घराच्या वाढत्या किमतींमुळे घरामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. घराच्या किमती मागील १० वर्षांत कितीतरी पटीने वाढल्या आहेत. कदाचित एवढा जास्त नफा मिळवून देणारी दुसरी कोणतीच गुंतवणूक नसेल. यामुळेसुद्धा घरच्या किमती वाढत असतील. जेवढा जास्त नफा तेवढा जास्त कर भरावा लागतो. परंतु जर नियोजन करून घर खरेदी – विक्री केली तर कर भरावासुद्धा लागणार नाही. घरासंबंधी खालील काळजी घेणे गरजेचे आहे.
१. घराची तीन वर्षांच्या आत विक्री करू नये : घर विकत घेतल्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा लघु मुदतीचा होतो. लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर इतर गुंतवणुकीच्या सवलती मिळत नाहीत. त्यावर कर भरण्यावाचून पर्याय नसतो. जर घर तीन वर्षांनंतर विकले तर तो नफा दीर्घ मुदतीचा होतो. या नफ्यावर भरावा लागणारा कर वाचविण्यासाठी या नफ्याएवढी गुंतवणूक दुसऱ्या घरात केली (कलम ५४) तर किंवा जर बाँड (कलम ५४ ईसी) मध्ये केली (५० लाख रुपयांपर्यंत) तर तेवढय़ा रकमेवर भांडवली नफ्यात सूट मिळते.
नवीन घर हे जुने घर विक्रीच्या एक वर्ष आधी किंवा दोन वर्षांच्या आत (विकत घेतले तर) आणि तीन वर्षांच्या आत (बांधले तर) घेतले असले पाहिजे. जर ५४ ईसी कलमाप्रमाणे बाँडमध्ये गुंतवणूक केली तर ती घर विक्रीच्या सहा महिन्यांमध्ये करावी लागते. जर दुसऱ्या घरात गुंतवणूक केली नाही किंवा गुंतवणूक भांडवली नफ्यापेक्षा कमी असेल तर बाकी रकमेवर २०% इतका कर भरावा लागतो.  
जर एका घरविक्रीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी दुसऱ्या घरामध्ये गुंतवणूक केली आणि आणि हे नवीन घर तीन वर्षांत विकले तर पूर्वी मिळालेल्या सवलतीवर या वर्षी कर भरावा लागतो. शिवाय हे घर तीन वर्षांच्या आत विकल्यामुळे त्यावर लघु मुदतीचा भांडवली नफा होतो आणि त्यावर पूर्ण कर भरावा लागतो.
२. घरासाठी गृह कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट घेतली असली तर घराची ५ वर्षांच्या आत विक्री करू नये. : ज्या घराच्या कर्जाच्या परतफेडीवर कलम ८०उ प्रमाणे वजावट घेतली असेल आणि ते घर पाच वर्षांच्या आत विकले तर ज्या वर्षी घर विकले त्या वर्षी आधीच्या वर्षांत घेतलेली वजावट उत्पन्नात गणली जाते.
३. ज्या किमतीवर मुद्रांक शुल्क भरले आहे ती किंमत विचारात घेणे गरजेचे आहे : भांडवली नफ्यासाठी घराची विक्री किंमत ही, घर विक्री कराराप्रमाणे किंमत आणि ज्या किमतीवर मुद्रांक शुल्क भरले आहे ती किंमत जी जास्त आहे ती विक्री किंमत विचारात घेऊन कर भरावा लागतो. त्यामुळे जरी घर विक्री कराराप्रमाणे किंमत कमी असली आणि ज्या किंमतीवर मुद्रांक शुल्क भरले आहे ती किंमत जास्त आहे तर जास्त किंमतीवर भांडवली नफा गणला जातो आणि त्यावर कर भरावा लागतो. उदा. घराचे खरेदी मूल्य १२ लाख रुपये आहे. कराराप्रमाणे विक्री किंमत ही ३५ लाख रुपये आहे आणि ज्या किंमतीवर मुद्रांक शुल्क भरले आहे ती किंमत ४० लाख रुपये इतकी आहे तर भांडवली नफा हा २८ लाख रुपये (४० लाख वजा १२ लाख रुपये) असेल.
४. घर विक्रीतून जर दीर्घ मुदतीचा किंवा लघु मुदतीचा भांडवली तोटा झाला असेल तर तो पुढील आठ वर्षांसाठी CARRY FORWARD करता येतो. लघु मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षांत कोणत्याही भांडवली नफ्यातून (लघु किंवा दीर्घ) वजा करता येतो. आणि दीर्घ मुदतीचा तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो. यासाठी ज्या वर्षी तोटा झाला आहे त्या वर्षीचे विवरणपत्र वेळेवर भरणे बंधनकारक आहे.    
घराव्यतिरिक्त इतर मालमत्ता विक्रीवरील भांडवली नफ्यावर सवलत मिळविण्यासाठीसुद्धा घरामध्ये गुंतवणूक करता येते. उदा. शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेले शेअर्स, जमीन, दागिने वैगेरे विक्रीतून होणारा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठीसुद्धा घरामध्ये गुंतवणूक करता येते. कलम ५४ प्रमाणे ही गुंतवणूक करताना खालील अटींची पूर्तता करावी लागते.
१. निव्वळ विक्रीची रक्कम (विक्रीचा खर्च वजा जाता) ही रक्कम नवीन घरात गुंतवावी लागते.
२. नवीन घराव्यतिरिक्त एकापेक्षा जास्त घरे असू नये.
३. नवीन घर हे मालमत्ता विक्रीच्या एक वर्ष आधी किंवा दोन वर्षांच्या आत (विकत घेतले तर) आणि तीन वर्षांच्या आत (बांधले तर) घेतले असले पाहिजे.
४. नवीन घरातील गुंतवणूक ही निव्वळ विक्री किमतीपेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात वजावट मिळते.
एकापेक्षा जास्त घरांवर संपत्ती कर
संपत्ती करातून एका राहत्या घरावर सूट आहे. एकापेक्षा जास्त घरे असतील तर त्यावर १% संपत्ती कर भरावा लागतो. परंतु नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संपत्ती कर हा रद्द केला आहे. त्यामुळे पुढील वर्षांपासून तो भरावा लागणार नाही.