|| सुधीर जोशी
बाजाराचा बुडबुडा फुटण्याची अनेकांची भाकिते गेले वर्षभर फोल ठरली आहेत. बाजाराच्या नव्या उच्चांकानंतर नवनवीन कारणे शोधून बाजार पडण्याची वाट पाहणारे जवळ रोकड घेऊन बसले आहेत, पण ती दुसरीकडे गुंतविण्याची संधीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे बाजाराच्या थोडक्या घसरणीत खरेदीची लाट येते व बाजार सावरतो.

आधीच्या सप्ताहातील दमदार वाटचालीनंतर गेल्या सप्ताहात बाजारातील व्यवहार मंदावले होते. अमेरिकी बाजाराला सोमवारची ‘लेबर डे’ची सुट्टी व आपल्या बाजाराला शुक्रवारी गणेश चतुर्थीची सुट्टी यामुळे चारच दिवसांचा कारभार झालेल्या बाजारात माध्यमे व ऊर्जा क्षेत्रे सोडली तर सर्वच क्षेत्रात व्यवहार थंडावलेले होते. एफएमसीजी क्षेत्राने सलग सहाव्या आठवड्यात तेजीची वाटचाल केली. निफ्टी व सेन्सेक्स लहानशा चढाईने नव्या शिखरावर स्थिर झाले.

करोनापश्चात साऱ्या जगातच डिजिटायझेशन, तंत्रज्ञानाधारित सेवा यावर सर्व उद्योगांचा भर आहे. त्यात इलेक्ट्रिकल वाहनांचे उत्पादन व मागणी वाढत आहे. त्यामुळे एल अ‍ॅण्ड टी टेक्नॉलॉजी व टाटा एलेक्सीसारख्या कंपन्यांना भरपूर कामे मिळणार आहेत. या दोन्ही समभागांनी गेल्या वर्षात १७० व ३१६ टक्के अशी भरघोस वाढ दिली आहे. एल अ‍ॅण्ड टी टेक्नॉलॉजीला पुढील पाच वर्षात महसुलात दरवर्षी सरासरी १९ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. टाटा एलेक्सीला पुढील वर्षी ३३ टक्के तर त्यानंतर २० टक्के वार्षिक महसूल वाढ अपेक्षित आहे. दोन्ही कंपन्यांचे समभाग विक्रमी पी/ई रेशोवर उलाढाल करीत आहेत. पण त्यांच्या जास्त मूल्याने घाबरून न जाता कधी संधी मिळताच यात गुंतवणूक करणे पुढील एक-दोन वर्षासाठी फायद्याची ठरेल.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी) ही वीज व संबंधित क्षेत्रांच्या विकासासाठी अर्थपुरवठा करणारी वित्तीय संस्था आहे. उद्योगधंद्यांकडून विजेच्या वाढत्या मागणीमुळे व नव्या गुंतवणुकींमुळे कंपनीच्या कर्जवाटपात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कंपनीचा नफ्याचा आलेख मागील वर्षाचा अपवाद वगळता कायम चढता आहे. सरकारी मालकीच्या नवरत्न कंपन्यांपैकी असलेल्या या कंपनीचे जोखीमसापेक्ष बाजारमूल्य आकर्षक आहे. सध्याच्या बाजारभावात कंपनीकडून मिळणाऱ्या डिव्हिडंडद्वारेच १० टक्के परतावा मिळतो आहे. डिव्हिडंडचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक संधी आहे.

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आपल्या व्यवसायात भक्कम पाय रोवलेली कंपनी आहे. जूनअखेर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यावर कंपनीच्या समभागांनी मोठी झेप घेतली होती, पण आता थोड्या नफावसुलीमुळे हा समभाग परत खरेदीच्या टप्प्यात आला आहे. वाहनांच्या विक्रीमधील वाढीने व ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रभावाने कंपनीच्या वाहतूक व्यवसायाला चांगली मागणी येत आहे. पुढील वर्षासाठी कंपनीने २२५ कोटींची भांडवली विस्तार योजना आखली आहे. ज्यामध्ये ८० कोटी नवीन जहाज खरेदीसाठी योजले आहेत. भारतामधील व परदेशी उद्योगवाढीची ही कंपनी थेट लाभार्थी आहे. जीएसटी व ई-वे बिलची अंमलबजावणी या संघटित क्षेत्रातील कंपनीला फायद्याची ठरली आहे.

एसबीआय लाइफच्या शेअर्सने सेन्सेक्सला ३६ टक्क्यांच्या वाढीसह वर्षभराच्या आधारावर मागे टाकले आहे. स्टेट बँकेची एसबीआय लाइफमध्ये ५५.५ टक्के हिस्सेदारी आहे. तिला अर्थातच स्टेट बँक ब्रँडचा फायदा होतो, ज्यात सामान्यत: बँकेच्या सरकारी मालकीमुळे संबंधितांमधे उच्च विश्वासाचा भाग घटक असतो. शिवाय बँकेचे सर्वोत्तम श्रेणीचे वितरण जाळे, वाजवी मूल्यांकन आणि अधिक नफा देणाऱ्या योजनांचा समावेश अशा कारणांमुळे एसबीआय लाइफ विमा क्षेत्रातील वाढीसाठी उत्तम स्थितीत आहे. सध्या करोनामुळे दाव्यांचे प्रमाण वाढले असले तरी नवीन विमा खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे विमा क्षेत्रातील गुंतवणूक दीर्घ मुदतीमध्ये फायद्याची आहे.

बाजाराचा बुडबुडा फुटण्याची अनेकांची भाकिते गेले वर्षभर फोल ठरली आहेत. बाजाराच्या नव्या उच्चांकानंतर नवनवीन कारणे शोधून बाजार पडण्याची वाट पाहणारे जवळ रोकड घेऊन बसले आहेत, पण ती दुसरीकडे गुंतविण्याची संधीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे बाजाराच्या थोडक्या घसरणीत खरेदीची लाट येते व बाजार सावरतो. बाजारातील रोकडसुलभता कमी होत नाही व व्याजदर वाढीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत बाजारातील तेजी टिकून राहील. भारतातील लसीकरणाचा वेग वाढला आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेचे संकट टळो हीच श्रीगणरायाला प्रार्थना करू या.

sudhirjoshi23@gmail.com