वसंत कुळकर्णी

‘नॉट फंड्स बट अ‍ॅसेट अलोकेशन जनरेट्स द रिटर्न्‍स’ गुंतवणूकविश्वात या वचनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा रोखे फंडांचा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी पोर्टफोलिओ तयार करण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा – ‘आमच्याकडे बँकेच्या ठेवी आहेत मग रोखे गुंतवणूक करणारे अर्थात डेट फंड का घ्यावेत?’ असा प्रश्न विचारणारे अनेकजण भेटत असतात. सध्या दहा वर्षांचे रोखे साडेसात टक्क्यांदरम्यान परतावा देत असल्याने रोखे गुंतवणुकीसाठी ही आदर्श पातळी आहे. गुंतवणुकीत कॉर्पोरेट बाँड फंड की गिल्ट फंड की क्रेडिट रिस्क फंड असावेत, या प्रश्नाचा ऊहापोह आजच्या लेखात करून घेणार आहोत. नेमके कोणते फंड असावेत या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी प्रथम या फंडांची वैशिष्टय़े जाणून घेऊ.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

‘सेबी’च्या वर्गीकरणानुसार कॉर्पोरेट बाँड फंडाच्या गुंतवणुकीत बाँडमध्ये किमान ८० टक्के रोखे ‘डबल ए प्लस’ किंवा त्यापेक्षा उच्च पतधारण करणारे रोखे असणे आवश्यक आहे. या फंड गटासाठी पतनिश्चित केली असून रोख्यांचा उर्वरित कार्यकाळ याबद्दल उल्लेख केलेला नाही. व्यापक दृष्टीने विचार केल्यास बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड आणि क्रेडिट रिस्क फंड हेसुद्धा एक प्रकारचे कॉर्पोरेट बाँड फंड प्रकार आहेत.

गिल्ट फंड / जीसेक फंड / कॉन्स्टंट मॅच्युरिटी फंड या फंड प्रकारात किमान ८० टक्के गुंतवणूक सरकारी रोख्यांत करावी लागते. गिल्ट फंड कोणत्याही अवधीच्या रोख्यांत गुंतवणूक करू शकतात, या फंडांच्या रोख्यांची सध्या मुदत एक ते नऊ वर्षे आहे. कॉन्स्टंट मॅच्युरिटी फंडांना रोख्यांचा उर्वरित कालावधी सरासरी १० वर्षे कायम ठेवावा लागतो. या फंडात केंद्र सरकारचे रोखे, राज्य विकास कर्ज (एसडीएल) आणि काही रक्कम ट्रेझरी बिलांमध्ये असते. या फंडांची पत उच्च असली तरी हे रोखे खूप अस्थिर असतात. गिल्ट फंडांचा ८० टक्के परतावा व्याजातून तर २० टक्के परतावा भांडवली लाभातून येतो. जीसेक फंड व्याजदर वाढीच्या टप्प्यात कमी मुदतीच्या रोख्यांत तर व्याजदर कपातीच्या काळात दूरच्या मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करतात. कॉन्स्टंट मॅच्युरिटी फंडांना रोख्यांची उर्वरित सरासरी मुदत १० वर्षे असल्याने त्यांना गुंतवणूक असलेल्या रोख्यांच्या मुदतीत बदल करण्याची फार संधी नसते. 

साडेसात, आठ टक्के परतावा शक्य..

क्रेडिट रिस्क फंड हासुद्धा एक कॉर्पोरेट बाँड फंड आहे. हे फंडांना किमान ६५ टक्के गुंतवणूक ‘डबल ए प्लस’पेक्षा कमी पत असलेल्या रोख्यांत करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा होतो की, ते प्रामुख्याने उच्च पत जोखीम असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करतात. वर्ष २०१८ ते २०२० दरम्यान या फंडांची गुंतवणूक असलेल्या कंपन्या वेळेवर व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मुद्दल परत करू शकल्या नाहीत. या अनियमिततेमुळे अनेक फंडांनी त्यांची गुंतवणूक ‘डबल ए’पेक्षा उच्च पत असलेल्या रोख्यांत करणे पसंत केले तर अनेक फंडांनी नवीन गुंतवणूक स्वीकारणे बंद केले. सध्या, क्रेडिट रिस्क फंड, त्यांच्या पोर्टफोलिओपैकी सरासरी ५१ टक्के गुंतवणूक ‘एए ’ किंवा त्यापेक्षा कमी पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करतात. या फंडांतील गुंतवणूक दीर्घ मुदतीची असणे गरजेचे असते. या फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी तीन वर्षे मुदत असलेले रोखे आहेत. या फंडांना प्रामुख्याने व्याजाचे उत्पन्न मिळते. त्यांची गुंतवणूक कमी गुणवत्तेच्या रोख्यांत असल्याने या रोख्यांचा व्याजदर जास्त असतो. तरीही, या श्रेणीतील ‘वायटीएम’मध्ये मागील सहा महिन्यांत दीड टक्क्याची वाढ झाली असून सध्या क्रेडिट रिस्क फंडांचा सरासरी ‘वायटीएम’ ७.५६ टक्के आहे. क्रेडिट रिस्क फंडाच्या गुंतवणुकीत तीन वर्षे मुदतीचे रोखे असल्याने या फंडांना व्याजदर कपातीचा भांडवली लाभ होत नसतो. तीन वर्षांच्या कालावधीत ‘क्रेडिट इव्हेंट’ न घडल्यास साडेसात, आठ टक्के परतावा मिळविता येईल. परंतु क्रेडिट रिस्क फंडांच्या गुंतवणुकीतील रोख्यांचे डाउनग्रेड किंवा डिफॉल्ट (पत खालावणे किंवा व्याज देण्यास असमर्थ ठरणे)  शक्यता जास्त असल्याने परताव्यात आणखी घट होऊ शकते.

अस्थिरता टाळायची तर..

तुलनेने कमी अस्थिर असणारे कॉर्पोरेट बाँड फंड, तीन वर्षे मुदतीच्या गुंतवणुकीसाठी आदर्श गुंतवणूक साधन आहे. गिल्ट फंडांसोबत येणारी उच्च अस्थिरता टाळायची असेल तर कॉर्पोरेट बाँड फंड तुमच्या डेट पोर्टफोलिओचा एक भाग असू शकतात. जर तुमची डेट फंडातील गुंतवणूक कमी असेल आणि तुम्ही फक्त एकच फंडाचा गुंतवणुकीत समावेश करू इच्छित असाल तर कॉर्पोरेट बाँड फंड तुमच्या गुंतवणुकीचा भाग असायला हवेत. तुम्ही किमान ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर गिल्ट फंड हा अधिक चांगला पर्याय आहे. दीर्घ मुदतीत गिल्ट फंडांनी पीपीएफपेक्षा अधिक कर कार्यक्षम परतावा दिला आहे. सध्याच्या व्याजदर वाढीच्या कालावधीत  हे फंड अनाकर्षक वाटले. पाच वर्षांच्या कॉर्पोरेट बाँड फंडांपेक्षा हे फंड अधिक परतावा देऊ शकतील.

तुमची जास्त रकमेची ‘एसआयपी’ असल्यास, आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दोन किंवा अधिक फंड ठेवू इच्छित असल्यास एक कॉर्पोरेट बाँड फंड आणि एक गिल्ट फंड ठेवू शकता. कॉर्पोरेट बाँड फंड आणि गिल्ट फंड वेगवेगळय़ा कालावधीच्या रोख्यांत गुंतवणूक करत असल्याने, ते एकमेकांना पूरक आहेत. गिल्ट फंडांतून कधी कधी नफावसुलीची आवश्यकता भासते. विशेषत: जेव्हा व्याजदरात तीव्र घसरण होते. (जसे की मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२०) तेव्हा परतावा दोन अंकांत असतो. तेव्हा नफावसुली अनिवार्य ठरते. कॉर्पोरेट बाँड्स किंवा गिल्ट फंड्समधील अस्थिरता कमी करण्यासाठी अल्ट्रा-शॉर्ट आणि शॉर्ट टर्म फंडात गुंतवणूक करावी. गुंतवणुकीत अल्ट्रा शॉर्ट फंड असल्याने अस्थिरता कमी होते.

अधिक रोकडसुलभ आणि कर-कार्यक्षम..

तुमच्या गुंतवणुकीत तुमच्या वयाइतकी स्थिर उत्पन्न गुंतवणूक हवी. उच्च धनसंपदा बाळगणारे आणि कंपन्या त्यांची अतिरिक्त रोकड नेहमीच रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवत असतात. रोखे गुंतवणूक करणारे फंड हे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक कर कार्यक्षम असतात. बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक रोकडसुलभ आणि कर कार्यक्षम असल्याने बँक मुदत ठेवींपेक्षा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात पैसा टाकणे कधीही फायद्याचे असते. परंतु ऐकीव माहितीमुळे अनेक गुंतवणूकदार रोखे गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचे ३६ उप-प्रकार असल्याने गुंतवणूकदारांना मुबलक पर्याय उपलब्ध असतात. आपल्या गुंतवणूक कालावधीशी साधम्र्य साधणारे फंड निवडले तर गुंतवणुकीतील अस्थिरता कमी करता येते. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचे त्यांच्या गटानुसार वर्गीकरण करून सखोल विश्लेषणानंतर खालील फंड गुंतवणुकीसाठी सुचवत आहे.

मागील चार वर्षांत (१ जानेवारी २०१८ ते ३० सप्टेंबर २०२२) या कालावधीत एकही कलंकित रोख्यात गुंतवणूक नसणारी केवळ चार फंड घराणी आढळली. रोखे गुंतवणूक ‘डय़ुरेशन रिस्क इज टेम्पररी बट क्रेडिट रिस्क इज पर्मनन्ट’ हे वचन लक्षात ठेवून ज्या तीन फंड घराण्यांनी गुंतवणूकदारांची जोखीम कमी करण्यात यश संपादन केले ती चार फंड घराणी म्हणजे आयडीएफसी, कॅनरा रोबेको, एलआयसी एमएफ आणि आयटीआय ही चार फंड घराणी होय. खेदाने असे नमूद करावे लागते की उर्वरित सर्व फंड घराणी अधिक परतावा मिळविण्यासाठी संभाव्य कमी पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करून गुंतवणूकदारांच्या हिताशी प्रतारणा केली. आयडीएफसी वगळता अन्य तीन फंड घराण्यांकडे मोठी मालमत्ता नाही. तेव्हा या फंड घराण्यांनी मोठी मालमत्ता म्हणजे सुरक्षितता हा समज खोडून काढला.

गुंतवणूकयोग्य रोखेसंलग्न फंडाचे गटानुसार वर्गीकरण

 बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड आयटीआय बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड

    अ‍ॅक्सिस बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड

कॉर्पोरेट बाँड फंड निप्पॉन इंडिया कॉर्पोरेट बाँड फंड

    अ‍ॅक्सिस कॉर्पोरेट बाँड फंड

डायनॅमिक बाँड फंड   यूटीआय डायनॅमिक बाँड फंड

    आयटीआय डायनॅमिक बाँड फंड

गिल्ट फंड   एसबीआय मॅग्नम गिल्ट फंड

    डीएसपी गव्हर्न्मेंट सिक्युरीटीज फंड

गिल्ट लाँग डय़ुरेशन फंड  निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य                                             

लो डय़ुरेशन फंड  यूटीआय ट्रेझरी अ‍ॅडव्हांटेज

    अ‍ॅक्सिस ट्रेझरी अ‍ॅडव्हांटेज

मीडियम डय़ुरेशन अ‍ॅक्सिस स्ट्रॅटेजिक बाँड फंड

    एसबीआय मॅग्नम मीडियम डय़ुरेशन

मीडियम टू लाँग डय़ुरेशन  निप्पॉन इंडिया इन्कम फंड                  

    एलआयसी एमएफ बाँड फंड

शॉर्ट डय़ुरेशन बँक ऑफ इंडिया शॉर्ट डय़ुरेशन फंड

    अ‍ॅक्सिस शॉर्ट डय़ुरेशन फंड

अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन  निप्पॉन इंडिया अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन

    बडोदा बीएनपी परिबा अल्ट्रा शॉर्ट डय़ुरेशन

लिक्विड अ‍ॅक्सिस लिक्विड फंड

    बडोदा बीएनपी परिबा लिक्विड फंड