आर्थिक नियोजनविषयक प्रश्न ई-मेलच्या माध्यमातून नेहमीच विचारले जातात. सर्वच  ई-मेलना उत्तर देणे शक्य होत नाही. ‘लोकसत्ता- अर्थवृत्तान्त’च्या वाचक असलेल्या मुंबईतील माहीमच्या रहिवासी श्रद्धा पोंक्षे यांनी लिहिलेली ई-मेल प्रातिनिधिक वाटल्याने आज तिचा या सदरात समावेश केला आहे. मूळ इंग्रजी ई-मेलचा स्वैर अनुवाद याप्रमाणे-
नमस्कार,
मी ‘लोकसत्ता- अर्थवृत्तान्त’ची नियमित वाचक आहे. मी याआधी आर्थिक नियोजन कुणाकडून करून घेतले नाही. या सदरातून आधी प्रसिद्ध झालेले काही लेख वाचून माझ्या आर्थिक नियोजनाविषयी काही शंका उपस्थित झाल्या; म्हणून ही मेल पाठवत आहे.
मी ४४ वर्षांची मध्यम वर्गातील अविवाहित स्त्री आहे. माझे शिक्षण बीई, एमबीए (मार्केटिंग) झाले असून मी गेल्या १८ वर्षांपासून नोकरी करीत आहे. मी माझ्या आई-वडिलांसोबत मुंबईत राहते. योग्य नियोजन न केल्याने मी माझ्या बचतीचा मोठा हिस्सा एका सहकारी बँकेच्या मुदत ठेवीत गुंतविला होता. दुर्दैवाने सध्या या बँकेवर प्रशासक असून मुदतपूर्ती होऊनही मला या ठेवी परत मिळू शकत नाहीत. मला भविष्यात ही रक्कम मिळेल याबद्दल साशंकता आहे. ही रक्कम साधारणत: माझ्या एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के आहे.
मला पडलेले प्रश्न याप्रमाणे –
१.    मला वित्तीय नियोजनाची खरोखर आवश्यकता आहे का?
२.    आजपर्यंत मी गुंतवणुकीसाठी केवळ बँकांच्या मुदत ठेवींचाच विचार केला. परंतु त्यातील फोलपणा माझ्या लक्षात आला असून यापुढे मी माझी गुंतवणूक नक्की कुठे करावी? निवृत्तिपश्चात खर्चाची तरतूद हे माझे एकमेव ध्येय आहे.
माझ्या गुंतवणुकीचा तपशील खालीलप्रमाणे :
* एलआयसी पेन्शन फंड. वार्षकि हप्ता १० हजार रुपये. मुदत २०२० पर्यंत. मी या योजनेत हप्ता भरणे थांबवू इच्छिते.
* ‘एचडीएफसी स्पेशल प्रो ग्रोथ फ्लेक्झी प्लान’ ही योजना मी दोन महिन्यांपूर्वी खरेदी केली. याचा वार्षकि हप्ता ६० हजार रुपये आहे. पहिले ५ वष्रे हप्ता भरल्यानंतर पुढील १० वष्रे मी हप्ता भरायचा अथवा नाही, हे ठरवेन.
* वेगवेगळ्या बँकेत कर वजावटीस पात्र असणाऱ्या ठेवी.   

मी पुढील गोष्टी करू इच्छिते :
* काही अपरिहार्य कारणांनी मी माझ्या आरोग्य विम्याचा हप्ता दोन महिन्यांपूर्वी भरला नाही. मी ही पॉलिसी पुन्हा घेऊ इच्छिते. मी आरोग्य विम्यासाठी कुठली पॉलिसी घेऊ?
* मी या आधी टर्म पॉलिसीचा विचार केला नव्हता. मी माझी एचडीएफसी लाईफची पॉलिसी बंद करून टर्म प्लॅन घेऊ का? व तो कोणत्या कंपनीचा घेऊ?  
* याआधी माझे पीपीएफ खाते नव्हते. या वयात मी पीपीएफ खाते नव्याने उघडू का?  
* मला पेन्शन प्लॅनची गरज आहे का? यासाठी मी नक्की काय करू?
आपण माझ्या प्रश्नांची उत्तरे द्याल, अशी अपेक्षा आहे.
ही मेल वाचल्यावर आर्थिक नियोजक म्हणून मेलमध्ये न दिलेल्या अन्य माहितीची गरज भासली. उदाहरणार्थ- श्रद्धा पोंक्षे यांच्यावर त्यांच्या आई-वडिलांची आर्थिक जबाबदारी आहे का वगैरे. म्हणून श्रद्धा यांना संपर्क करण्यास सांगितला.
त्यांच्याकडून मिळालेला तपशील याप्रमाणे- श्रद्धा यांचे वडील ८२ वर्षांचे असून ‘बँक ऑफ इंडिया’मधून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई ७८ वर्षांंच्या असून त्या शिक्षिका होत्या. आई-वडील दोघांनाही मिळणारे निवृत्तिवेतन त्यांच्या खर्चापेक्षा अधिक आहे. मागील एका वर्षांपासून वयोमानामुळे वडिलांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. श्रद्धा या त्यांच्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक आहेत. श्रद्धा एक अखिल भारतीय पातळीवरील औद्योगिक वित्त पुरवठादार कंपनीच्या विपणन (मार्केटिंग) विभागात होत्या. त्यांना अपरिहार्य कारणास्तव नोकरी सोडावी लागली होती. १४ महिन्यांच्या खंडानंतर त्यांना भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेत नोकरी लागली असून वार्षकि पगार १८ लाख त्यांना मिळणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देणे अधिक सोयीचे झाले.
वार्षकि ३० लाख कमविणाऱ्याला जितकी आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे, तितकीच आर्थिक नियोजनाची गरज मासिक ७ ते ८ हजार रुपये कमविणाऱ्या एका रिक्षाचालकाला आहे. कुठल्याही आर्थिक स्तरातील व्यक्तीला त्याचे उत्पन्न व जबाबदारीनुसार आर्थिक नियोजन करावे लागते. औपचारिक शिक्षण, आर्थिक उत्पन्न आणि अर्थसाक्षरता यांचा संबंध नसतो, हेही खरे. गुंतवणूकदाराचा आर्थिक स्तर व मानसिकता यातसुद्धा साधम्र्य असते. तुम्ही एखाद्या आर्थिक नियोजकाकडून (विमा विक्रेत्याकडून नव्हे) तुमचे नियोजन करून घेतले असते तर एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के रक्कम एकाच बँकेच्या मुदत ठेवीत गुंतविली नसती. आर्थिक व्यवस्थापनात एखादा निर्णय चुकला तर चुकलेल्या निर्णयाची किती किंमत चुकवावी लागेल याला IMPACT COST अशी संज्ञा आहे. आज तुमची IMPACT COST १० लाख रुपये आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे सिद्ध करता येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटत नाही. प्रत्येकालाच आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने पुन्हा सांगावेसे वाटते.
बँकांच्या मुदत ठेवी या कर कार्यक्षमता व परताव्याचा दर यात सर्वात खाली तर मुद्दलाच्या सुरक्षिततेत सर्वात वरच्या पायरीवर आहेत. तुमच्या गुंतवणुकीपकी ५० टक्के गुंतवणूक समभाग व समभागसदृश्य असावी. ज्यांच्यावर आर्थिक जबाबदारी असते व ज्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबाचा आर्थिक स्त्रोत आटल्यास कुटुंबातील इतर सदस्यांचे शिक्षण लग्न आदी उद्दिष्टे साध्य होण्यास अडचण येते किंवा त्या व्यक्तीने एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज काढलेले असले तर ते कर्ज मागे राहिलेल्यांना फेडावे लागते. अशांना टर्म प्लॅन किंवा मुदतीच्या विम्याची आवश्यकता असते. तुमचे आई-वडिलांना त्यांच्या खर्चाहून अधिक निवृत्तिवेतन मिळत आहे. म्हणून तुम्हाला टर्म प्लॅनची गरज नाही. सबब तुम्ही तुमची एचडीएफसी लाईफची पॉलिसी सुरू ठेवण्यास हरकत नाही.
तुमच्या बँकेने तुम्ही व तुमचे आई-वडील यांना प्रत्येकी ३ लाखाचा आरोग्य विमा दिला आहे. परंतु तुम्हाला मोठय़ा आरोग्य विमाछत्राची आवश्यकता आहे. तुम्हाचा हा ३ लाखाचा आरोग्य विमा तुमच्या बँकेने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीकडे उतरविला आहे. म्हणून तुम्ही याच कंपनीकडून ५ लाखाची एक पॉलिसी घ्यावी. एलआयसीची जीवन सुरक्षा ही निवृत्त योजना इतर योजनांच्या तुलनेत एक अव्वल योजना आहे. म्हणून ही योजना बंद करू नये. (इथे पुन्हा तुम्हाला आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे हे जाणवते.)
आता तुमच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळू या. तुमच्या पालकांची आर्थिक सुस्थिती व कुठलीही कौटुंबिक जबाबदारी नसणे हे लक्षात घेता तुम्ही समभाग सदृश्य गुंतवणूक (म्युच्युअल फंड वैगरे) करायला हवी होती. याचे कारण उदाहरण देऊन सांगायचे तर पीपीएफवरील देय असलेल्या व्याजाचे दर २००० मध्ये १२ टक्के होते ते आज ८.७५ टक्केआहे. एका बाजूला खाली येणारे व्याजाचे दर तर दुसऱ्या बाजूला वाढता खर्च लक्षात घेता समभागसदृश गुंतवणुकीस पर्याय नाही. तुमच्या गुंतवणुकीच्या आराखडय़ात सुधारणा करण्याची वेळ अजूनही गेली नाही. तुमचे वय लक्षात घेता तुमची निदान ५० टक्के गुंतवणूक तरी समभागसदृश असायला हवी.    
पीपीएफ हा आर्थिक नियोजनाचा पाया असल्यामुळे तुम्ही पीपीएफ खाते उघडावे, असे सुचवावेसे वाटते. साधरणत: तुमची सेवानिवृत्ती व पीपीएफ खात्याची समाप्ती एकाच वेळी येईल. तुमचा १५ वर्षांनंतरचा वार्षकि खर्च ७ ते ८ लाख असेल. शिवाय वैद्यकीय खर्चातदेखील वाढ होईल. त्यासाठी वार्षकि १० लाख व्याज पाच टक्क्याने मिळवायचे तर यासाठी साधारणत: पावणे दोन कोटींचा कोष तयार करणे जरुरीचे आहे. यापकी तुमची सध्या एकूण गुंतवणूक २५ लाख असून त्यापकी १० लाखाबाबतचे भवितव्य अधांतरी आहे. म्हणूनच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एका वित्तीय नियोजकाची नितांत गरज आहे.