scorecardresearch

करावे कर-समाधान : ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायद्यातील सवलती.. 

ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यासाठी प्राप्तिकर कायद्यतील उपलब्ध सवलती समजून घेतल्यास त्यांची रोकड सुलभता वाढेल आणि अडचणीच्या वेळी त्यांना नक्कीच उपयोग होईल.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

वैद्यकीय खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ, घटणारे व्याजदर, महागाई यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालणे कठीण जात आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यासाठी प्राप्तिकर कायद्यतील उपलब्ध सवलती समजून घेतल्यास त्यांची रोकड सुलभता वाढेल आणि अडचणीच्या वेळी त्यांना नक्कीच उपयोग होईल.

वैद्यकीय खर्चात होणारी वाढ, घटणारे व्याजदर, महागाई, वगैरे कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालणे कठीण जात आहे. शिवाय छोटय़ा कुटुंबामुळे किंवा परदेशात नोकरी-धंद्यानिमित्ताने स्थायिक झालेल्या मुलांमुळे एकटय़ा पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवंचनेत भर पडली आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना, वयोश्रेष्ठ सन्मान, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, वगैरे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालविल्या जाणाऱ्या योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात सवलती दिल्या आहेत जेणेकरून त्यांची रोकड सुलभता वाढेल आणि अडचणीच्या वेळी त्यांना त्याचा उपयोग होईल.

प्राप्तिकर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ६० वर्षे ते ८० वर्षे वय असणारे ज्येष्ठ नागरिक आणि दुसरे ८० वर्षांपेक्षा जास्त अति-ज्येष्ठ नागरिक. कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये इतकी आहे. ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. वैद्यकीय खर्चासाठी अतिरिक्त वजावट, व्याजाची अतिरिक्त वजावट ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नातून घेता येते. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या करदात्यांना ठरावीक प्रकारचे उत्पन्न असल्यास विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अति ज्येष्ठ नागरिकांना विवरणपत्र फॉर्म १ आणि फॉर्म ४ कागदी स्वरूपात (ऑफलाइन) दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. ते संगणकाद्वारे ऑनलाइन पद्धतीनेदेखील विवरणपत्र दाखल करू शकतात.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न, वजावट भरावा लागणारा कर, विवरणपत्र याविषयीच्या शंकांचे निरसन खालील प्रश्नोत्तराद्वारे होईल :

* प्रश्न : माझे वय ६५ वर्षे आहे मागील तीन वर्षांपासून मी परदेशात स्थायिक आहे. माझे भारतामध्ये घरभाडे आणि व्याजाचे एकूण ४ लाख रुपयांचे उत्पन्न आहे. या उत्पन्नातून वजावटी जाता करपात्र उत्पन्न २ लाख रुपये आहे. या उत्पन्नावर उद्गम कर कापला जातो. मला विवरणपत्र भरावे लागेल का? उद्गम कर मला वाचविता येईल का? यश कारेकर, पुणे

उत्तर : आपण अनिवासी भारतीय असल्यामुळे आपल्यासाठी कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा, आपले वय ६५ वर्षे असले तरी, २,५०,००० रुपयेच आहे. आपले वजावटीपूर्वी उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे आपल्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येईल. आपल्या उत्पन्नावर देय कर नसल्यास प्राप्तिकर खात्याकडे अर्ज करून तो न कापण्याचा आदेश आपण मिळवू शकता.

* प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझे पेन्शन आणि व्याजाचे उत्पन्न आहे. मी २०२१-२२ या आर्थिक वर्षांत घर विकले आणि मला २५ लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. इतर उत्पन्न विचारात घेता माझे करदायित्व ६ लाख रुपयांपर्यंत आहे. मला हा कर कधी भरावा लागेल? त्यावर व्याज भरावे लागेल का?

अनिता गोखले, महाड

उत्तर : आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपल्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाचा समावेश नसल्यामुळे आपल्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. हा कर आपण विवरणपत्र भरण्याच्या पूर्वी म्हणजे जुलै, २०२२ पूर्वी भरू शकता. मात्र त्यानंतर हा कर भरल्यास व्याज भरावे लागेल.

* प्रश्न : माझे वय ७० वर्षे आहे. माझे व्याज आणि पेन्शन मिळून एकूण उत्पन्न ६,५०,००० आहे. माझे वय बघता मी कर बचतीच्या गुंतवणुका करत नाही. मी नवीन कर प्रणालीचा पर्याय निवडू शकतो का? मला तो फायदेशीर आहे का? एक वाचक

उत्तर : आपल्याला व्याजाच्या उत्पन्नातून ‘कलम ८० टीटीबी’नुसार ५०,००० रुपये आणि पेन्शनमधून ५०,००० रुपयांची वजावट, पारंपरिक प्रणालीने (वजावटी घेऊन) कर भरल्यास घेता येईल आणि त्यानुसार आपले करपात्र उत्पन्न ५,५०,००० रुपये इतके असेल आणि त्यावर एकूण २०,८०० रुपये (४ टक्के शैक्षणिक कर धरून) कर भरावा लागेल (प्रथम ३ लाख रुपयांवर कर नाही, ३ लाख ते ५ लाख रुपयांवर ५ टक्के म्हणजे १०,००० आणि बाकी ५०,००० रुपयांवर २० टक्के म्हणजे १०,००० रुपये असा २०,००० रुपये कर आणि ४ टक्के शैक्षणिक अधिभार ८०० रुपये असा एकूण २०,८०० रुपये). आणि नवीन कर प्रणालीने आपले उत्पन्न ६,५०,००० रुपये असेल आणि त्यावर आपल्याला एकूण २८,६०० रुपये कर भरावा लागेल. (प्रथम २,५०,००० रुपयांवर कर नाही, २,५०,००० ते ५ लाख रुपयांवर ५ टक्के म्हणजे १२,५०० आणि बाकी १,५०,००० रुपयांवर १० टक्के म्हणजे १५,००० रुपये असा २७,५०० कर आणि ४ टक्के शैक्षणिक अधिभार १,१०० रुपये असा एकूण २८,६०० रुपये). आपल्याला पारंपरिक कर प्रणालीनुसार कमी कर भरावा लागत असल्यामुळे आपल्याला तो फायदेशीर आहे. आपण नवीन कर प्रणालीचा स्वीकार केल्यास कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २,५०,००० इतकीच असते.

*  प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझा ‘मेडिक्लेम’ विमा नाही. माझा वैद्यकीय उपचारासाठी बराच खर्च २०२१-२२ या वर्षांत झाला आहे. मला या खर्चाची वजावट उत्पन्नातून घेता येईल का? संदीप कदम, मालाड

उत्तर : ‘कलम ८० डी’नुसार वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या खर्चाची (फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी) ५०,००० रुपयांपर्यंत वजावट करदाता घेऊ शकतो. हा खर्च रोखीने केल्यास याची वजावट करदाता घेऊ शकत नाही. याशिवाय ‘कलम ८० डीडीबी’नुसार ठरावीक रोगाच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाची वजावट मिळते. या रोगांमध्ये न्युरोलॉजिकल रोग, घातक कर्करोग, क्रॉनिक रेनल फेलुअर, एड्स, हेमेटोलॉजिकल विकार, वगैरे रोगांचा समावेश होतो. या कलमानुसार ज्येष्ठ नागरिकांना अटींची पूर्तता केल्यास १ लाख रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते.

* प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांना व्याजाच्या उत्पन्नातून कोणत्या सवलती मिळतात? शर्मिला कुलकर्णी, मुंबई

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कलम ८० टीटीबी’नुसार बँक, पोस्ट ऑफिसकडून मिळालेल्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते. या व्याजामध्ये बचत खाते, मुदत ठेव, आवर्त ठेव वगैरे व्याजाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मिळालेल्या व्याजाची वजावट या कलमाद्वारे मिळत नाही. उदा. कंपन्यांच्या ठेवींवर, किंवा इतर व्यक्तींकडून मिळालेले व्याज हे या कलमानुसार वजावटीला पात्र नाही. ही वजावट फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. ज्येष्ठ अनिवासी भारतीय ‘कलम ८० टीटीए’नुसार बचत खात्याच्या व्याजावर १०,००० रुपयांपर्यंतची वजावट उत्पन्नातून घेऊ शकतात.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Income tax benefits for senior citizens zws

ताज्या बातम्या