नीलेश साठे

कोविडच्या दुसऱ्या लाटेत चाळिशी-पन्नाशीच्या आसपास असणाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या भोवती बघायला मिळाली. हे वय इतकं अडनिडं आहे की कौटुंबिक जबाबदाऱ्या पार झालेल्या नसतात की मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक किंवा बचत देखील उपलब्ध नसते. अशा कुटुंबाचे पुढे कसे होणार या कल्पनेने आपण हळहळतो. मात्र दुर्दैवाने आपल्यावर जर अशी वेळ आली तर? आपण तरी कुटुंबाची आर्थिक सोय करून ठेवली आहे? असे प्रश्न आपण स्वत:ला कधी विचारत नाही. Make hay while the Sun shines  हे शालेय शिक्षणात आपण शिकतो. पण व्यक्तिगत जीवनात त्याची अंमलबजावणी करण्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो ही वस्तुस्थिती आहे. एखादा अपघात झालेला बघितल्यावर तिथे उपस्थित असलेला कुणीतरी जितक्या सहजतेने जखमी व्यक्तीला ‘काय रे, विमा आहे का?’ असा प्रश्न विचारतो, तितक्या सहजतेने असा अपघात बघण्यापूर्वी त्या व्यक्तीने स्वत:लासुद्धा हा प्रश्न विचारलेला नसतो.

किती रकमेचा विमा हवा?

घरातील कर्त्यां व्यक्तीचे आपल्या कुटुंबाप्रति उत्तरदायित्व हे कुटुंबाच्या आजच्या गरजा भागवणे हे तर असतेच पण भविष्याची तरतूद करणे हेही असते.

एक लहानसे उदाहरण घेऊ. समजा आपल्याला महिन्याभराच्या कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जायचे आहे. जाण्यापूर्वी आपण पत्नीला विचारतो, ‘तुला घरखर्चासाठी किती रक्कम ठेवून जाऊ?’ विमा किती रकमेचा घ्यायला हवा हे ठरवताना या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे आहे. समजा ती म्हणाली, ‘दहा हजार रुपये पुरतील’, तर याचा अर्थ आपल्या पश्चात कुटुंबाला मासिक १०,००० रुपयांची तरतूद आपण करून ठेवायला हवी. आजचा सहा टक्के व्याजदर लक्षात घेता, किमान २० लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवली तर त्या रकमेच्या व्याजातून आजचा घरखर्च भागू शकेल. पण वाढत जाणाऱ्या महागाईचा विचार करता तसेच मुलांची शिक्षणे, आजारपणे अशा आकस्मिक खर्चाचा विचार करता, ढोबळ मानाने ही रक्कम ३० लाख रुपये असली तर योग्य होईल. अर्थात आपल्या जीवितावरील विमा हा ३० लाख रुपये इतक्या रकमेचा हवा.

सॉलोमन ह्य़ुबनर नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने मानवी जीवन मूल्य कसे काढायचे याची पद्धत रूढ केली. त्यात व्याजाचे दर, प्राप्तिकराचे दर, महागाई वृद्धीचा दर अशा महत्त्वाच्या घटकांचा विचार करून मानवी जीवन मूल्य काढता येते. ढोबळ मानाने कोणाही कमावत्या व्यक्तीचा मासिक उत्पन्नाच्या शंभर ते एकशे पन्नास पट रकमेचा विमा असायला हवा. वर दिलेल्या उदाहरणात त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न पंधरा ते वीस हजार रुपये असले पाहिजे हे गृहीत धरले आहे आणि त्याला पंचवीस ते तीस लाखांचा विमा आवश्यक ठरतो.

विमा हप्ता किती हवा?

वीस हजार रुपयांचे मासिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीने ५०० रुपये ते १,००० रुपये  किंवा मासिक उत्पन्नाच्या दोन टक्के ते पाच टक्के रक्कम विमा हप्त्यापोटी राखून ठेवावी. तेवढय़ा रकमेत या व्यक्तीचा २५ ते ३० लाखांचा ३० ते ३५ वर्षे मुदतीचा मुदत-विमा (Term Insurance) सहज होतो.

तरुणांनी नोकरीला लागल्यावर किंवा व्यवसायात उत्पन्न मिळू लागल्यावर मानवी जीवन मूल्याचा विचार करून आधी मुदत विमा घ्यावा आणि जसजसे उत्पन्न वाढत जाईल, त्यानुसार विम्याची रक्कम वाढवत जावी. शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य रकमेचा विमा आहे ना याची खात्री करून घ्यावी. या प्रकारचा विमा, एजंटमार्फत तर घेता येतोच पण ऑनलाइन म्हणजे एजंटच्या मध्यस्थीशिवाय थेट स्वरूपात आणि जरासा स्वस्त दरानेही घेता येतो.

बचत संलग्न विमा घेण्यापूर्वी मुदत विमा घ्यावा. अनेकांना खर्चीक स्वभावामुळे किंवा आर्थिक गैरशिस्तीमुळे गुंतवणूक करणे जमत नाही. अशांनी बचत संलग्न विमा योजनांचा विचार करावा. असा विमा घेताना आयुष्यातील कुठल्या टप्प्यावर आपल्याला किती रक्कम लागण्याची शक्यता आहे याचा विचार करून असा विमा प्रकार घ्यावा. जसे, समजा आज आपले मूल पाच वर्षांचे आहे तर त्याच्या कॉलेजचा खर्च १०-१२ वर्षांनी उभा राहील. तेव्हा विम्याची मुदत तेवढीच ठेवावी. विम्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी आपण दरमहा उत्पन्नाच्या १० ते २० टक्के रक्कम बाजूला काढणे गरजेचे आहे. विमा घेणे जसे जरुरीचे आहे तसेच योग्यवेळी विम्याचा हप्ता भरून विमा पॉलिसी बंद पडू न देणेही आवश्यक आहे.

विम्यातील बचतीवरील प्राप्ती-दर

विम्याच्या गुंतवणुकीवर मिळणारा प्राप्ती-दर कमी असतो अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र हीच अशी एक गुंतवणूक आहे की जी मृत्यूपरांत गुंतवणुकीच्या अगदी ५० टक्के काय कधी ५०० टक्के पण उत्पन्न देऊ  शकते. मात्र एवढा जास्त प्राप्ती-दर मिळावा अशी कोणीच अपेक्षा करत नाही. बचतीच्या विम्याच्या योजना मात्र घसरते. व्याजदर लक्षात घेता, ५ ते ६ टक्के दराहून अधिक रक्कम मुदतीशेवटी देऊ  शकत नाहीत. युलिप या प्रकारात गुंतवणूक केल्यास उत्पन्नाचा दर वाढण्याची शक्यता असते पण तसाच तो कमी होण्याचीपण शक्यता नाकारता येत नाही.

आयुर्विमा आणि इतर बचतीच्या योजनांतील मूलभूत फरक असा की विमेदाराला मृत्यू झाल्यास विम्याची संपूर्ण विमा रक्कम (बोनससहित) मिळण्याची हमी असते. मात्र इतर बचत योजनांमध्ये केवळ बचतीची रक्कम व्याजासह मिळते.

आयुर्विम्यामुळे अनिवार्यपणे आपली बचत होत जाते. विम्याचा हप्ता पगारातून वळता करायची सोय बऱ्याच कार्यालयात असल्याने ही रक्कम वजा होऊनच पगार हाती पडल्याने, अजाणतेपणे काटकसरीला प्रोत्साहन मिळते. दीर्घकालीन बचतीचे लाभही अधिक असतात. महागाई वाढत जाते पण विम्याचा हप्ता मात्र विम्याची मुदत संपेपर्यंत तेवढाच असतो, महागाई वाढली म्हणून विमा हप्ता काही वाढत नाही. त्यामुळे विमा पॉलिसीचा हप्ता सुरुवातीच्या काळात उत्पन्नाच्या जरी २० टक्के असला, तरी उत्पन्न वाढत असल्याने काही वर्षांनी हप्ता भरणे, काटकसर न करताही शक्य होते आणि सातत्याने बचत झाल्याने, विमा-मुदतीच्या शेवटी भली मोठी रक्कम हाती येते.