आशीष ठाकूर

चीनमधील बांधकाम क्षेत्रातील बलाढय़ कंपनी एव्हरग्रांड ही दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर, तर अमेरिकन भांडवली बाजारात डाऊ जोन्स निर्देशांकात सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात जवळपास दोन हजार अंशांची घसरण झाली होती. हे पाहून आशियाई भांडवली बाजार देखील या घसरणीत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ करत ‘ऑल फेल डाऊन’सारखी परिस्थिती सभोवताली होती. असे असताना, म्हणजेच या सर्व अनिश्चिततेत खरे तर भारतीय भांडवली बाजार कोसळून पडायला हवा होता. पण तसे काही न होता, या स्तंभातील आधीच्या लेखांमध्ये नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकाची ३०० अंशांच्या परिघातील परिक्रमा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू राहिली. जसे की.. निफ्टी निर्देशांकावर १७,५०० मध्ये ३०० अंश मिळवले असता १७ सप्टेंबरचा १७,७९२ चा उच्चांक तर १७,८०० मधून ३०० अंश उणे करता २१ सप्टेंबरचा १७,५६२ चा बंद भाव दिसून आला.  अशा रीतीने वाचकांसाठी विकसित केलेली निफ्टीवरील ३०० अंशांचा परीघ या अस्थिर काळात देखील, काळाच्या कसोटीवर खरा उतरत या आर्थिक हादऱ्यांमध्ये गुंतवणूकदारांना अनिश्चिततेत देखील निश्चिंतता देऊन जात होता. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या. 

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ६०,०४८.४७

निफ्टी : १७,८५३.२०

भविष्यात एखाद्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय निराशाजनक घटनेमुळे निफ्टी निर्देशांकावर घसरण संभवल्यास, त्या  अनिश्चिततेत देखील निफ्टी निर्देशांक १७,२०० चा स्तर राखत असल्यास या सर्व निराशाजनक घटना म्हणजे केवळ ‘चहाच्या पेल्यातील वादळ’ असेच हे गृहीत धरले जायला हवे. हा स्तर निफ्टीसाठी अतीव महत्त्वाचाच.  

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात आंतरराष्ट्रीय भांडवली बाजार कोसळत असताना निफ्टी निर्देशांकाने १७,२०० चा स्तर राखत त्याचे महत्त्व आपल्या कृतीतून सिद्धही केले आहे. ही कृती सर्व गुंतवणूकदारांसाठी फार मोठी दिलासादायक आहे.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १७,२०० चा भरभक्कम आधार गृहीत धरल्यास, निफ्टी निर्देशांकावरच्या भविष्यकालीन उच्चांक रेखाटण्यासाठी पुन्हा आपण निफ्टी निर्देशांकाच्या ३०० अंशांच्या परिघाचा (बँण्डचा)आधार घेऊ या. आताच्या घडीला १७,२०० अधिक ३०० अंश १७,५००.. पुढे १७,८००.. १८,१००.. १८,४०० अशी ही परिक्रमा असेल.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाच्या १७,९४७ च्या ऐतिहासिक उच्चांकावरून घसरण झाल्यास व या घसरणीत १७,५०० चा स्तर राखला गेल्यास,या पडझडीला नफारूपी विक्री मानले जावे. याचा अर्थ या घसरणीमुळे तेजीच्या धारणेला कुठेही धक्का पोहचणार नाही. पण जर का निफ्टी निर्देशांक सातत्याने १७,५०० च्या खाली टिकत असल्यास व त्या दरम्यान निफ्टी निर्देशांकाच्या आलेखाची रचना १७,५०० ते १७,२०० मध्ये उतरत्या भाजणीतील उच्चांक आणि नीचांक (लोअर टॉप, लोअर बॉटम) स्वरूपातील असल्यास आणि एखाद्या आर्थिक हादऱ्यामध्ये निफ्टी निर्देशांक १७,२०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास, गुंतवणूकदारांनी मंदीची आर्थिक, मानसिक तयारी देखील ठेवावी. 

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची

सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी सेन्सेक्सने ६०,३३३ आणि निफ्टी निर्देशांकाने १७,९४७ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला. आताच्या घडीला नितांत सुंदर तेजी चालू असल्याने, निकालपूर्व विश्लेषणात नमूद केलेल्या समभागाचा बाजारभाव, प्रत्यक्ष आर्थिक निकाल उत्कृष्ट आल्यानंतर नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य केले जाणे स्वाभाविकच. किंबहुना वरच्या लक्ष्यापलीकडे तो वारेमाप वाढला तर बिघडलं कुठे? ‘बुरा न मानो भाई तेजी है’ अशी आपल्यापैकी अनेकांची धारणा झाली असणार. पण नाही,या ‘स्थितप्रज्ञ कंपन्या’ तेजीने हुरळून जात नाहीत किंवा मंदीने त्या खचूनही जात नसतात. अशा कंपन्यांच्या समभागावर ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना अचूकपणे,काळाच्या कसोटीवर उतरत असते आणि हे या संकल्पनेचे यश समजायला हरकत नाही.

अरविंद मफतलाल उद्योगसमूह म्हटला की झटकन ‘नोसिल’ कंपनी डोळ्यांसमोर येते. नोसिलचे निकालपूर्व विश्लेषण या स्तंभातील २ ऑगस्टच्या लेखात केले होते. ३० जुलैचा बंद भाव २६१ रुपये होता, तर निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा २५० रुपये होता. प्रत्यक्ष निकाल चांगला, बाजाराची अपेक्षापूर्ती करणारा असल्यास नोसिलचे वरचे लक्ष्य हे ३१० रुपये असेल असे नमूद केलेले. प्रत्यक्ष निकाल हा अतिशय चांगला आल्याने लेखात नमूद केलेले ३१० रुपयांचे वरचे लक्ष्य १६ सप्टेंबरला ३१३ चा उच्चांक मारत साध्य केले गेले. निकालापश्चात नोसिलने आपला महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २५० रुपये राखला असल्याने दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना निश्चिंतता मिळाली तर अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना १८ टक्कय़ांचा परतावा मिळाला. आजही नोसिल २५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत शुक्रवार, २४ सप्टेंबरचा त्याचा बंद भाव २८८ रुपये आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.