अर्थ वल्लभ : ..तरी गमते उदास

नजीकच्या काळात सरकारने कंपनी करात कपात जाहीर केल्याने कर संकलन आणखी रोडावेल.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत कुलकर्णी

‘‘देशाच्या अर्थव्यवस्थेने राम म्हटला असून, अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ताज्या वित्तीय सुधारणा म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी परंतु रुग्ण दगावला या पद्धतीच्या आहेत. आमच्या शीर्षस्थ नेत्यांना हे कोणी तरी समजावून सांगायला हवे,’’ हे बर्वे कुलोत्पन्नांचे शब्द लिफ्टसाठी थांबलेल्यांच्या कानात उकळत्या शिशासारखे घुसले. हे शब्द ऐकून बटाटा अपार्टमेंटमधील सर्वानाच धक्का बसला. पंचेधारी बाबा बर्व्यांच्या घरातून अंडय़ाची टरफले बाहेर फेकली तेव्हा चाळीला बसलेल्या धक्क्याच्या कितीतरी मोठा धक्का बटाटा टॉवरमधल्या रहिवाशांना बसला. अण्णा पावश्यांनी मुलींच्या कुंडल्या खणातून काढून सोमण बिल्डिंगमधील उकिडवेंच्या घरी देण्यासाठी खिशात टाकल्या. अण्णा सोमण बिल्डिंगच्या दारी पोहोचण्याआधी ही खबर पंतांच्या कुटुंबाला कळली. रतन समेळने द्वारकानाथ गुप्त्यांच्या मधूला लिहिलेले प्रेमपत्र, मधूच्या हातात पडायच्या आधी, काशीनाथ नाडकण्र्याच्या मुलाने परवचा म्हणतात तसे खाडखाड म्हणून दाखविले. सारे बहिर्जीचे वंशज चाळीत एकवटले असल्याची ख्याती असलेल्या चाळीतून ही खबर व्हॉट्स अ‍ॅपवरून हातोहात झावबाच्या वाडीपासून खोताच्या वाडीपर्यंत पसरली. सगळ्या ग्रुपवर हाच चच्रेचा विषय होता. त्याला कारण तसे होते.

बर्वे कुलोत्पन्नांची सच्चा कार्यकर्ता अशी ओळख आहे. बटाटय़ाची चाळ जरी मुंबादेवी मतदारसंघात येत असली तरी शेजारच्या मलबार हिल मतदारसंघातून २०१४ ची निवडणूक लढविलेल्या उमेदवाराने अत्यंत विश्वासातल्या बर्वे कुलोत्पन्नांची आपला मुख्य निवडणूक प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली होती. या नेत्याच्या अंत:स्थ खलबतखान्यातील विश्वासू अशी ओळख लाभलेल्या बर्वे कुलोत्पन्नांच्या शब्दांचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. बर्वे कुलोत्पन्नाच्या नारीजीचे कारण जाणून घेण्याच्या उद्देशाने आणि पक्षांतराच्या मोसमात बर्वे कुलोत्पन्न दुसऱ्या पक्षात जाणार की काय याची खबरबात घेण्याच्या उद्देशाने पक्षश्रेष्ठींनी आपले दूत बटाटा अपार्टमेंटमध्ये रवाना केले.

सुरुवातीचे आगत-स्वागत झाल्यावर दूतांनी मुख्य मुद्दय़ाला हात घातला. आणि नाराजीचे कारण विचारले.

‘‘काल जाहीर झालेल्या वित्तीय तुटीच्या आकडय़ामुळे मी अस्वस्थ झालो आहे. एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत महसूल आणि खर्चामधील तूट गंभीर इशारा देत असल्याने आर्थिक विषयाचा अभ्यासक या नात्याने मला भविष्यातला धोका दिसत आहे. एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत तूट अर्थसंकल्पात अंदाजित तुटीच्या ७८.७ टक्के पातळीवर पोहोचली आहे. एका वर्षांपूर्वीच्या तुलनात्मक कालावधीतील तुटीच्या ९४.७ टक्के पातळीवर वित्तीय तूट पोहोचली असल्याची दखल अर्थमंत्र्यांना जाणवत नसल्याने मी हताश झालो आहे. मंदावलेल्या अर्थगतीमुळे कर संकलन घटले आहे. अप्रत्यक्ष कर संकलनाने सरलेल्या सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) जमा झालेल्या संकलनाने मागील १९ महिन्यांतील नीचांकी नोंद केली आहे. एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत महसुली जमा सहा लाख कोटी तर  या कालावधीत सरकारने महसुली खर्च ११.७५ लाख कोटी रुपये केला.’’

‘‘मागील वर्षांच्या तुलनेत सरकारचा महसुली लाभ चार टक्क्यांनी अधिक असला तरी वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांकडून मिळालेला अतिरिक्त लाभांश वजा केल्यास परिस्थिती अतिशय बिकट दिसत आहे. पहिल्या पाच महिन्यांचे प्रत्यक्ष कर संकलन अर्थसंकल्पातील अंदाजित जमेच्या केवळ ३० टक्के आहे. या उलट करोत्तर महसुल अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा ६३.४ टक्के अधिक आहे. या वाढीस मुख्यत्वे रिझव्‍‌र्ह बँकेकडून मिळालेला वाढीव लाभांश आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या गंगाजळीतून सरकारला हस्तांतरित रक्कम कारणीभूत आहे. अर्थसंकल्पात अंदाजित निर्गुतवणुकीच्या १२ टक्के प्रत्यक्ष निर्गुतवणूक झाली आहे. सरकारने महसुली खर्चावर बऱ्यापैकी नियंत्रण राखले असून अर्थसंकल्पातील अंदाजित खर्चाच्या ४८ टक्के कमी खर्च सरकारने केला आहे. सरकारचे कर संकलन आटल्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वेच्या भांडवली खर्चावर झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणाऱ्यांना विकासावरील खर्चात कपात करावी लागल्याने मी गोंधळून गेलो आहे. पक्षांतर करणारा प्रत्येक नेता मतदारसंघाच्या विकासाठी पक्षांतर केल्याचे सांगत असताना भांडवली खर्चात (विकासावरील खर्च) कपात होत असल्याने विकासाचे दावे करणाऱ्यांचे पक्षांतर कितपत विकास साधेल याबद्दल मी साशंक आहे.’’

नजीकच्या काळात सरकारने कंपनी करात कपात जाहीर केल्याने कर संकलन आणखी रोडावेल. निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उपायांचे वित्तीय शिस्तीवर विपरीत परिणाम दिसत आहेत. भांडवली वस्तूंच्या उत्पादकांत निराशा दाटून आली आहे. नवीन उद्योगांसाठी कर सवलतीच्या पायघडय़ा अंथरणाऱ्या सरकारने चालू उद्योगांच्या मागण्यांकडे काणाडोळा केला आहे. नवीन २२ टक्के कर दराचा लाभ घेण्यासाठी इतक्या अटी आहेत की उद्योजकांना सध्याचा दर परवडेल अशी सरकारच्या आदेशाची गत आहे. सध्या बाजाराचा मूड ठीक असल्याने सरकारने निर्गुतवणुकीतून अधिकाधिक कमाई केली पाहिजे. नाही तर निर्गुतवणुकीचे लक्ष्य गाठणे मुश्कील होईल. नमो-१ मध्ये सरकारने वित्तीय शिस्तीचे कसोशीने पालन केले. तेव्हा कैलासवासी अरुण जेटली अर्थमंत्री होते. नमो-२ मध्ये पहिल्या वर्षीच वित्तीय मर्यादाभंग होईल अशी चिन्हे दिसत आहेत. कदाचित २०१० सारखी परिस्थिती ओढवू शकेल. २०१० मध्ये सरकारला मोठय़ा प्रमाणावर कर्जउचल करावी लागली होती. जानेवारीत  बहुधा सरकारला जास्त कर्ज घ्यावे लागेल किंवा अल्पबचत योजनांच्या निधीमधून आपला खर्च भागवावा लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर टीकेचा आसूड ओढणाऱ्यांना कर्ज काढून खर्च भागवावा लागेल. तसे झाले तर नियतीने विकासाची भाषा करणाऱ्यांवर उगवलेला तो सूड असेल. एक निष्ठावान स्वयंसेवक या नात्याने आमच्या शीर्षस्थ नेत्यांवर नियतीने आसूड उगारूनये यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न करीन. आज जे आकडे सांगत आहेत ते पाहता विकासाच्या दाव्यांना नियती योग्य उत्तर देईल,’’ असे सांगत बर्वे कुलोत्पान्नांने सगळ्या दूतांना आश्वस्त केले.

lshreeyachebaba@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Financial deficit figures financial reform abn

Next Story
विमा विश्लेषण : एलआयसीची जीवनमित्र
ताज्या बातम्या