या सदराच्या माध्यमातून वाचक कुटुंबांचे नियोजन करताना अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी आपसूकच मिळते. ज्या विश्वासाने या कुटुंबीयांनी आपल्या अनेक खाजगी गोष्टी सांगितल्या त्या विश्वासाचे कधी कधी दडपण जाणवते. आपल्याला विचारावयास संकोच वाटावा असे असा काहीसा प्रकार आजच्या नियोजनाच्या वेळी घडला. परंतु ज्यांनी आजच्या नियोजनासाठी मेल लिहिली त्या तुषार देशपांडे यांच्या मेलमधील माहिती तुटक तुटक होती. सुटे दुवे जुळवून घेण्यासाठी तुषार देशपांडे यांना अनेक प्रश्न विचारले व त्यांनी ही प्रांजळपणे त्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली हे नमूद करावे लागेल.
देशपांडे कुटुंबात सतीश देशपांडे (६०), सारिका (५५), तुषार (३२), वैष्णवी (२७) व अर्णवी (१८ महिने) हे सदस्य आहेत. सतीश शासकीय सेवेतून ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. त्यांना सेवानिवृत्ती वेतन लवकरच मिळू लागेल. सारिका व तुषार हे नोकरी करतात. कुटुंबाचा खर्च वजा जाता साधारण पंचवीस हजार बचत होते या बचतीचे रुपांतर पाच लाखांच्या बँकेच्या मुदत ठेवीत झाले असून अन्य गुंतवणूक साधनात म्युच्युअल फंड व बजाज अलायन्झ कंपनीच्या युलिपचा समावेश आहे. सध्या देशपांडे कुटुंबीय डोंबिवली पश्चिम येथे वन बीएचके सदनिकेत रहात असून याच परिसरात सुयोग्य टू बीएचके सदनिकेच्या शोधात देशपांडे कुटुंबीय आहेत. नवीन सदनिका पसंत पडल्यास सध्याची सदनिका विकून नवीन सदनिका खरेदी करण्याचा विचार आहे. विक्रीतून येणारी आणि नवीन सदनिकेची खरेदी यातील फरकापोटी रकमेची सतीश देशपांडे यांना सेवा निवृत्तीच्या लाभापोटी मिळालेली रक्कम व उर्वरित कर्ज घेऊन या पूर्तता करण्याचा मानस आहे. या बाबतीत नियोजन कसे असावे हा प्रश्न तुषार देशपांडे यांनी विचारला आहे.
सतीश देशपांडे यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम अतिशय तुटपुंजी वाटल्याने या बाबतची विचारणा तुषार देशपांडे यांच्याकडे केल्यावर कुटुंबातील मोठय़ा खर्चासाठी यात आधी दोन वेळा भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पसे काढल्याचे सांगितले. एनपीएसमधून पसे काढता येत नसल्याने अनेक सल्लागार एनपीएसची शिफारस करीत नाहीत. तथापि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून सेवानिवृत्तीआधी पसे काढण्याची सोय जरी असली तरी मुदतीपूर्ती वेळी किती कमी पसे हातात पडतात याचा विचार करण्यास सतीश देशपांडे यांचे उदाहरण उपयोगी पडेल.
या कुटुंबात सतीश देशपांडे, त्यांच्या पत्नी सारिका व तुषार या तिघांचे नियोजन असल्याने एका अर्थाने ही या तिघांची गोष्ट आहे. टू बीएचके घर घेण्यास किंमतीतील फरकापकी निदान अर्धी रक्कम सतीश देशपांडे यांना मिळालेल्या सेवानिवृत्ती लाभातील रकमेतून खर्च होणार आहे. यामुळे त्यांचा मुलगा तुषार देशपांडे यांच्यावरील कर्जाचा भार थोडय़ा प्रमाणात हलका होणार असला तरी सतीश यांच्या भविष्यातील मोठय़ा खर्चाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.
सतीश देशपांडे यांना रेल्वे कडून पेन्शन मिळणार आहे. एखाद्या आजारपणातील उपचारासाठी रेल्वेची आरोग्य सेवासुद्धा वाखाणण्याजोगी आहे. भावनिक सुरक्षितता व भविष्यात एखादे आजारपण आले तर त्यासाठी मोठय़ा खर्चाची सोय कुठून होणार हा प्रश्न कसा सोडवायचा याचे आज कोणाकडेही उत्तर नाही. आज वित्तीय नियोजकाचा सल्ला देशपांडे कुटुंबाला पटणारा नाही. सतीश देशपांडे यांनी आपल्या निवृत्ती लाभाच्या मिळालेल्या पशातून टूबीचके घर खरेदी करू नये, असा सल्ला द्यावासा वाटतो. परंतु हा सल्ला न पटल्यास सतीश देशपांडे यांनी घर खरेदी केलीच तर त्यांचे नियोजन कसे असावे हे पाहू.
सतीश देशपांडे व सारिका देशपांडे यांना रेल्वेची वैद्यकीय सुविधा सेवानिवृत्तीनंतर उपलब्ध आहे. तसेच तुषार देशपांडे यांच्या कंपनीतून समूह विमा योजनेमार्फत तीन लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाला विमा संरक्षण लाभले आहे. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीची अशी पॉलिसी आहे जी सतीश व सारिका देशपांडे यांना वैद्यकीय खर्चाला संरक्षण देईल. एक उदाहरण म्हणून समजा, या दोघांपकी एखाद्याला दोन वर्षांनी वैद्यकीय उपचारासाठी सहा लाख खर्च झाले. तर पहिल्या तीन लाखाचा खर्च तुषार यांच्या कंपनीने समूह विम्यातून येईल. एक लाख खर्च न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स देईल व देशपांडे कुटुंबियांना उर्वरित दोन लाख खर्च करावे लागतील. सतीश व सारिका देशपांडे यांना पाच ते आठ लाखापर्यंतच्या वैद्यकीय खर्चास संरक्षण देणारी पॉलिसी खरेदी करावी. पारंपारिक ‘मेडिक्लेम’पेक्षा या पॉलिसीचा हप्ता कमी असतो. कारण या पॉलिसीत पाच ते आठ लाख दरम्यानच्या वैद्यकीय खर्चालाच संरक्षण मिळते.            
एका अंदाजानुसार पंचवीस हजाराचा गृह कर्जाचा हप्ता पुढील वीस वष्रे फेडण्याची जबाबदारी ही तुषार देशपांडे यांची असणार आहे. साहजिकच तुषार देशपांडे यांना मोठय़ा विमा रकमेचे संरक्षण असणे जरूरीचे आहे. तुषार देशपांडे यांना पन्नास लाख रकमेचा विमा एचडीएफसी लाईफ वगळून अव्वल क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या अन्य विमा कंपनीकडून विमा खरेदी करावा. या विम्यासाठी त्यांना वार्षकि अंदाजे चौदा हजार हप्ता भरावा लागेल. सतीश देशपांडे सेवानिवृत्त झाल्याने कमी झालेले उत्पन्न व गृह कर्जाचा हप्ता सुरूझाल्यावर वाढणारा खर्च अशा परीस्थितीत देशपांडे कुटुंबियांचा बचतीचा दर कमी होणार आहे. या दृष्टीने खर्चाचे कठोर नियंत्रण होणे जरूरीचे आहे.
सध्या देशपांडे कुटुंबीयांकडून चार म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू आहे. नवीन सदनिका पक्की केल्याशिवाय एकूण खर्चाचा अंदाज येणे शक्य नाही. बजाज अलायन्झचे युलिप, मुदत ठेवी व शेवटी म्युच्युअल फंड या क्रमाने पसे काढून घेण्याची प्राथमिकता असावी.
तुषार देशपांडे यांनी त्यांच्या बचतीचे फेर नियोजन करण्याविषयी विचारणा केली आहे. बचती पकी सर्वात मोठा हिस्सा युलिप योजनेत गुंतविला जात आहे. युलिप योजनांचा व्यवस्थापन खर्च अन्य योजनांच्या तुलनेत अधिक असतो. म्हणून या योजनांचा परताव्याचा दर कमी असतो. या योजनांत आकर्षक कमिशन असल्याने साहजिकच या योजना विकण्याकडे एजंट मंडळींचा कल असतो. हप्ता भरण्याचा किमान कालावधी व अन्य बाबींचा विचार करून आपण युलिपबाबत हप्ता पाच वष्रे भरायचा आहे. पाच वर्षांनंतर हप्ते सुरू ठेवावे किंवा कसे याचा विचार करावा. तुषार देशपांडे यांनी निवडलेल्या म्युच्युअल फंडांच्या योजना चांगल्या आहेत. यात काही विनाकारण बदल सुचवावा असे वाटत नाही. वडिलांच्या निवृत्तीपोटी मिळालेल्या रकमेपकी ६० टक्के रक्कम स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनेत करण्याचा निर्णय योग्य आहे. आपण मुदत ठेवींच्या ऐवजी ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडां’च्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या योजनांमधून दोन योजनांची निवड करावी. तीन वर्षांचा विचार करता रोखे म्युच्युअल फंड योजनांतून मुदत ठेवींपेक्षा करपश्चात अधिक परतावा मिळेल. उर्वरित रक्कम बॅलेन्स फंडात गुंतवावी. तुषार देशपांडे हे म्युच्युअल फंडांच्या ईएलएसएस योजनेत गुंतवणूक करू इच्छितात. ईएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतविलेले पसे तीन वष्रे काढता येत नाहीत. देशपांडे कुटुंबियांचा टूबीएचके सदनिका घेण्याचा विचार असल्याने कदाचित या पशाची आवश्यकता लागण्याची शक्यता असल्याने या प्रकारच्या फंडात आज एसआयपी सुरूकरू नये. या ऐवजी म्युच्युअल फंडांच्या शॉर्ट टर्म फंड प्रकारच्या योजनांचा विचार करावा. सदनिका निश्चित झाल्यावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊन या नियोजनात किरकोळ बदल होणे अपेक्षित आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर नियोजनाचा फेर आढावा घेणे गरजेचे आहे हे विसरू नये.