फंडाचा  ‘फंडा’.. : विजेत्यांकडून घ्यायचे धडे

आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आपल्याला अनेक ऑलिम्पिकमधून धडे शिकण्यासारखे आहेत. 

भालचंद्र जोशी bhalchandra.joshi@whiteoakindia.com
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला भालाफेकीतील सुवर्णपदक प्रदान केल्यानंतर वाजवल्या गेलेल्या भारतीय राष्ट्रगीताची ध्वनिचित्रफीत पाहताना भारतीय असल्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटला असेल. केवळ नीरज चोप्राच नव्हे तर अन्य भारतीय विजेत्या खेळाडूंची कामगिरी पाहून तुमच्या हर्षांला पारावार उरला नसेल. मोठी स्वप्न पाहणे, या स्वप्नपूर्तीसाठी नियोजन करणे, दृढनिश्चय करणे, कठोर परिश्रम करणे आणि हार न मानता येणाऱ्या अडचणींवर मात करत ध्येय गाठणे असे अनेक जीवनातील धडे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धा आपल्याला शिकवते. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आपल्याला अनेक ऑलिम्पिकमधून धडे शिकण्यासारखे आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकच्या पदक तालिकेवर भारताच्या वतीने पहिल्या पदकाची कमाई मीराबाई चानूने केली, परंतु रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू तिच्या तीन प्रयत्नांमध्ये वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्यासाठी ही मोठी निराशा होती, पण तिने स्वत:च्या क्षमतांचे आकलन केले. ज्यामुळे तिला समजले की, ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी ती करीत असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. यामुळे तिने तिच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये बदल केला आणि २०२१ मध्ये तिने रौप्यपदक मिळविले. वित्तीय ध्येय साध्य करण्यास पोर्टफोलिओचा आढावा फार महत्त्वाचा असतो. बदलत्या बाजार परिस्थितीनुसार नियमित आढावा घेत मालमत्ता संतुलित करणे म्हणजेच कधीही कमकुवतपणावर मात करता येते या जिद्दीने होणारे प्रयत्न. तुमच्याकडे सध्या किती उपलब्ध रोकड आणि मालमत्ता आहे, तुमचे खर्च जाता किती शिल्लक राहते, तुमच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करण्याची पद्धत हीच असायला हवी.

ऑलिम्पिक पदक विजेते वर्षांनुवर्ष अविरत कष्ट करून, दीर्घकालीन ध्येयाचा पाठपुरावा करीत असतात. रवीकुमार दहियाचा टोक्योमधील रौप्य पदकापर्यंतचा प्रवास हे त्याचे एक उदाहरण आहे. कुस्तीच्या २०१५ मधील ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकल्यावर तो जागतिक स्तरावर पोहोचला. त्यानंतर त्याने २०१८ च्या २३ वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. २०१९ मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य जिंकल्यानंतर तो टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. गुंतवणुकीतील अस्थिरतेचा सामना करताना संयमाची आवश्यकता असते. बाजार आणि अस्थिरता या नाण्याच्या दोन बाजू आहेत. संयमाने अस्थिरतेवर मात करत  ध्येयाची पूर्ती करता येते.

शक्य तितक्या लवकर प्रारंभ करा : पी. व्ही. सिंधूने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि पुलेला गोपीचंदच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाली. तिने देशपातळीवरील स्पर्धेत एकेरीचे जेतेपद जिंकले. सिंधूने १० वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद पटकावले तेव्हा उभरती खेळाडू म्हणून तिने अनेकांचे लक्ष वेधले. मोठय़ा स्पर्धा जिंकण्यापूर्वी तिने लहान वयातच खेळायला सुरुवात करण्यामुळे खेळाचा पाया भक्कम तयार झाला होता. वित्तीय ध्येय साध्य करायचे असेल तर योग्य वेळेची वाट न पाहता जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल तितकी अधिक रक्कम हातात येईल. उदाहरण सांगायचे तर एखाद्या गुंतवणूकदाराने मासिक १,००० रुपयांच्या ‘एसआयपी’ला एका फंडात १ ऑगस्ट २००१ पासून सुरुवात केल्यास त्याला २०.०४ लाख रुपये मिळाले. पाच वर्षे उशिरा म्हणजे १ ऑगस्ट २००६ रोजी सुरुवात केली तर ५.२८ लाख रुपये मिळाले आणि १ ऑगस्ट २०११ रोजी सुरुवात केली तर २.४५ लाख रुपये मिळाले असते. एसआयपीला जितकी लवकर सुरुवात करावी तितकी अधिक रक्कम जमा होते.

लवकर सुरू केलेली गुंतवणूक तुम्हाला गुंतवणूक आणि बचत यातला फरक करायला शिकवते. लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली तर अधिक जोखमीच्या साधनांत गुंतवणूक करून परताव्याचा दर वाढविता येतो. जर तुम्ही लवकर गुंतवणुकीला सुरुवात केल्यास संभाव्य तोटा भरून काढण्यासाठी वेळ मिळतो. एखाद्या गुंतवणूकदाराने आयुष्याच्या उत्तरार्धात एसआयपी गुंतवणुकीला सुरुवात केल्यास जोखीम क्षमता कमी झालेली असते. चुका सुधारण्यास कमी वेळ उपलब्ध असतो. त्याउलट लवकर गुंतवणुकीसह, आपल्या गुंतवणुकीला मूल्य वाढण्यास अधिक वेळ मिळतो.

अमेरिकन धावपटू अ‍ॅलिसन फेलिक्सने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ११ वे ऑलिम्पिक पदक जिंकले. हे पदक जिंकल्यावर तिने प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘‘तुमच्या दीर्घकालीन ध्येयाचे तीन किंवा चार ध्येयांत विभागणी करा. ही उद्दिष्टे साध्य करण्याचा कालावधी निश्चित करा. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, याचा माग घेत राहा.’’ आपल्या आर्थिक नियोजनाचा विचार करता हे उद्गार खूप विचार करावयास लावणारे आहेत. दीर्घकालीन उद्दिष्टाचे नजीकच्या काळासाठी, मध्यम काळासाठी आणि दीर्घकाळासाठी अशा तीन उद्दिष्टांत विभाजन आणि त्यानुसार उपलब्ध स्रोतांची विभागणी करणे आणि त्या पूर्ण कालावधीसाठी अवलोकन केल्याने एखाद्याची निर्धारित ध्येयाची पूर्तता करण्याची शक्यता वाढते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूने अनुभवी मार्गदर्शकाचा सल्ला घेतला आणि त्या सल्ल्यानुसार आहार आणि प्रशिक्षणानुसार सराव केला. खेळाडूंकडे त्यांना साहाय्य करणाऱ्या मार्गदर्शकांव्यतिरिक्त आहारतज्ज्ञ, फिजिओ, रणनीतीकार आणि इतर व्यावसायिकांचा समूह कार्यरत असतो. एक आर्थिक सल्लागार तुमच्या आर्थिक बाबींचा एक समग्र दृष्टिकोनातून विचार करीत असतो आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करत असतो. तेव्हा योग्य एमएफडी किंवा आरआयएची निवड ही यशाची पहिली पायरी आहे.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Expert advice for financial planning important of financial planning zws

ताज्या बातम्या