|| वसंत कुलकर्णी

क्रेडिट अ‍ॅनालिस्ट हे वर्तमानातील कामगिरीचे मूल्यमापन करून भविष्यात कंपनीवर असलेल्या कर्जाचे हप्ते आणि व्याज वेळेवर देऊ शकेल काय यावरून कंपनीची आजची पत निर्धारित करीत असतो.

क्रेडिट रेटिंग एजन्सी प्रसारमाध्यमात कायम चर्चेत असतात. कधी सरकार देशाच्या पतसुधारणेची आर्जवे करीत असल्या कारणाने तर कधी सरकारच्या एखाद्या धोरणामुळे पत कमी करण्याचा इशारा या एजन्सीज देतात म्हणून त्या चर्चेचा विषय असतात. भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या रेटिंग कंपनी असलेल्या केअर रेटिंग्जमध्ये रेवती कस्तुरे या वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत असून त्या विविध कर्जरोख्यांची पतनिश्चिती करणाऱ्या रेटिंग समितीच्या सदस्य आहेत. केअर रेटिंग एजन्सी दर आठवडय़ाला वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार करत असते. या वेबिनारमध्ये भाग घेणे, काही अपरिहार्य कारणांनी भाग घेणे शक्य नसल्यास प्रसंगी कार्यालयीन साहाय्यकांना या वेबिनारचे ध्वनिमुद्रण करून सोयीने ऐकणे हा कार्यालयीन रिवाज आहे. वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांच्या नेमक्या स्थितीवर केअर रेटिंगचे तज्ज्ञ त्यांची मते या वेबिनारमधून मांडत असतात. गेल्या २५ जानेवारीला लघू आणि मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. रेवती कस्तुरे यांनी या वेबिनारमध्ये सादरीकरण केले. या आधीसुद्धा त्यांचे चार-पाच वेबिनार संगणकाच्या पडद्यावर पाहिले होते. प्रत्येक वेबिनार ऐकल्यावर पुलंच्या एका वाक्याची आठवण येत असे. पुलंच्या ‘इरावती -एक दीपमाळ’ या लेखात, इरावती कर्वे यांच्याबाबत ‘‘जिच्या दाराशी ‘ॐ भवती भिक्षांदेहि’ म्हणून ज्ञानाची माधुकरी मागायला जावे आणि झोळीत पक्वान्नो घेऊन परतावे’’ असे लिहिलेल्या वाक्याची आठवण झाली. या सदर लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधला.

रेवती कस्तुरे यांचे शिक्षण तीन शाळांतून झाले. त्या शालान्त परीक्षा पाल्र्यातील जीबीईएस हायस्कूल या शाळेतून उत्तीर्ण झाल्या. शाळेत असताना कॉमर्स हा एक विषय होता. या विषयामुळे त्यांना वाणिज्य शाखेची ओळख झाली. त्या काळात ज्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे अशा विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेनंतर शास्त्र शाखेत प्रवेश घायचा असा पायंडा होता. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असूनही त्यांनी शालान्त परीक्षेनंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याच्या त्यांच्या निर्णयाला त्यांचे वडील मधुसूधन कोल्हटकर आणि आई प्रतिभा कोल्हटकर यांचा पाठिंबा होता. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या आणि वाणिज्य शाखेसाठी नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेतील सीए ही सर्वोच्च शैक्षणिक पात्रता असल्याने त्यांनी सनदी लेखपालाच्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली. सीए अभ्यासक्रमाचा भाग असलेली आर्टिकलशिप पाल्र्यातील पी. डी. देसाई आणि कंपनी या करविषयक सल्ला देण्यासाठी विख्यात असलेल्या कंपनीतून पूर्ण केली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात पिनाकिन देसाई सरांसारखा मार्गदर्शक लाभल्याबद्दल त्यांनी आठवणीने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सरांच्या मार्गदर्शनामुळे सीए इंटरच्या परीक्षेत त्या २३ व्या आणि फायनलच्या परीक्षेत १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. सीए आर्टिकलशिप दरम्यान त्यांनी लेखापरीक्षण आणि करसल्लाविषयक कामे केली असली तरी पुढील आयुष्यात आपण पूर्ण वेळ ऑडिट आणि टॅक्सविषयक कामे करण्याचा आपला पिंड नाही हे कळल्याने त्यांनी पारंपरिक सीएची कामे करण्याचे टाळले.

दरम्यानच्या काळात १९९१ पासून भारतात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली होती. तरुण सीएसाठी लेखापरीक्षण आणि कर सल्लामसलत ही पारंपरिक सीएची कामे करण्यापेक्षा भांडवली बाजारासंबंधित नोकरी करावी असे त्यांना वाटले. इंटर आणि फायनल ‘रँक होल्डर’ असल्याने ते शक्यही होते. एका रँक होल्डरसाठी नामांकित कंपन्या लाल गालिचा अंथरतात तसा त्यांच्यासाठीही अंथरला होता. नोकरीसाठीच्या मुलाखतीत नंतर निवडही झाली होती, पण लेखापरीक्षण आणि कर यापलीकडे नोकरीत फारसा वाव नव्हता. दरम्यान केअर रेटिंग्जची पत विश्लेषक या पदासाठीची वर्तमानपत्रातील जाहिरात पाहण्यात आली. त्या काळची आयडीबीआयसारखी प्रतिष्ठित संस्था केअरची प्रवर्तक असल्याने काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्या केअर रेटिंगमध्ये दाखल झाल्या. दरम्यान त्यांचा विवाह पराग कस्तुरे यांच्याशी झाला. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात करिअरमध्ये जी वळणे येतात ती त्यांच्या बाबतीतही आली. मुलांच्या संगोपनासाठी नोकरीपासून काही काळ दूर राहावे लागले. या काळात त्या केअरपासून दुरावल्या तरी त्या पदव्युत्तर व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवीत असत. त्यामुळे बँकिंग अँड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस इंडस्ट्रीमध्ये काय घडते आहे याची दखल त्या घेत होत्या. मुले मोठी झाल्यावर त्या पुन्हा केअरमध्ये दाखल झाल्या. त्यांच्या मते, ‘आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रीला आपल्या प्राथमिकता ठरवाव्या लागतात. एकदा त्या प्राथमिकता ठरल्या की त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींना प्राथमिकता द्यायला हवी. एका यशस्वी स्त्रीला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा लागतो. ‘मला माझे आई-वडील प्रतिभा कोल्हटकर आणि मधुसूधन कोल्हटकर तसेच पती पराग कस्तुरे यांचे नेहमीच सहकार्य लाभले.’

एखाद्या समभाग विश्लेषकाच्या मते एखाद्या कंपनीचा समभाग गुंतवणूकयोग्य नसेल, पण त्याच कंपनीच्या रोख्यांत गुंतवणूक करण्यात काहीही वावगे नसेल, कारण समभाग गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा आणि रोखे गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा यात मुळात फरक आहे. त्यांच्या मते समभाग विश्लेषक भविष्यातील कामगिरीचे मूल्यमापन करीत असतो. तर क्रेडिट अ‍ॅनालिस्ट हे वर्तमानातील कामगिरीचे मूल्यमापन करून भविष्यात कंपनीवर असलेल्या कर्जाचे हप्ते आणि व्याज वेळेवर देऊ शकेल काय यावरून कंपनीची आजची पत निर्धारित करीत असतो. त्याने गृहीत धरल्यानुसार नफाक्षमता कमी झाली किंवा कर्जाचा बोजा वाढला तर विद्यमान पत एका पायरीने कमी करण्याची शिफारस रेटिंग कमिटीला करतो.

रेवती कस्तुरे या वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत असल्याने त्यांच्याकडे भारत पेट्रोलियम यासारख्या विशाल कंपन्यांच्या (लार्ज कॉर्पोरेट्स) रोख्यांची पतनिश्चिती करण्याचे काम आहे. क्रेडिट रेटिंग म्हणजे एखाद्या कंपनीच्या गुणात्मक विश्लेषणाचे खुणात्मक प्रतिनिधित्व. जसे की ‘एएए’ (उच्चार ट्रिपल ए) म्हणजे रोख्याची सर्वोच्च पत आणि व्याज आणि मुद्दल परत मिळण्याची खात्री. कुठलीही कंपनी जेव्हा रोखे विकून पैसे उभारते तेव्हा या रोख्यांवर देय व्याज रोख्यांच्या पतनिश्चितीवर ठरते.

या मोठय़ा कंपन्या जेव्हा व्यवसाय विस्तार करतात तेव्हा हा विस्तार सध्याच्या उद्योगाशी संबंधित असेल तर जोखीम कमी असते. थोडक्यात सांगायचे तर फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशन असेल तर कंपनी वेगळ्या पद्धतीच्या जोखमीला सामोरी जात असते आणि व्यवसायात वैविध्य असेल (डायव्हर्सिफिकेशन) तर कंपनी वेगळ्या पद्धतीच्या जोखमीला सामोरी जात असते. व्यवसाय विस्तार कर्ज घेऊन (डेट फंडेड) असेल तर या गोष्टीकडे रोखे विश्लेषक नकारात्मक पद्धतीने बघतो, याकडे त्या लक्ष वेधतात. प्रसंगी व्यवसाय विस्तार कर्ज घेऊन होणार असेल तर कंपनीचे रेटिंग कमी करण्याची शिफारस पतनिश्चिती करणाऱ्या रेटिंग समितीला याआधी त्यांनी केली आहे. अनेकदा रेटिंग समितीत निर्णयावर एकवाक्यता होतेच असे नाही. एकवाक्यता न झाल्यास त्या समितीच्या निर्णयात सहभागी न होण्याची मुभा रेटिंग समिती सदस्याला असते.

भारतात रोखे बाजार बाल्यावस्थेत आहे. बँकांची कर्जे हा आजही सर्वात व्यवसायासाठी मोठा आर्थिक स्रोत आहे. सध्या रोखे बाजार ‘ट्रिपल ए’ आणि ‘डबल ए’पर्यंतच मर्यादित आहे. साहजिकच जे कोणी क्रेडिट अ‍ॅनालिस्ट किंवा रेटिंग अ‍ॅनालिस्ट म्हणून करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी हे क्षेत्र अमर्याद संधी असलेले क्षेत्र आहे.

अन्य देशात मूडीज, फिच रेटिंग्ज किंवा एस अँड पी यांच्यात स्पर्धा असते. भारतात हे चित्र वेगळे दिसते. भारतात क्रिसिल (एस अँड पी प्रवर्तित कंपनी) नंतर केअर रेटिंग्ज ही अस्सल भारतीय कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे याचा त्यांना अभिमान आहे.

shreeyachebaba@gmail.com