श्रीकांत कुवळेकर

सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांचा हिशेब मांडायचा, तर १०० टक्के परतावा देणारा कापूस आणि ३० टक्क्यांहून जास्त फायदा करून देणाऱ्या सोयाबीन या अनुक्रमे पांढऱ्या आणि पिवळय़ा सोन्यापुढे, खरे सोने यावर्षीदेखील काळवंडले आहे. युक्रेन युद्धामुळे तेजी येऊनही वार्षिक स्तरावर अवघा १५ टक्के परतावा सोन्याने दिला, तर चांदीपासून जेमतेम ३ टक्के परतावा मिळाला आहे.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

कोणी म्हणतं कमोडिटी बाजार लहरी आहे, कोणी म्हणतं  तो अनिश्चिततेच्या भरलेला आहे, तर कोणी म्हणतं हा बाजार अनाकलनीय आहे. खरं तर कोणीच चुकीचं नाही. या बाजाराची तीच तर खासियत आहे. या बाजारात येणाऱ्या उत्पादक, प्रक्रियाधारक, व्यापारी किंवा सट्टेबाज या सर्वासाठी योग्य संधी उपलब्ध होत असतात. फक्त त्या साधण्याची ज्याची त्याची पात्रता असावी. या बाजाराचा हा एवढा परिचय, या सदराच्या माध्यमातून मागील दोन वर्षांमध्ये तो अनेकदा अनुभवासही आला आहे.

आतादेखील २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपून आपण नवीन वर्षांत पदार्पण केले आहे. शेअर आणि चलन बाजाराप्रमाणेच गुंतवणूक या उद्देशाने कमोडिटी बाजारामध्ये भागीदार असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थात्मक गुंतवणूकदार मागील वर्षांच्या परताव्याचा हिशेब करण्यात मग्न आहेत. आपणही या लेखामधून, मागील वर्षांमध्ये कृषी आणि अकृषी कमोडिटीजच्या वायदेबाजारातील गुंतवणुकीवरील परताव्याचा जमाखर्च मांडू या. दुर्दैवाने मागील चार-पाच महिन्यांमध्ये सोयाबीन, चणा, मोहरीसारख्या महत्त्वाच्या कृषीमालाचे वायदेच मुळी महागाईचे कारण देऊन बंद करून टाकले गेले आहेत. त्यामुळे या ताळेबंदामध्ये त्यांच्यावर थोडा अन्याय होईल. परंतु वायदेबाजाराबाहेरील त्यांची किंमत विचारात घेऊन हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

करोनाने गाजवलेल्या २०१९-२० या वर्षांमध्ये  कृषिक्षेत्रात बोलबोला राहिलेल्या सोयाबीन आणि कापसाने मागील वर्षांत परत एकदा बाजी मारली आहे. कापसाच्या बाबतीत तर बाजी मारली म्हणणे थोडे कमीपणाचे वाटावे इतकी मर्दुमकी या पांढऱ्या सोन्याने गाजवली आहे. मागील वर्षांत कापसाने ९९.६ टक्के म्हणजेच जवळपास शंभर टक्क्यांचा परतावा दिला आहे. ज्यांनी कापूस आजपर्यंत विकलेला नाही, आणि अशा शेतकऱ्यांची संख्या खात्रीने आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च आहे, त्यांचे कापसापासूनचे उत्पन्न या वर्षांत दुप्पट झाले आहे. २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये १५,००० रुपये प्रतिगाठीपर्यंत घसरलेला कापूस त्या वर्षांअखेर २१,५००-२२,००० रुपयांवर स्थिरावला होता. त्यानंतर कापसाने मागे वळून पाहिलेच नाही आणि यंदा ३१ मार्चअखेर तो सुमारे ४३,००० रुपयांवर बंद झाला होता. ५,८५० रुपये क्विंटल हमीभाव असलेला कापूस आज १३,५०० रुपयांपर्यंत विकला जात असल्यामुळे त्याने आपले ‘पांढरे सोने’ हे बिरुद शब्दश: खरे करून दाखविले आहे.

डिसेंबरमध्ये वायदे बंदी होण्यापूर्वी ‘पिवळे सोने’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोयाबीननेदेखील ऑगस्टमध्ये १०,००० रुपये प्रति क्विंटल पार जाऊन इतिहास रचला. मात्र त्यानंतर आलेले अनेक निर्बंध आणि नवीन पिकाची आवक झाल्यामुळे सोयाबीनचे भाव मर्यादित स्वरूपात वाढले. तरीही ७,७०० – ७,८०० रुपयांच्या कक्षेत राहून वार्षिक स्तरावर सुमारे ३५ टक्क्यांचा परतावा सोयाबीनने दिला आहे. २०२०-२१ मध्ये सोयाबीन आणि कापूस याला आपण सोने आणि चांदीची उपमा दिली होती. सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांमध्ये मात्र अगदी उलट स्थिती राहिली आहे.

कापूस आणि सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पिके असल्यामुळे तसेच त्यांचे उत्पादन फार मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने या दोन पिकांचा विचार प्रामुख्याने केला आहे. अन्यथा गवार गम हे प्रामुख्याने राजस्थान आणि काही प्रमाणात गुजरातपुरते मर्यादित असलेले पीक मागील वर्षांत १२,००० रुपयांच्या पलीकडे गेल्याने ११२ टक्के परतावा देऊन वार्षिक स्तरावर यादीत प्रथम क्रमांकावर आहे. 

या यादीमध्ये कापूस आणि सोयाबीनपाठोपाठ साधारणपणे ५० टक्क्यांचा परतावा देणाऱ्या धणे, जिरं, आणि एरंडी किंवा कॅस्टर यांचा क्रमांक लागतो. या रब्बी हंगामात धणे आणि जिरं यांच्या उत्पादनात ४०-४५ टक्के घट येण्याच्या अनुमानामुळे या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थाच्या किमती वायदे बाजारात चांगल्याच वाढल्या असून पुढील काळात त्या विक्रम गाठतील अशी अपेक्षा आहे. मक्याच्या किमतीदेखील ४० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. याचा प्रत्यय काही वेळाने या पदार्थाच्या किरकोळ किमती वाढण्यात होईल.

आता अकृषिमालाच्या किमती पाहू. भारतात प्रत्येक जणांकडे काहींना काही प्रमाणात, तर अनेकांकडून मोठय़ा प्रमाणात ज्यात गुंतवणूक होते त्या सोन्याने सतत दुसऱ्या वर्षी निराश केले आहे. युक्रेन युद्धामुळे सोन्यात मागील काही आठवडे तेजी आली असल्यामुळे वार्षिक स्तरावर सुमारे १५ टक्के परतावा सोन्याने दिला असे म्हणता येईल. तर चांदीपासून जेमतेम ३ टक्के परतावा मिळाला आहे. या कारणास्तव एकूण कमोडिटी बाजाराचा विचार करता असे म्हणता येईल की, १०० टक्के परतावा देणारा कापूस आणि ३० टक्क्यांहुन जास्त फायदा करून देणाऱ्या सोयाबीन या अनुक्रमे पांढऱ्या आणि पिवळय़ा सोन्याने खऱ्या सोन्याला यावर्षीदेखील काळवंडले आहे.

अकृषी कमोडिटी बाजारातदेखील अनेक विक्रम केले गेले आहेत. यापैकी नैसर्गिक वायूच्या किमती १२४ टक्के वाढल्या तर निकेल १०० टक्के. तसेच खनिज तेल वार्षिक स्तरावर ७२ टक्के परतावा देऊन गेले असून अल्युमिनियम आणि जस्त ५८ टक्क्यांएवढा घसघशीत परतावा देऊन गेले आहे.

गुंतवणूकदारांच्या दृष्टीने वरील परतावा आकर्षक असला तरी त्यामुळे आलेली महागाई अजूनही किरकोळ बाजारात पूर्णपणे प्रतििबबित झालेली नाही. युक्रेन युद्ध किती लांबेल हे सांगणे कठीण असले तरी ते शेवटच्या टप्प्यात असून दोन्ही देश आता दमले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कमॉडिटी वायदे बाजारदेखील उसंत घेत असून त्यात थोडीशी तरी घसरण येण्याचे संकेत मिळत आहेत. कृषी मालाचा विचार करता भारतासाठी सामान्य मान्सूनचे भाकीत वर्तवले गेल्याने उत्साहाचे वातावरण असले तरी खते, कीटकनाशके, बियाणे तसेच पेट्रोल-डिझेल यांच्या प्रचंड वाढलेल्या किमती यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तर अमेरिका खंडामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे आणि युक्रेन युद्धामुळे भारतीय कृषी मालासाठी पुढील वर्ष आशादायी राहील अशी चिन्हे आहेत.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये. ksrikant10@gmail.com