माझा पोर्टफोलियो : ‘पोलादी’ सक्षमतेची स्मॉल कॅप

आर्थिक वर्षांच्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीच्या व्यावसायिक उलाढालीत यंदा ६३.६ टक्के वाढ झाली असून ती २,३७३ कोटींवर पोहोचली आहे

अजय वाळिंबे

गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड (जीपीआयएल) म्हणजे पूर्वाश्रमीची इस्पात गोदावरी लिमिटेड होय. सिमेंट, ऊर्जा व पोलाद अशा विविध पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या हिरा समूहाची ही प्रमुख अग्रणी कंपनी आहे. १९९९ मध्ये छत्तीसगडमधील रायपूर येथे ‘जीपीआयएल’ या एकात्मिक स्टील प्रकल्पाची स्थापना करण्यात आली.

‘जीपीआयएल’ पोलाद उद्योगातील लाँग स्टील उत्पादक असून कंपनी माइल्ड स्टील वायरचे उत्पादन करते. या उत्पादन प्रक्रियेत कंपनी स्पंज आयर्न, बिलेट्स, फेरो अलॉय, कॅप्टिव्ह पॉवर, वायर रॉड्स (सहायक कंपनीद्वारे), स्टील वायर्स, ऑक्सिजन गॅस, फ्लाय अ‍ॅश ब्रिक्स आणि आयर्न ओरचे प्लाट्सचे उत्पादन करते. कंपनीच्या या एकात्मिक प्रकल्पातील कॅप्टिव्ह वापरासाठी लोह खनिज खाणीतून उत्पादनाचे अधिकार देखील प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे अशा एकात्मिक प्रकल्पाला आवश्यक असलेले वीज आणि खाण प्रकल्प कंपनीकडे असल्याने स्टील वायर्समधील संपूर्ण मूल्य शृंखला (कच्चा माल ते अंतिम उत्पादन) साकारण्यास कंपनी यशस्वी झाली आहे. स्टील उत्पादनांसाठी आवश्यक असलेले ८५ टक्के लोह खनिज कंपनीच्या स्वत:च्या मालकीच्या दोन खाणीतून मिळते. बरोबरीने कंपनीचा राजस्थानमधील जैसलमेर येथील सौर ऊ र्जा प्रकल्प आवश्यक विजेची गरज पूर्ण करतो. 

कंपनीने नुकतेच सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीचे/ सहामाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षांच्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीच्या व्यावसायिक उलाढालीत यंदा ६३.६ टक्के वाढ झाली असून ती २,३७३ कोटींवर पोहोचली आहे. याच कालावधीत निव्वळ नफ्यात ४८५ टक्कय़ांची वाढ होत तो ६९४ कोटींवर पोहोचला आहे. सध्या स्टील उद्योगाला मागणी असून इतर स्टील कंपन्यांप्रमाणे ‘जीपीआयएल’ देखील उत्तम कामगिरी करत आहे. कंपनीने नुकतेच अरडेंट स्टील या स्वत:च्या उपकंपनीतील भागभांडवलाचा थोडा हिस्सा सुमारे ७७ कोटी रुपयांना विकून कर्जभार कमी केला आहे. कंपनीने छत्तीसगड सरकारशी सामंजस्य करार केला असून त्याअंतर्गत कंपनी रायपूर येथे १,४०० कोटी रुपयांची आणि बस्तर येथे ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प उभारत आहे. आगामी कालावधीत कंपनी आपले विस्तार प्रकल्प यशस्वीपणे राबवेल तसेच वाढती मागणी पुरवण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३३० रुपयांच्या आसपास असलेला हा समभाग अल्प ते मध्यम कालावधीत चांगला फायदा करून देऊ  शकेल अशी अपेक्षा आहे.  

गोदावरी पॉवर अँड इस्पात लि.

(बीएसई कोड – ५३२७३४)

गुरुवारचा बंद भाव :           रु. ३४७.४०/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक :       रु. ४६२/८४

बाजार भांडवल :             रु. ४,८९३ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :      रु. ३२.९१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                    ६७.५०

परदेशी गुंतवणूकदार            १.५३

बँक/ म्यु. फंड/ सरकार         ०.३९

इतर/ जनता                 ३०.५८

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : हिरा समूह

* व्यवसाय क्षेत्र  : स्टील, सौर वीज

* पुस्तकी मूल्य :            रु. १४९.७०

* दर्शनी मूल्य :            रु. ५/-

* गतवर्षीचा लाभांश :         १८५%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :            रु. ८६.४८

*  पी/ई गुणोत्तर :                  ३.८

*  समग्र पी/ई गुणोत्तर :             १३.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :             ०.१८

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :          २०.७

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :      ३७.४

*  बीटा :                        ०.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Godawari power and ispat ltd company profile zws

Next Story
विमा विश्लेषण : एलआयसीची जीवनमित्र