scorecardresearch

क्रिप्टो : कल्पनारम्य जगाला वास्तवाचा दणका

जवळपास तीन वर्षांपूर्वी भारतातील ज्या आर्थिकदृष्टय़ा अर्धशिक्षित आणि छोटय़ा गुंतवणूकदारांचा क्रिप्टो करन्सी अर्थात कूटचलनामधील ‘भव्य’ संधी पाहून आनंद गगनांत मावत नव्हता,

क्रिप्टो : कल्पनारम्य जगाला वास्तवाचा दणका

आशुतोष बिश्नोई

जवळपास तीन वर्षांपूर्वी भारतातील ज्या आर्थिकदृष्टय़ा अर्धशिक्षित आणि छोटय़ा गुंतवणूकदारांचा क्रिप्टो करन्सी अर्थात कूटचलनामधील ‘भव्य’ संधी पाहून आनंद गगनांत मावत नव्हता, तेच उत्साही गुंतवणूकदार आता संकटात सापडले आहेत. हे घडणे अपरिहार्यच होते आणि ते तेव्हाच सूचितही केले गेले होते. देशभरातील आर्थिक मध्यस्थांच्या साहाय्याने मी स्वत: एक विशेष व्यक्तिगत मोहीम तेव्हा राबविली होती. क्रिप्टोसारख्या अस्तित्वहीन (आभासी) मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याच्या जोखमींबद्दल सावध करणारी ती मोहीम होती.

क्रिप्टोच्या प्रभावशाली तांत्रिक आणि जडजंबाळ संज्ञावलीचा मुखवटा सोडला तर गुंतवणूकदारांनी गाभ्यात डोकावून पाहावे आणि अजमावावे असे काहीही नाही, हे उघडउघड दिसत असूनही त्याकडे डोळेझाक सुरू होती. मात्र चिंतेची ही मुख्य बाब नव्हतीच. चिंतेची गोष्ट हीच की, ज्या आशावान गुंतवणूकदारांनी बोली लावली किंवा मोठय़ा विश्वासाने पैसा गुंतविणाऱ्यांची त्यामागे काही तरी स्वप्नं वा उद्दिष्टं असतीलच आणि पैसेच गमावले गेल्यावर त्या स्वप्न-उद्दिष्टांच्या पूर्ततेचे काय? माझा युक्तिवाद अगदी सोपा आहे. क्रिप्टो अथवा कूटचलन ही एक अशी प्रणाली आहे जी देशाच्या सीमा ओलांडून मोठय़ा प्रमाणात पैशाच्या हस्तांतरणाची कुठल्याही आडकाठीविना मुभा मिळवून देते. शिवाय, हे पूर्णपणे बेनामी पद्धतीने आणि कोणालाही मागमूस न लागता घडून येते. मग प्रश्न उपस्थित होतो, अशा सुविधेची गरज कुणाला पडते? कोणताही कायदेशीर व्यावसायिक उपक्रम तरी अशा भानगडीत पडणार नाही हे स्वाभाविकच. म्हणूनच अशा बेकायदेशीर उपक्रमांत सह-गुंतवणुकीने सामील असणाऱ्या छोटय़ा गुंतवणूकदारांना उशिरा का होईना मोठा दणका बसणारच होता.

भारत सरकारकडूनही याची दखल घेतली गेली. पण केवळ एका देशाच्या सरकारने कूटचलन बेकायदेशीर घोषित केल्याने त्या देशातील छोटय़ा गुंतवणूकदारांनाच याचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. कदाचित याच कारणाने सरकारने बेकायदेशीर उद्योग आणि धारकांना शिक्षा म्हणून क्रिप्टो मालमत्तेवर कमावलेल्या नफ्यावर कर लावण्याचा निर्णय घेतला. अर्थात ही चालही योग्यच ठरली. क्रिप्टो व्यवस्थेतील वर म्हटल्याप्रमाणे अंगभूत काळे व्यवहार आणि मनी लाँड्रिंगची प्रकरणे सर्वत्र वाढत आहेत आणि तपास यंत्रणांकडून अशा भल्या मोठय़ा प्रकरणांसंबंधाने झाडाझडती सुरूच आहे. स्वागतार्ह बाब म्हणजे यातून छोटय़ा गुंतवणूकदारांना क्रिप्टोपासून सावध केले गेले आणि ते नव्याने भरीस पडणार नाही, हे पाहिले गेले.
शेकडो कोटींपासून हजारो कोटींपर्यंत मनी लाँड्रिंगची प्रकरणे समोर येत आहेत. खऱ्या संख्येचा अंदाज लावणे कठीण आहे. पण सर्वाना माहीत आहे की ही संख्या खूप मोठी आहे आणि अशा ‘बेकायदेशीर गुंतवणूकदारां’सोबत राहिल्याने लहान गुंतवणूकदारही मनस्ताप व त्रास ओढवून घेतात.
प्रश्न आहे तो हा की, क्रिप्टोसारख्या पर्यायी चलनाची वास्तविक गरज काय?

गेल्या १४-१५ वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत सार्वभौम चलनांचा (नोटा छपाईमुळे) पुरवठा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे हे लक्षात घेऊन जगातील सर्व मोठय़ा गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तीव्र घट होणार ही शक्यता जवळपास गृहीत धरली आहे. कारण सर्वत्र मध्यवर्ती बँकांनी प्रथम पैसा ओतला आणि आता महागाईला लगाम घालण्यासाठी ओतलेले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा पैशाचा संकोच जसजसा वाढत चालला आहे, तसतसे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला ते हादरे देत आहे. अशा काळात, गुंतवणूकदार वैकल्पिक पर्यायांचा शोध घेतात आणि बाह्य परिणामांपासून अलिप्त ठिकाणी त्यांची गुंतवणूक सुरक्षित राखण्याकडे त्यांचा कल असतो. भूतकाळात, सार्वत्रिक जागतिक पर्यायी चलन म्हणून सोन्याचे स्थान होते. सोने हे शाश्वत आहे आणि उत्पादन सीमित असल्याने ते महाग बनले आहे. त्या उलट क्रिप्टोचा पर्याय त्यांना तुलनेने जवळचा वाटू लागला आहे, कारण दुसरी नवीन क्रिप्टो नाममुद्रा तयार करण्यासाठी वास्तविक कोणत्याही खर्चाची आवश्यकता नाही.

साहजिकच वर उल्लेख आलेल्या सर्व हवालदिल गुंतवणूकदारांनी क्रिप्टोलाच केवळ निवडले नाही, तर अनेकांनी सोन्याची साथ कायम ठेवली आहे. गातील सर्व मध्यवर्ती बँकांनी मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केली आहे, यातूनदेखील सोन्यामध्ये वाढ झाली आहे, परंतु खरे कारण हे नाही. सोन्यातील बरीचशी तरलता क्रिप्टोने बव्हंशी शोषून घेतली आहे. शिवाय, क्रिप्टोने आर्थिक गैरव्यवहाराच्या काळय़ा व्यवस्थेला अशा अनेक सोयीसुविधा मिळवून दिल्या आहेत ज्या सोन्यात शक्य नाहीत. पण आता या मंडळींना पहिल्यांदाच, क्रिप्टोतील अस्थिरता आणि दुसरे म्हणजे ते नियामक संस्थांच्या रडारखाली येणे अशी दुहेरी डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. कोणताही देश अथवा सार्वभौम व्यवस्था नोटा छापण्याचा त्यांचा अधिकार कधीही सोडणार नाहीत आणि १० हजार वर्षांपासून सोने हे मानवजातीचे एकमेव वैश्विक चलन आहे आणि या मौल्यवान धातूद्वारेही हा दावा सोडला जाणार नाही. त्यामुळे शक्यता हीच की, क्रिप्टोची मोहिनी हळूहळू कमी होत ओसरत जाईल.

आता चलन युद्ध होणे अटळ आहे. स्पष्टपणे अमेरिकी डॉलरचे जागतिक व्यापारावर वर्चस्व कायम राहणार आणि दुसरीकडे संदिग्धता हेच मोठे भांडवल असणारे क्रिप्टो आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम सोडणार नाही, तर सोन्याची लकाकीही इतक्यात लोपण्याची शक्यता नाही. एकाच वेळी या तीन फिरत्या बोटींमध्ये अवघड संतुलन साधत प्रवासाचा प्रयत्न केला, तर प्रसंगी मोठी किंमत मोजावी लागण्याची जोखीमही आहे. आधुनिक जगाच्या इतिहासात प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा सोन्याव्यतिरिक्त इतर सार्वभौम चलनांत मूल्य ऱ्हास झाला, तेव्हा पुन्हा सोन्यावर अवलंबून राहणे अनिवार्य झाले आहे. सोन्यासारख्या सार्वत्रिक मालमत्तेची गरज आज म्हणूनच कधी नव्हे इतकी वाढली आहे आणि युद्धाची तीव्रता वाढली किंवा कमी झाली तरी क्रिप्टोचेजहाज बुडतानाच दिसत आहे. तूर्त फक्त प्रतीक्षा करावी लागेल आणि मुक्त जगातील सर्व सार्वभौम नेत्यांकडे निर्णायक ‘शहाणपण’ आहेच.

(लेखक वित्तीय सेवा क्षेत्रात दीर्घ कारकीर्द राहिलेले अनुभवी व्यावसायिक आणि गुंतवणूक विशेषज्ज्ञ)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या