scorecardresearch

करावे कर-समाधान : गृहकर्जावरील व्याजाची वजावट

घर भाडय़ाने दिले नसले तरी ते भाडय़ाने दिले आहे असे समजून घरभाडे उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणून त्यावर कर भरावा लागत होता.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

गृहकर्जावरील घटता व्याजदर, मुलांसाठी किंवा आई-वडिलांसाठी घर किंवा ‘सेकण्ड होम’, वगैरे कारणासाठी दुसऱ्या घरात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्यादेखील वाढते आहे. अशा घरांच्या गुंतवणुकीवर कर किती भरावा लागतो आणि कोणत्या वजावटी मिळतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.

मागील वर्षांपासून करदाता दोन घरे ‘राहती घरे’ म्हणून दाखवू शकतो. त्यापूर्वी फक्त एकच घर ‘राहते घर’ म्हणून दाखवू शकत होता. म्हणजे दुसरे घर भाडय़ाने दिले नसले तरी ते भाडय़ाने दिले आहे असे समजून घरभाडे उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणून त्यावर कर भरावा लागत होता. आता करदात्याकडे दोन घरे असतील आणि दोन्ही घरे भाडय़ाने दिलेली नसतील तर करदात्याला घरभाडे उत्पन्न दाखवावे लागणार नाही आणि कर भरावा लागणार नाही. परंतु या दोन्ही घरांसाठी गृहकर्ज घेतले असेल तर व्याजाच्या वजावटीची एकूण मर्यादा २ लाख रुपये (किंवा कर्ज १ एप्रिल १९९९ पूर्वी घेतले असेल तर ३०,००० रुपये) इतकी असेल. गृहकर्जाच्या मुद्दल परतफेडीची दीड लाख रुपयांपर्यंत वजावट ‘कलम ८० सी’ नुसार घेता येते. गृहकर्ज संयुक्त नावाने घेतल्यास प्रत्येकासाठी या तरतुदी लागू होतील. अशा वजावटी घेण्यासाठी घरामध्ये सहमालक आणि गृहकर्जसुद्धा सहकर्जदार असणे गरजेचे आहे.

प्रश्न : माझ्याकडे दोन घरे आहेत. एका घरात मी राहतो आणि दुसरे घर मी भाडय़ाने दिले आहे. मला दरमहा २०,००० रुपये इतके भाडे मिळते. या दोन्ही घरांवर मी गृहकर्ज घेतले आहे. माझ्या राहत्या घराच्या गृहकर्जावर मी १,४०,००० रुपये व्याज भरले आणि दुसऱ्या घराच्या (जे भाडय़ाने दिले आहे) गृहकर्जावर ५,१०,००० रुपये व्याज भरले, मला व्याजाची किती वजावट मिळेल?

प्रशांत पंडित, ठाणे

उत्तर : राहत्या घरावर घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीची मर्यादा २ लाख रुपये इतकी आहे (कर्ज १ एप्रिल १९९९ पूर्वी घेतले असेल तर ३०,००० रुपये). आपण राहत्या घरावर घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची म्हणजेच १,४०,००० रुपयांची वजावट आपण घेऊ शकता (कर्ज १ एप्रिल १९९९ पूर्वी घेतले असेल तर ३०,००० रुपये). जे घर भाडय़ाने दिले आहे त्यासाठी ही २ लाख किंवा ३०,००० रुपयांची मर्यादा नाही. त्यामुळे आपण दिलेल्या ५,१०,००० रुपयांच्या व्याजाची वजावट घरभाडे उत्पन्नातून घेऊ शकता. ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरात तोटा असेल तर फक्त २ लाख रुपयांपर्यंतचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, बाकीचा तोटा पुढील आठ वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करावा लागतो आणि पुढील वर्षांत तो फक्त ‘घरभाडे उत्पन्नातून’च वजा करता येतो.

प्रश्न : मी जून २०१२ मध्ये माझ्या मित्राच्या खासगी कंपनीच्या समभागांमध्ये दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आता हे समभाग माझा मित्र माझ्याकडून २५ लाख रुपयांना खरेदी करत आहे. यावर मला कर भरावा लागेल का? असेल तर किती? कर वाचविण्यासाठी काही पर्याय आहेत का?

सूर्यकांत मानकर, पुणे

उत्तर : आपण समभाग खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांनी (हे समभाग शेअरबाजारात सूचिबद्ध नसल्यामुळे) विकत असल्यामुळे ही संपत्ती दीर्घ मुदतीची आहे आणि त्यावर होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा आहे. आपण महागाई निर्देशांकाचा (इंडेक्सेशन) फायदा घेऊ शकता. हे समभाग आपण २०२१-२२ या आर्थिक वर्षांत विकले तर, महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य ३,१७,००० रुपये इतके असेल (२०१२-१३ या आर्थिक वर्षांचा निर्देशांक २०० आणि २०२१-२२ या वर्षांचा ३१७ आहे त्यामुळे खरेदी मूल्य २ लाख गुणिले ३१७ भागिले २००). आपल्याला दीर्घमुदतीचा भांडवली नफा २१,८३,००० रुपये इतका झाला (विक्री किंमत २५ लाख रुपये वजा खरेदी मूल्य ३,१७,००० रुपये) या नफ्यावर २० टक्के दराने (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) इतका कर भरावा लागेल. हा कर वाचविण्यासाठी संपूर्ण विक्री रक्कम नवीन घरात गुंतवावी लागेल. यासाठी इतर अटींची पूर्तता केल्यास वजावट मिळू शकेल.

प्रश्न : माझे वय ६६ वर्षे आहे. मी अनिवासी भारतीय आहे. या वर्षी मी १९९१ मध्ये खरेदी केलेले सोने विकले या विक्रीत मला २,२५,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला (महागाई निर्देशांक विचारात घेऊन) भारतात याव्यतिरिक्त माझे ४०,००० रुपयांचे मुदत ठेवींवरील व्याजाचे आणि बचत खात्यावरील व्याजाचे ५,००० रुपयांचे उत्पन्न आहे. मला विवरणपत्र आणि कर भरावा लागेल का?

सुरेश काळे, नाशिक

उत्तर : आपले एकूण उत्पन्न २,७०,००० रुपये इतके आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त असते. परंतु आपण अनिवासी भारतीय असल्यामुळे आपल्यासाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच आहे. आपले उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरावेच लागेल. बचत खात्यावरील व्याजाच्या उत्पन्नावर ‘कलम ८० टीटीए’नुसार १०,००० रुपयांपर्यंत वजावट घेता येते. त्यामुळे ५,००० रुपयांची वजावट आपल्याला घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ‘कलम ८० टीटीबी’नुसार ५०,००० रुपयांपर्यंतची वजावट आपण अनिवासी भारतीय असल्यामुळे घेता येणार नाही. त्यामुळे आपले करपात्र उत्पन्न २,६५,००० रुपये इतके असेल. अनिवासी भारतीयांना दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे फक्त व्याजाच्या उत्पन्नासाठी फायदा घेता येईल. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर म्हणजेच २,२५,००० रुपयांवर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार), ४६,८०० रुपये इतका कर भरावा लागेल.

प्रश्न : मी नोकरी करतो. मला या वर्षी समभागातील गुंतवणुकीतून खूप तोटा झाला. हा तोटा मला पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येईल का?

एक वाचक, अंधेरी

उत्तर : पगाराच्या उत्पन्नातून फक्त ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील तोटा (फक्त दोन लाख रुपयांपर्यंत) वजा करता येतो आणि इतर सदरातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही. आपल्या गुंतवणुकीवर झालेला भांडवली तोटा हा फक्त भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. दीर्घ मुदतीचा तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या नफ्यातूनच वजा करता येतो आणि अल्प मुदतीचा तोटा हा अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या नफ्यातून वजा करता येतो. आपल्याला झालेला तोटा आपण विवरणपत्र मुदतीत दाखल केले तर पुढील वर्षांसाठीदेखील कॅरी-फॉरवर्ड करता येईल.  

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Income tax saving investments tax saving options zws

ताज्या बातम्या