म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना एनएव्ही म्हणजे प्रत्यक्षात काय? तिची गणती कशी करतात? गुंतवणुकीचा निर्णय घेताना तिचा वापर (application) कसा करायचा असतो? याबाबत बहुतांशी गुंतवणूकदार अनभिज्ञ असतात. सध्याच्या अनुकूल बाजारस्थितीत किमान जोखीम घेऊन दीर्घावधीत उत्तम लाभ देणाऱ्या या सर्वोत्तम पर्यायामध्ये यशस्वीरित्या गुंतवणूक करण्यासाठी हे सर्व गुंतवणूकदारांना माहित असणे आवश्यक आहे.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना एन्.ए.व्ही. (Net Asset Value) हा शब्द जुजबी माहित असतो. म्युच्युअल फंडांची विक्री म्हणजे त्या विशिष्ट योजनेच्या/ फंडाच्या आपल्या हाती असलेल्या युनिट्सची आपण विक्री करीत असतो. अशा एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करताना किंवा त्याची विक्री करताना प्रत्येक युनिटचा एक ठराविक दर असतो आणि त्या दरानेच त्याची खरेदी किंवा विक्री होऊ शकते. हा दर अर्थात एनएव्ही.
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना एनएव्ही म्हणजे प्रत्यक्षात काय? तिची गणती कशी करतात? गुंतवणुकीचा निर्णय घेताना तिचा वापर (ंस्र्स्र्’्रूं३्रल्ल) कसा करायचा असतो? याबाबत बहुतांशी गुंतवणूकदार अनभिज्ञ असतात. या पर्यायामध्ये यशस्वीरित्या गुंतवणूक करण्यासाठी हे सर्व माहित असणे आवश्यक आहे. नाहीतर विक्रेत्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडण्याची शक्यता असते. या योजनांमधील सर्व व्यवहार म्हणजे गुंतवणूकदारांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर देवाण-घेवाण ही एनएव्हीवर आधारीत असते.
* एनएव्ही म्हणजे काय?
एनएव्ही म्हणजे त्या योजनेमधील प्रत्येक युनिटची निव्वळ किंमत. ही किंमत दर दिवशी बदलत असते आणि त्याबाबतचे गणित मांडताना दोन ते चार दशांशापर्यंतचा हिशोब केला जातो.
योजनेच्या एकूण मालमत्तेमधून (Total Assets) दायित्व किंवा खर्च वजा जाता जी रक्कम बाकी राहते ती त्या योजनेची निव्वळ मालमत्ता. त्याचे समीकरण आहे –
निव्वळ मालमत्ता = एकूण मालमत्ता – दायित्व.
एनएव्हीच्या बाबतीत आकडेमोड करताना त्या निव्वळ मालमत्तेला त्यावेळच्या युनिट्सच्या संख्येने भागले जाते. समीकरण आहे –
एनएव्ही =  निव्वळ मालमत्ता – एकूण युनिटस्
प्रत्येक योजनेमध्ये (सीमित काळाच्या योजना सोडून)  त्या त्या फंडाद्वारे दररोज खरेदी आणि विक्रीचे सत्र चालू असते त्यामुळे त्यामधील युनिट्सची संख्या बदलत असते. त्याचबरोबर प्रत्येक योजनेअंतर्गत असलेले शेअर्स किंवा बाँड्स यांचे भाव दररोज वर खाली होत असतात. त्यामुळे निव्वळ मालमत्तेतही फरक होत असतो. परिणामत: दररोजच्या एनएव्ही मधेही बदल होत असतो.
* एनएव्हीचा वापर कसा?
गुंतवणुकीच्या संदर्भात या एनएव्हीचा वापर कसा करावा हे जाणून घेण्याअगोदर वित्त बाजारामधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊया. ऑगस्ट २०१३ मधे भारताच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव चच्रेत आले. तेव्हा बीएसई सेन्सेक्स होता १७,९००. सप्टेंबरमधे मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब होताच सेन्सेक्स झाला १९,७०० (द.सा.द.शे. वाढ सुमारे १२०%). १५ मे २०१४ ला मतदान पूर्ण झाले तेव्हा सेन्सेक्सने २३,००० ची पातळी गाठली (द.सा.द.शे. वाढ सुमारे २०%). पुढील चार दिवसांमधे म्हणजे मतमोजणीच्या दिवशी सेन्सेक्स सुमारे १,१०० अंकानी वाढला आणि त्यानंतर त्याने २५,०००ची सीमाही पार केली. थोडक्यात सप्टेंबर २०१३ ते मे २०१४ या नऊ महिन्यांच्या काळात सेन्सेक्स सुमारे ५,००० अंकांनी वाढला. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आपल्या देशाची आíथक वाटचाल जास्त गतिमान होणार, या अपेक्षा वजा खात्रीमुळे शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरू झालेली आहे. ही तेजी सेन्सेक्सला कोणत्या पातळीवर घेऊन जाईल, त्याबाबतचे तज्ज्ञांचे अंदाजही प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचू लागलेले आहेत.
* काय खबरदारी घ्यावी?
अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूकदारांनी सावधपणे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ‘नेहमीच येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक तेजीमध्ये म्युच्युअल फंडाच्या नवीन योजना (New Fund Offer) बाजारात येतात. त्यावेळेस त्यामध्ये गुंतवणूक करताना एनएव्हीचा विचार केला तर त्याबाबतच्या चुकीच्या कल्पनेमुळे होणारे नुकसान टाळता येते. त्यासाठी एक उदाहरण पाहूया.
२००४ सालच्या एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा सेन्सेक्स ५,६०० च्या पातळीवर होता त्यावेळेस एका म्युच्युअल फंडाने सेन्सेक्सवर आधारीत अशी नवीन योजना (N.F.O) बाजारात आणली.
योजनेचे नाव    :    ‘अबक’ सेन्सेक्स फंड
एकूण जमा रक्कम     :     ५,६०,००,००० रु.
युनिटची दर्शनी किंमत    :    १० रु.
एकूण युनिटस्     :    ५६,००,०००
एप्रिल २०१४ मधे सेन्सेक्स जेव्हा २२,८०० च्या पातळीवर होता तेव्हा या योजनेची निव्वळ मालमत्ता होती २२,८०,००,००० रुपये. दहा वर्षांच्या कालावधीमधे खरेदी-विक्री होऊनही त्या योजनेमधील  युनिट्सची संख्या ५६,००,०००  युनिट्सच राहिली असे गृहीत धरले तर एप्रिल २०१४ मध्ये त्या योजनेचा एनएव्ही होता ४०.७१४२ (२२,८०,००,०००/५६,००,०००). एखाद्या गुंतवणूकदाराने त्या योजनेच्या सुरुवातीला एक लाख रु.ची गुंतवणूक केली असेल तर त्याला प्राप्त झालेल्या युनिट्सची संख्या १०,००० होते आणि एप्रिल २०१४ च्या ४०.७१४२च्या एनएव्हीनुसार त्याची गंगाजळी होते ४,०७,१४० रु. (द.सा.द.शे.सरासरी परतावा सुमारे १५ टक्के)
त्याच सुमारास एका म्युच्युअल फंडाची तीन वर्षांच्या सीमित काळासाठीची योजना (Close Ended Scheme) बाजारात आली होती. सदर योजनेची गुंतवणूक मुख्यत: मिड कॅप आणि स्मॉल कॅप सदरात मोडणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समधे होणार होती. म्हणजे ‘अबक’  सेन्सेक्स फंडापेक्षा त्या गुंतवणुकीमधे जास्त जोखीम होती. योजनेच्या माहितीपत्रकामध्येही ‘High Risk’ म्हणून इशारा दिलेला होता. अशा प्रकारच्या योजनांमधे, त्या योजनेच्या तीन वर्षांच्या कालावधीमधे फंडाकडून युनिट्सची खरेदी-विक्री होत नाही, त्यामुळे अशा योजनांसाठी विक्रेत्यांचे कमिशन फार जास्त असते. आणि त्यामुळे ज्यांना एनएव्ही म्हणजे काय याची सखोल माहिती नसते अशा अनभिज्ञ गुंतवणूकदारांची फसगत होण्याची शक्यता असते. ज्या  विक्रेत्यांचे जास्त प्रमाणात कमिशन मिळवायचे हे एकच ध्येय असते, असे विक्रेते ‘अबक’  सेन्सेक्स फंडात २००४ साली गुंतवणूक केलेल्या वरील उदाहरणामधील गुंतवणूकदाराला ४०.७१४२च्या एनएव्हीच्या भावाने त्या योजनेची विक्री करून ज्यामध्ये जास्त जोखीम आहे, अशा नव्या योजनेमध्ये १० रु. दर्शनी किंमतीने युनिट्सची खरेदी करायचा सल्ला देतात. कारण काय तर सध्याच्या १०,००० युनिट्सच्या बदल्यात त्याला ४०,७०० पेक्षा जास्त युनिटस् प्राप्त होतील. नवीन योजनेमधे जमा झालेल्या पशांची गुंतवणूक पुढील तीन वर्षांसाठी मुख्यत: मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समधे होणार आहे. आणि त्या कंपन्यांच्या निर्देशांकांमध्ये २०१३च्या सप्टेंबर महिन्यापासून (पंतप्रधान म्हणून मोदी यांचे नाव घोषित झाल्यापासून) एप्रिल २०१४ पर्यंत अनुक्रमे ३५ टक्के आणि ४३ टक्के वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमधे ही नको ती जोखीम घेण्यापेक्षा जुन्या योजनेमधे पसे तसेच राहू दिले असते तर ते जास्त व्यवहारिक होईल. ती नवीन योजना जर खुल्या स्वरूपाची (Open Ended Scheme) असती तर पाच ते सात वर्षांच्या कालावधीचा विचार करून त्यामध्ये जुन्या अबक सेन्सेक्सच्या योजनेमधील काही युनिट्सची विक्री करून मिळणारे पसे गुंतविणे जास्त उचित झाले असते.
ही झाली विक्रेत्यांने सुचविलेल्या मार्गाने केलेली गुंतवणूक. सर्वसाधारण गुंतवणूकदार स्वत:च्या विचारांनी गुंतवणूककरताना एका मोठय़ा गरसमजाचा बळी ठरत असतो. त्याच्या मते ज्या योजनेचा एनएव्ही सर्वात जास्त, त्या योजनेची कामगिरी सर्वात चोख. प्रत्यक्षात तसे नसते. गुंतवणुक करताना फक्त आजचाच एनएव्ही विचारात घेऊन चालत नाही. अशा प्रकारात फसगत होण्याची शक्यता असते. आजच्या एनएव्हीची भूतकाळामधील एनएव्हीबरोबर तुलना करून त्या योजनेची कामगिरी कशी आहे, याचा अभ्यास केला तरच योग्य निर्णय घेता येतो. हा सर्व खटाटोप केल्यानंतरही त्या क्षेत्रामधील एक नव्हे तर दोन तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर तर्कसंगत गुंतवणूक होण्यास मदत होते.