निवृत्तीनंतरचे आयुष्य मानसिक तणाव आणि विवशतामुक्त असावे, अशी धारणा असेल तर सखोल अभ्यास करून, विचारांती बनविलेला आणि काटेकोरपणे पाठपुरावा केलेला पेन्शन प्लॅन हा बाजारातील रेडीमेड प्लॅनपेक्षा उजवाच ठरतो.
मागील भागात आपण विमा कंपन्यांच्या पेन्शन स्कीम्सचा परामर्ष घेतला होता आणि आपल्या लक्षात आले होते की, या स्कीममध्ये ‘नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा’ असला प्रकार आहे. आता स्वत:साठीची पेन्शन स्कीम स्वत:च कशी तयार करायची त्या दृष्टीने विचार करू या.
आयुष्यात काहीही साध्य करायचे असेल तर त्यासाठी काही मूलभूत नियम आहेत. गुंतवणूकही त्याला अपवाद नाही. त्या नियमांचे पालन केले तर हमखास यश प्राप्त होते. आर्थिक बाजारातील माझ्या २५ वर्षांच्या अनुभवावरून एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो की, गुंतवणुकीच्या बाबतीत निर्णय घेणे या प्रक्रियेपेक्षा चुकीचा निर्णय न घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. कित्येक गुंतवणूकदार निर्णय घेतात आणि त्याचे काटेकोरपणे पालन करतात; परंतु मुळात त्यांनी घेतलेले निर्णयच चुकीचे असतात आणि त्याचे परिणाम लक्षात येईपर्यंत वेळ गेलेली असते.
उचित निर्णय घेण्यासाठी खालील मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे :
१) पैशाची आवक : एकमेव कमाईवर (नोकरी किंवा व्यवसायातील आवक) अवलंबून राहू नये. पैशाचा दुसरा स्रोत चालू करण्याचा प्रयत्न करावा. अंतर्मुख होऊन विचार केला तर मार्ग सापडू शकतो.
२) खर्च : प्रत्येकाकडून अनाठायी खर्च हा होतच असतो. गरज आणि आवड किंवा शौक यामधील फरक समजून घेतला तर खर्चात बऱ्याच प्रमाणावर कपात करता येते. वाचवलेला प्रत्येक रुपया हा कमाईइतकाच महत्त्वाचा आहे.
३) बचत : पूर्वी बचत म्हणजे कमाई वजा खर्च असे समीकरण होते. आता काळ बदलला आहे आणि त्यानुसार बचतीचा प्रथम विचार करून खर्चावर बंधन घालणे हे जरुरी आहे. त्यामुळे नवीन समीकरण आहे- कमाई – बचत = खर्च.
४) जोखीम : असे म्हणतात की ‘नदीचा तळ दोन्ही पायांनी चाचपडायचा नसतो’. आर्थिक क्षेत्रातील धोका पत्करायच्या पद्धतीला हाच नियम लागू पडतो. जोखीम (रिस्क) आणि पूर्वनियोजित जोखीम (कॅल्क्युलेटेड रिस्क) यामधील सीमारेषा अतिशय अंधूक असते. पूर्वनियोजित जोखीम ही भविष्यातील परिणामांचा सापेक्षपणे आणि विचारपूर्वक अभ्यास करून घेतलेली असते. कोणीतरी छातीठोकपणे एखादा सल्ला देतो आणि आपण त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून त्वरित निर्णय घेतो आणि गुंतवणूक करतो. ही झाली जोखीम आणि त्याबाबतीत अभ्यास करून किंवा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन निर्णय घेतो, ही झाली पूर्वनियोजित जोखीम.
५) गुंतवणूक : नियमावरतीच बोट ठेवायचे झाले तर ‘सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नयेत’ हे झाले गुंतवणुकीचे मूलभूत सूत्र. मी याच्याशी सहमत नाही. जर बास्केट पुरेशी भक्कम आहे याची खात्री असेल तर त्यात सगळी अंडी ठेवण्यास हरकत नाही. गुंतवणुकीचा आणखी एक नियम (थम्ब रूल) आहे, ‘१०० वजा आपले वय या प्रमाणात शेअर बाजारातील गुंतवणूक असावी’. म्हणजे २५ वर्षांच्या व्यक्तीची ७५ टक्के गुंतवणूक शेअर्स या पर्यायात असावी आणि २५ टक्के ठोस परताव्याच्या गुंतवणुकीमध्ये असावी. या नियमाशीही मी सहमत नाही. वयाच्या पंचविशीला जेव्हा पुढील ३५ वर्षे कमाईची असणार आहेत आणि त्या काळामध्ये शेअर बाजाराची कमीत कमी ३ ते ४ तेजी-मंदीची पर्व असणार आहेत अशा परिस्थितीत मी माझी २५ टक्के गुंतवणूक भाववाढीपेक्षा कमी परतावा देणाऱ्या पर्यायामध्ये करून माझ्या मालमत्तेला थोडय़ाफार प्रमाणात का होईना वाळवी लावण्याची गरजच काय?
६) अपेक्षा : आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आपल्या खूप काही अपेक्षा असतात- ‘माझ्या गुंतवणुकीने मला जास्तीत जास्त परतावा द्यावा’, ‘माझ्या एजंटने माझ्या पूर्ण गुंतवणुकीची जबाबदारी घ्यावी’, ‘गुंतवणूक सल्लागाराने मला उत्तमोत्तम सल्ला द्यावा; परंतु कमी फी आकारावी’, ‘अनावधानाने किंवा जाणूनबुजून मी काही माहिती लपवून ठेवली तरी विमा कंपनीने माझ्यानंतर नामनिर्देशकाला संपूर्ण रक्कम द्यावी’.
प्रत्यक्षात सर्वच गोष्टी आपल्या अपेक्षेनुसार होतातच असे नाही. वाजवी अपेक्षा ठेवल्या आणि गुंतवणुकीमध्ये स्वत: जातीने लक्ष घातले तर यशस्वीरीत्या गुंतवणूक करता येते.
गुंतवणुकीबाबतचा प्रत्येक निर्णय या सहा कसोटय़ांना उतरला तर निवृत्तीनंतरच्या काळासाठी तयार करायची गंगाजळी सहजपणे तयार होऊ शकते. यामध्ये शॉर्टकट नाही आणि आळशीपणाला किंवा बेपर्वाईला थारा नाही. त्यामुळे चुका होण्याची शक्यता वाढते. लहानपणी आपण पेन्सिलने लिहितो आणि मोठेपणी पेन वापरतो. का? बालपणीच्या चुका खोडता येतात, मोठेपणीच्या नाही.
सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी जास्तीतजास्त परतावा देणारा पर्याय म्हणजे शेअर बाजार; परंतु नवशिक्यांसाठी या पर्यायामध्ये थेट गुंतवणूक करणे जरा जास्त जोखमीचे आहे. त्यामुळे त्यांनी म्युच्युअल फंडांच्या इक्विटी ग्रोथ स्कीममधील गुंतवणुकीने सुरुवात करावी आणि तीही एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान) च्या माध्यमातून. या प्रकारात मोडणाऱ्या अनेक योजनांनी त्यांच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या कालावधीचा विचार केला तर द. सा. द. शे. सरासरी २४ टक्क्य़ांपेक्षा जास्त वाढ नमूद केली आहे. सरकारी कायद्यानुसार म्युच्युअल फंडांच्या जाहिरातींमध्ये ‘ही गुंतवणूक धोक्याची आहे..’ वगैरे वगैरे चेतावणी देणे भाग असते. म्युच्युअल फंड एजंट किंवा कोणीतरी सांगतो म्हणून आंधळेपणाने गुंतवणूक करू नये इतकाच या धोक्याच्या घंटेचा उद्देश असतो; परंतु प्रत्यक्षात नवीन गुंतवणूकदारांच्या बाबतीत त्याचा परिणाम त्यांना या लाभदायक गुंतवणुकीपासून परावृत्त करण्याच्या बाबतीत जास्त होतो. आज आपल्या देशात फक्त ४ ते ५ टक्के जनताच म्युच्युअल फंडासारख्या अप्रतिम पर्यायामध्ये पैसे गुंतविते ते याच कारणामुळे.
वयाच्या २५ ते ३५ वर्षांच्या काळामध्ये सर्वात व्होलाटाइल योजनांमध्ये म्हणजे मायक्रोकॅप योजनांमध्ये गुंतवणूक करावी. त्यानंतर स्मॉल कॅप फंडामध्ये गुंतवणूक शिफ्ट करावी. ४० ते ४५ च्या दरम्यान मिड कॅप फंडामध्ये एन्ट्री करावी. पन्नाशीनंतर लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक शिफ्ट करावी आणि ५५ ते साठीच्या दरम्यान जेव्हा शेअर बाजार तेजीत असेल तेव्हा आपला नफा बांधून शेअर बाजारला राम राम ठोकावा आणि बिना जोखमींच्या पर्यायांचा आसरा घ्यावा. ही झाली सर्वसाधारण पद्धत. या क्षेत्रामध्ये एकजात सर्वाच्याच बाबतीत लागू पडेल अशी ठोस आखणी नसते. प्रत्येक व्यक्तिगणिक तिच्या गरजेनुसार त्यात बदल करावा लागतो. एक गोष्ट कटाक्षाने पाळावी लागते आणि ती म्हणजे आपण हे सर्व निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी करीत असतो आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत इतरेतर खर्चासाठी शक्यतोवर या पैशाला हात लावू नये. एखाद्या फंडातून (स्कीममधून) नफा बांधून बाहेर पडताना ते पैसे दुसऱ्या फंडाच्या लिक्विड स्कीममध्ये गुंतवणूक त्यामधून अपेक्षित इक्विटी ग्रोथ स्कीममध्ये एस.टी.पी. (सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर स्कीम) करावी. त्यामुळे गुंतवणुकीची रक्कम वाढते आणि त्यानंतरच्या तेजीच्या पर्वामध्ये जास्त प्रमाणात नफा पदरात पडतो. ही सर्व कार्यप्रणाली जरा किचकट वाटत असली तरी काटेकोरपणे अमलात आणली तर भाववाढीपेक्षा कितीतरी जास्त परतावा सहज प्राप्त होऊ शकतो.
ज्या गुंतवणूकदारांची हे सर्व सव्यापसव्य करायची तयारी नसते किंवा असल्या गोष्टीसाठी वेळ नसतो त्यांच्यासाठी पर्याय म्हणजे निर्देशांकांची खरेदी. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक १९९६ साली तयार करण्यात आला आणि त्यासाठी १९७८ हे पायाभूत वर्ष निश्चित करून त्याचे मूळ मूल्यांक १०० हे निश्चित करण्यात आले. शेअर बाजारातील १९९२, २००१ आणि २००८ मधील भयानक मंदी जमेस धरूनही गेल्या ३४ वर्षांच्या काळात सेन्सेक्सने वार्षिक सरासरी १६.५० टक्के परताव्याची नोंद केली आहे. वित्त बाजारात नेहमीच इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. गेल्या ३४ वर्षांमधील सेन्सेक्सची घोडदौड भविष्यातही अशीच सुरू राहिली तर २०२५ साली तो सहजपणे एक लाखाची सीमा पार करेल.
(लेखक व्यावसायिक वित्तीय     नियोजनकार आहेत.)