डॉ. आशीष थत्ते

अग्र उद्योग एकीकरण म्हणजे सामान्यत: आपल्या वितरण व्यवस्थेत स्वत:च शिरायचे आणि ते काम आपण करायचे म्हणजे मध्यस्थाची गरज नाही आणि त्यानुसार व्यावसायिक नफा वाढवण्याचे प्रयत्न करायचे. अर्थात त्यात विशेषीकरण होत नसल्यामुळे किंवा ते मिळवण्यात अडचण असल्यामुळे ते फसू शकते किंवा दुय्यम दर्जाचे काम होऊ शकते. काही कंपन्या त्यामध्ये खूप यशस्वीदेखील झाल्या आहेत.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

नुकतेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिठाईवाले यांनी स्वत:च वितरण व्यवस्थेत शिरल्यामुळे त्याची हल्ली ‘एक्स्प्रेस’ दुकाने दिसतात. त्यामुळे त्यांना कमीत कमी महाराष्ट्रातील मोठय़ा शहरांमधील बाजारपेठ सहजपणे उपलब्ध झाली आहे. खूप साऱ्या कपडे आणि बुटांच्या नाममुद्रांची स्वत:ची दुकानेदेखील असतात. यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाममुद्रांचादेखील समावेश आहे. आयुर्वेदिक औषधे किंवा वस्तू बनवणाऱ्या कंपन्या यात मागे नाहीत. इतर मेडिकल दुकानांमध्ये यांची उत्पादने तर असतातच; पण स्वत:ची विशेष हक्काची (फ्रँचाइसी) दुकानेदेखील असतात. म्हणजे स्वत: बनवायचे आणि दुसऱ्याने विकायचे असे न करता स्वत:च विकायचे किंवा दुसऱ्याने आणि स्वत:सुद्धा विकायचे असा नमुना अनुसरायचा.

आपणसुद्धा अग्र उद्योग एकीकरण हे या ना त्या प्रकारे करतच असतो. फार पूर्वीच्या काळाशी तुलना न करता हल्लीच्या काळाशी तुलना केली तरी त्याची अनेक उदाहरणे सापडतील. पूर्वी बँकेचे व्यवहार म्हणजे अंगावर काटा यायचा, मात्र आता किती तरी सोपे झाले आहे. अर्थात याचा बँकांना अधिक फायदा झाला आहे. कंपन्यांमध्ये काम करतानादेखील पूर्वी दिमतीला शिपाई, मदतनीस वगैरे नेमले जायचे. आता स्वत:ची झेरॉक्स स्वत: काढा, प्रिंटाऊट स्वत: आणा किंवा चहा-कॉफीदेखील स्वत: जाऊनच आणावे लागते. या संकल्पना थोडय़ाशा बाह्य स्रोतांशी निगडित असल्या तरी वेगळय़ा आहेत. मध्यमवर्गीयांमध्ये पूर्वी घराचे नूतनीकरण करताना हमखास अंतर्गत सजावटकारांची मदत घेतली जायची. मात्र हल्ली पद्धत थोडीशी बदललेली दिसते. कंपन्या जसे अग्र उद्योग एकीकरण करून अधिक नफा कमावतात तसेच आपणसुद्धा व्यय वाचवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्यात किती सफाईदारपणे काम होते हा प्रश्न आहेच; पण तरीही आपण प्रयत्न जरूर करतो. अगदी वैद्यकीय सेवादेखील आपण स्वत:च करतो. पूर्वी साधे सर्दी, डोकेदुखी किंवा ताप आल्यास हमखास डॉक्टरकडे जायची प्रथा होती. आता हल्ली घरच्या घरी कुठले तरी औषध घेऊन आपण आपलाच उपाय करतो. पूर्वी वैयक्तिक प्राप्तिकर विवरणपत्रे सनदी लेखापालकडून भरून घ्यायची प्रथा होती. आता तेदेखील काम आपण स्वत: करतो किंवा संकेतस्थळाच्या मदतीने करतो. घरे खरेदी करणे आणि विकणेदेखील संकेतस्थळाच्या मदतीने आपण स्वत: करतो.

टाळेबंदीच्या काळात कित्येक अग्र उद्योग एकीकरण आपण केले. आपल्या रोजच्या आयुष्यात तसे कशाला पूर्व म्हणायचे आणि कुणाला अग्र म्हणायचे हा जरा संभ्रमच आहे. पुढील भागात पूर्व उद्योग एकीकरण बघू. तुमच्या काही सूचना असतील किंवा अनुभव असतील तर जरूर सांगा. (टीप: मी सनदी लेखापाल नाही आणि विवरणपत्रे भरत नाही, त्यामुळे स्वत:चे दु:ख इथे मांडले नाही.)
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत