scorecardresearch

रपेट बाजाराची : सारे जहाँ से अच्छा..

सरलेल्या सप्ताहात केवळ चार दिवसच व्यवहार झालेल्या बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे.

रपेट बाजाराची : सारे जहाँ से अच्छा..

सुधीर जोशी
सरलेल्या सप्ताहात केवळ चार दिवसच व्यवहार झालेल्या बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. अमेरिकेतील महागाई वाढीचा दर जून महिन्यांतील ९.१ टक्क्यांवरून जुलै महिन्यांत ८.५ टक्क्यांवर आला. परिणामी रोखे परतावा कमी झाला आणि तेथील भांडवली बाजारातील धाडसी खरेदीला वेग आला. हिंडाल्को, भारती एअरटेल, टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स, टाटा केमिकल्स, कोल इंडिया, भारत फोर्जसारख्या कंपन्यांचे आलेले उत्साहवर्धक निकाल आणि अमेरिकी बाजारातील सकारात्मकता यामुळे भारतीय बाजारातही आक्रमक खरेदी पहायला मिळाली. सलग चौथ्या आठवडय़ात बाजाराचे प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. गेल्या चार आठवडय़ांत बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानी १० टक्क्यांहून अधिक वाढ साधली आहे.

मिहद्र अँड मिहद्र : ही कंपनी वाहन उद्योगातील एसयूव्ही आणि कृषीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरसाठी प्रसिध्द आहे. मिहद्र स्कॉर्पियोच्या नव्या अवतरासाठी पहिल्या अध्र्या तासात एक लाखांची मागणी नोंदवली गेली. प्रवासी गाडय़ांसाठी आतापर्यंत नोंदवलेली मागणी पाहता या आर्थिक वर्षांत कंपनी साडेतीन लाख वाहन विक्रीचा पल्ला गाठू शकेल. जूनअखेरच्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा वार्षिक तुलनेत ६७ टक्क्यांनी वाढला. ट्रॅक्टरच्या विक्रीमध्ये १८ टक्क्यांची वाढ होऊन बाजारातील विक्रीचा हिस्सा ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. धातूच्या आणि इंधनाच्या किमती आटोक्यात येत असल्यामुळे वाहन उद्योगामध्ये भरभराट होईल. कंपनीचे समभाग सध्या या वर्षांतील उच्चांकी पातळीजवळ असल्यामुळे थोडय़ा घसरणीची वाट पाहून १,२०० पर्यंत खरेदी करावेत.

बालकृष्ण इंडस्ट्रीज : ही कंपनी वाहनांसाठी लागणारे टायर्स बनविते. मात्र प्रवासी आणि माल वाहतूक करणारी वाहने सोडून इतर वाहनांच्या टायर्सवर कंपनीचा भर आहे. त्यामध्ये शेती, खाणउद्योग, बांधकाम आणि बाग-बगीच्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा अर्थात ट्रॅक्टर, अर्थ मूव्हर, जेसीबी सारख्या वाहनांच्या टायर्सचा समावेश आहे. केवळ ३८ कोटींच्या अल्प भांडवलावर ही कंपनी अनेक वर्षे उत्तम व्यवसाय करीत आहे. कंपनीची गेल्या आर्थिक वर्षांतील व्यावसायिक उलाढाल ८,७०० कोटी तर नफा १,४१० कोटी नोंदवला होता. कंपनीला ८० टक्के उत्पन्न निर्यातीतून प्राप्त होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती आणि भू-राजकीय अडथळय़ांमुळे जून अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात थोडी घसरण झाली. तसेच कंपनीच्या समभागांच्या किमतीमध्ये देखील घसरण झाली. मात्र पुढील वर्षभरात कार्यान्वित होणाऱ्या कंपनीचा कार्बन ब्लॅकचा कारखाना कच्च्या मालाच्या खर्चात बचत करण्यास मदत करेल. सध्याची समभागातील घसरण गुंतवणुकीची संधी आहे.

टाटा कन्झ्युमर कंपनी: टाटा समूहाची खान-पान संबंधित उत्पादने आणि सेवा व्यवसाय हे टाटा कन्झ्युमर कंपनीच्या छत्राखाली एकवटले आहेत. कंपनीच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये चहा, कॉफी, पाणी, मीठ, कडधान्ये, मसाले, सेवन सिद्ध (शिजवण्यासाठी/ खाण्यासाठी तयार) नाश्त्याचे पदार्थ यांचा समावेश आहे. ही जगातील दुसरी सर्वाधिक चहाची विक्री करणारी कंपनी आहे. जून अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीमध्ये ११ टक्के तर नफ्यात ३८ टक्के वाढ झाली. कंपनीची आणखी दोन लाख वितरक नेमून विपणन व्यवस्था मजबूत करायची योजना आहे. जुलै महिन्यात कंपनीने मिठाच्या किमती ३ रुपयांनी वाढविल्या आहेत. कंपनीने मसाल्यांबरोबर सुकामेवा क्षेत्रातही पदार्पण केले आहे. आतापर्यंत असंघटित लहान उद्योगांच्या हाती असलेल्या या व्यवसायात मोठी संधी आहे. तिमाही निकालानंतर कंपनीच्या समभागात झालेली ७६० रुपयांच्या पातळीवरील घसरण गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.
सध्या बाजारावर परिणाम करणारे बहुतांश घटक तेजीला अनुकूल आहेत. भारतातील किरकोळ महागाई दराचे जुलै महिन्यातील आकडेवारी शुक्रवारी प्रसिध्द झाली. किरकोळ महागाई दरात घसरणीचा दिलासा मिळाला असून त्याने गेल्या पाच महिन्यांतील नीचांक गाठला आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेकडून केली जाणारी पुढील संभाव्य व्याजदर वाढ सौम्य असण्याची शक्यता आहे. जूनमध्ये औद्योगिक उत्पादन दरानेदेखील १२.३ टक्क्यापर्यंत मजल मारली आहे. संवाहक अर्थात सेमीकंडक्टर चीपचा पुरवठय़ात सुधारणा झाल्यामुळे प्रवासी वाहनांच्या उत्पादन आणि विक्रीत वाढ होत आहे. पावसाचे प्रमाणही चांगले झाल्यामुळे शेती उत्पन्न आणि ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा संभवते. मात्र अमेरिका आणि भारतातील केवळ एका महिन्याच्या आकडेवारीवरून महागाई नियंत्रणात आली असल्याचा निष्कर्ष काढणे धाडसाचे आहे. अन्नधान्याच्या किमती नरमल्याने चलनवाढ ७.०१ टक्क्यांवरून ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आली असली तरी रिझव्र्ह बँकेने ठरविलेल्या सहा टक्क्यांच्या सहनशील पातळीपेक्षा अधिक आहे. येणाऱ्या उत्सवी हंगामात ती आणखी वर जाते का हे पाहावे लागेल. भांडवली बाजारात शाश्वत तेजीचे निर्देश सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मिळू शकतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगायलाच पाहिजे. फक्त उच्च दर्जाच्या आणि उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करायला हवी.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:
संवर्धन मदरसन्स सुमी कंपनी बक्षीस (बोनस) समभागांची घोषणा करेल
sudhirjoshi23@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या