वात अनपेक्षित उत्पन्न कापूस या कमॉडिटीने दिला आहे. मागील संवत्सराचा सुरुवातीला १९,०००-१९,५०० रुपये प्रति गाठ असलेल्या कापसाचे भाव वर्ष संपता संपता ३४,००० रुपयांहून अधिक झाले होते. आजही ही तेजी टिकून आहे. गुंतवणुकीच्या परिभाषेत कापसाने दिलेला परतावा ७० टक्कय़ांहून अधिक आहे. वरील सर्व कृषीवस्तू त्याच्या व्यापाराच्या दृष्टीने आणि किंमती देखील जागतिक बाजारांशी जोडलेल्या असल्यामुळे त्यात गुंतवणुकीचा कल अधिक दिसला असला तरी स्थानिक बाजारपेठेमध्ये काही इतरही महत्वाच्या कमॉडिटीज आहेत, ज्यांनी दणदणीत परतावा दिला आहे.

गवार बी आणि गवार गम या सट्टेबाजांच्या आवडीच्या वस्तू असल्या तरी देखील बऱ्याच वर्षांनी यातील गुंतवणूक दाम-दुप्पट परतावा देऊ न गेली आहे, असे दिसून येईल. कच्चे तेल आणि गवार गम यांमध्ये एक सकारात्मक समीकरण आहे. कच्च्या तेलाच्या विशिष्ट प्रकारच्या विहिरी खोदताना त्या प्रक्रियेमध्ये गवार गमचा वापर करण्याची सुरवात २०११ साली सुरु झाली होती. त्यामुळे तेव्हा सव्वा-लाख रुपयांपर्यंत गेलेले गवार गम मागणी घटल्यामुळे  परत ७,०००-८००० रुपयांवर आले होते. मात्र कच्चे तेलाला मागणी वाढल्याने आणि गवार बी चे उत्पादन कमी होणार हे स्पष्ट झाल्यामुळे या कमॉडिटी मध्ये मागील काही महिन्यात जोरदार तेजी आली आणि  ३,७०० रुपयांची गवार बी आज ७,००० रुपयांपार गेली देखील. तसेच कॅस्टर सीड म्हणजे एरंडेल तेल देणाऱ्या या कमॉडिटीने देखील मागील संवत्सरात ३८ टक्के परतावा दिला आहे, तर करोनामध्ये प्रसिद्धीमध्ये आलेल्या हळदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ३२ टक्कय़ांचा फायदा झाला आहे. कापसातील आणि तेलबियांमधील तेजीचा दुहेरी फायदा मिळाल्यामुळे सरकीच्या किंमती वाढल्या. त्याचा फायदा सरकीच्या पेंडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना झाला आहे. मागील वर्षांत सरकी पेंड सुमारे ३५ टक्कय़ांनी वधारले आहे. त्या तुलनेत जिरे आणि धणे मात्र सर्वात कमी तरी देखील २० टक्के परतावा देऊ न राहिल्या आहेत.

वरील गोषवारा हा कृषी मालाच्या किमतींमधील महागाई दर्शवत असला आणि त्यांचा एकंदर अन्न महागाईशी संबंध असला तरी देखील या लेखाकडे निव्वळ गुंतवणुकीच्या कोनातून पाहिल्यास त्यातील सकारात्मकता लक्षात यावी. महागाई हा स्वतंत्र विषय असून संपूर्ण जग महागाईने त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. परंतु या महागाईकडे पाहून बोटे मोडण्याऐवजी त्याच महागाईचा वापर करून आपण त्यावर मात करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास वरील लेख मार्गदर्शक ठरावा.

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

गेल्या वर्षांमध्ये कमॉडिटी बाजारात दिसलेली उलथापालथ क्वचितच पाहायला मिळतात. निव्वळ गुंतवणुकीचे साधन या निकषावर जरी पाहिले तरी कमॉडिटी बाजाराने शेअर बाजाराच्या बरोबरीने, किंबहुना अधिक सातत्याने चांगला परतावा दिला आहे. गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजार ही पाहण्याची दृष्टी २०७७ संवत्सराने मिळवून दिली.