|| भालचंद्र जोशी
घरोघरी चैतन्यदायी वातावरणात गणपतीचे आगमन झाले आहे. एव्हाना दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले असेल आणि गौरीच्या स्वागताची लगबग सुरू असेल. साथीच्या संक्रमणामुळे मागील अठरा महिने जागतिक आणि भारतीय भांडवली बाजारासाठी विशेष लक्षणीय ठरले. निराशा आणि अनिश्चिाततेतून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर लवकर येण्याची आशा दिसू लागली आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांनी त्यांच्या मालमत्ता विभाजनाबद्दल अधिक सजग राहणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांनी नियमित गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीने सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केला आहे. मागील अठरा महिन्यांत वर्षात रोखे आणि समभाग गुंतवणुकीने आकर्षक परतावा दिल्यानंतर, अस्थिरतेच्या भीतीने बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात नफावसुलीचे विचार येणे क्रमप्राप्त आहे. निर्देशांकांचा सध्याचा स्तर टिकाऊ असू शकत नाही असे मानणाऱ्या गुंतवणूकदारांचा मोठा वर्ग द्विधा स्थितीत आहे. असे असूनही गेल्या अनेक महिन्यांपासून सेन्सेक्सने ५० हजारांवरची पातळी कायम राखली आहे हे लक्षात घ्यायला हवे. एसआयपी गुंतवणुकीच्या रकमेत होणारी वृद्धी ही भारतीय अर्थव्यवस्थेवरील सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. अर्थव्यवस्था जशी सामान्य होऊन करोनापूर्व पातळीवर येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे; रोजचे लसीकरणाचे वाढते आकडे, बाधितांच्या संख्येत होणारी घट आणि संसर्ग कमी होत असल्याची शक्यता दिसत असली तरी, आपण सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत अधिक सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे.

जशी आरोग्याबाबत सावधगिरी बाळगत आहात तशीच सावधगिरी तुमच्या निवृत्तीपश्चातच्या आर्थिक जीवनाबाबत बाळगणे गरजेचे आहे. निवृत्ती नियोजन म्हणजे सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी वित्तीय स्रोतांची तयारी करणे. त्यात सध्याची जीवनशैली लक्षात घेऊन निवृत्तीपश्चात तशीच जीवन शैली राखण्यासाठी नेमकी किती रकमेची बचत करणे आवश्यक आहे, हे तुमच्या निवृत्ती नियोजकाकडून तुम्ही जाणून घ्यायला हवे. आवश्यक तितकी बचत केलीच पाहिजे. तितकी रक्कम बाजूला ठेवताना तुमची जोखीम क्षमता, कर कार्यक्षमता उपलब्ध निधी, कमावते राहण्यासाठी उपलब्ध वर्षे यावर मालमत्ता विभाजन आणि गुंतवणूक साधनांची निवड करायला हवी.

प्रत्येक मालमत्ता वर्गाची जोखीम आणि परताव्याचे प्रमाण भिन्न असते. परतावा आणि जोखीम यांच्यात सरळ संबंध असतो. म्हणजे जितकी जोखीम अधिक तितका परतावा अधिक म्हणून, योग्य मालमत्ता विभाजन ही एक अशी रणनीती आहे जी गुंतवणुकीतील जोखीम आणि लाभ यांच्यामध्ये योग्य संतुलन शोधते. जोखीम भूक, ध्येय आणि सोयींवर आधारित विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक समायोजित करून, गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून, मालमत्ता विभाजन ही आपल्या पोर्टफोलिओला बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक मूल्याचा ऱ्हास होण्यापासून संरक्षित करण्याला प्रत्येक गुंतवणूकदाराने प्राधान्य दिले पाहिजे.

गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या एकूण परताव्याच्या १० ते १२ टक्के परतावा निधी व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेमुळे मिळत असतो. म्हणजे एखाद्या फंडाने दिलेला एका निश्चिात काळातील परतावा ८ टक्के असेल, तर त्यापैकी ७ टक्के परतावा निर्देशांकाने म्हणजे फंडाच्या मानदंडाने दिलेला, तर अधिकचा एक टक्का परतावा निधी व्यवस्थापकाच्या कौशल्यामुळे मिळालेला असतो. यालाच ‘फंड मॅनेजर्स अल्फा’ असे म्हणतात. एखादा निधी व्यवस्थापक सातत्याने मानदंडापेक्षा अधिक परतावा मिळवीत असेल तर तो निधी व्यवस्थापकअसलेल्या फंडात केलेली सातत्याने गुंतवणूक फायदेशीर ठरते. असा निधी व्यवस्थापक आणि तो निधी व्यवस्थापक असलेल्या अनेक फंडांपैकी योग्य त्या फंडाची शिफारस करण्याचे काम तुमचा सल्लागार करीत असतो. अशा सल्लागाराच्या कौशल्यामुळे मिळविलेल्या अतिरिक्त परताव्यास ‘अ‍ॅडव्हायजर अल्फा’ असे म्हणतात. एखाद्या गुंतवणूकदाराला त्याने पूर्वनिश्चिात केलेल्या मांनदंडापेक्षा जो अधिक परतावा मिळतो त्याचा मोठा हिस्सा ‘फंड मॅनेजर्स अल्फा’ आणि ‘अ‍ॅडव्हायजर अल्फा’ यामुळे मिळालेला असतो. अनेक गुंतवणूकदारांना कदाचित असे वाटत असेल की, मी माझी बचत ‘अ’ किंवा ‘ब’ फंडात थेट गुंतवणुकीच्या (डायरेक्ट प्लान) माध्यमातून दिली आणि वितरकाला मिळणारा मोबदला वाचविला तर वर्षाकाठी मी माझ्या परताव्यात वाढ करू शकतो. परंतु संशोधन असे सांगते की, तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीशिवाय केलेली गुंतवणूक ८० टक्के प्रसंगात मानदंडापेक्षा कमी नफा मिळवून देते. योग्य निधी व्यवस्थापक आणि योग्य सल्लागारच तुम्हाला अधिक परतावा मिळवून देतात. एका अर्थाने योग्य सल्लागाराची निवड करणारा गुंतवणूकदार ‘तूच कर्ता आणि करविता’ असतो.

फंडांचे कर्तेपण जाणून घेण्याच्या पद्धती पुढील लेखात पाहू.

ल्ल   लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@whiteoakindia.com

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.