वसंत कुळकर्णी
चलनवाढीचा भडका, ढासळता रुपया आणि बाजारातील अस्थिरता या पार्श्वभूमीवर फ्रँकलिन टेम्पलटनचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) आनंद राधाकृष्णन यांच्याशी झालेली बातचीत सामान्य गुंतवणूकदारांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरावी..

जगात सर्वत्रच महागाई वाढत असल्याने जगातील सर्वच देशांना महागाईचे ओझे वाटू लागले आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेच्या किरकोळ आधारभूत किंमत निर्देशांकात ८.३७ टक्क्यांची वाढ झाली. ही चलनवाढ अमेरिकेतील ४० वर्षांतील उच्चांक गाठणारी आहे. करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि ऊर्जेचा पुरवठा शृंखला बाधित झाल्याने त्यावरील खर्च वाढलाच होता, तर पुढे युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे महागाई आणखी वाढली आहे. ‘युनो’च्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मासिक अन्न किंमत निर्देशांकात, (जे जागतिक स्तरावर अन्न वस्तूंच्या किमतींचा मागोवा घेतात) जानेवारी ते मार्चदरम्यान ऐतिहासिक १२.६८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या निर्देशांकाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे १९९० सालापासूनची ही सर्वोच्च वाढ आहे. या पार्श्वभूमीवर फ्रँकलिन टेम्पलटनचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) आनंद राधाकृष्णन यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा गोषवारा.

gst on food served in cinema hall
चित्रपटगृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय
Indian Currency_Currency Ban_Loksatta
विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…
Boeing layoffs 2023
जगभरात नोकरकपातीचं संकट; Google, Amazon नंतर प्रसिद्ध एअरक्राफ्ट कंपनी २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
idbi bank
आयडीबीआय बँकेसाठी सप्टेंबपर्यंत बोली अपेक्षित

सध्याच्या बाजाराबाबत आपला दृष्टिकोन काय?
बाजारातील घसरणीला देशांतर्गत घटकांपेक्षा जागतिक घटक जास्त कारणीभूत आहेत. करोनाकाळात लोकांनी कर्ज घेऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी जगातील सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर नेऊन ठेवले. करोना आटोक्यात आल्यावर जागतिक चलनवलन करोनापूर्व पातळीवर येत आहे. विपुल रोकड सुलभता आणि नीचांकी व्याजदरामुळे महागाई वाढू लागली. परिणामी, सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी रोकड सुलभता कमी करण्यावर आणि व्याजदर वाढविण्याचे सत्र आरंभलेले दिसत आहे. करोनाकाळातील धोरणांमुळे अनेक देशांची वित्तीय तूट वाढत आहे अमेरिकेची वित्तीय तूट ४ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर गेली आहे.

करोनाकाळात राबविलेल्या रोकडसुलभ धोरणांमुळे जरी वृद्धीदरात वाढ झाली तरी त्याचा दुष्परिणाम म्हणजे महागाई वाढली. आता स्थिती अशी आहे की, अमेरिकेत महागाई वाढून ७ टक्क्यांवर म्हणजे ४० वर्षांच्या शिखरावर पोहोचली, तर वृद्धीदर १.५ टक्केच राहिला आहे. भारतात अमेरिकेइतकी गंभीर परिस्थिती नसली तरी महागाई दरात वाढ आणि खालावलेला वृद्धीदर अशी ‘स्टॅगफ्लेशन’ची परिस्थिती येथेही आहे. साहजिकच भारताच्या मध्यवर्ती बँकेला व्याजदर वाढवून महागाईवर काबू मिळविण्याची गरज निर्माण झाली. परंतु भारत आणि अमेरिकेच्या समष्टी अर्थशास्त्रीय परिस्थितीत मोठा फरक आहे. अमेरिकेत वित्तीय तूट वाढू लागली तर भारतात महागाई वाढूनदेखील वित्तीय तूट नियंत्रणात राहिली. याचे मुख्य कारण म्हणजे पाश्चात्त्य देशांनी करोनाकाळात खर्चासाठी हात सैल सोडला तसा भारताने मर्यादित खर्चाचे धोरण स्वीकारले. परिणामी वित्तीय तूट नियंत्रणात राहिली.
भारतातील महागाई मुख्यत जिन्नसांच्या वाढत्या किमतींमुळे आहे. मुख्यत: हे जिन्नस आयात केले जातात. म्हणून भारतातील महागाईला ‘इम्पोर्टेड इन्फ्लेशन’ (आयातीमुळे वाढलेली महागाई) असे म्हणता येईल. खनिज तेल, धातू आणि काही कृषी जिन्नस यांच्यामुळे वाढलेली महागाई आहे. भारतातील महागाई ही ‘डिमांड पुश इन्फ्लेशन’ प्रकारची नाही. इंधन वगळता ॲल्युमिनियम, पोलाद, तांबे इत्यादी जिन्नसांचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध समाप्ती दृष्टिपथात आल्यावर इंधनाच्या किमती कमी होऊ लागतील. त्यामुळे भारतातील महागाई ही ‘ट्रान्झिटरी इन्फ्लेशन’ प्रकारची आहे. त्यामुळे सहा महिने ते नऊ महिन्यांच्या कालावधीत महागाई पूर्ववत पाच टक्क्यांच्या आत आणि वृद्धीदर सात टक्क्यांदरम्यान झालेला दिसेल. एकंदरीत जगातील परिणामांमुळे भारतीय बाजारात घसरण झाली आहे.

सद्य:स्थितीत लक्षणीय उद्योग क्षेत्रे कोणती?
बँकिंग आणि वित्तीय सेवा, सिमेंट, भांडवली वस्तू, वाहन उद्योग याबाबतीत आम्ही आशावादी असून, मानदंड सापेक्ष या क्षेत्रात आमच्या गुंतवणुकीचे प्रमाण अधिक आहे. तर धातू, माहिती तंत्रज्ञान, निर्यात प्रधान उद्योग यांचे प्रमाण आम्ही मानदंड सापेक्ष कमी केले आहे. उपभोग्य वस्तू (कंझम्प्शन), आरोग्य निगा यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी असले तरी टप्प्याटप्याने मूल्यांकनाचा विचार करून या उद्योगातील गुंतवणूक मानदंडाइतकी करण्याचे आमचे धोरण आहे.

‘फ्रँकलिन टेम्पलटन ब्लू चिप’ची कामगिरी दिवसेंदिवस खालावलेली दिसत होती. मागील दोन तिमाहीत किंचित सुधारणा झालेली दिसत आहे. त्याबद्दल विस्ताराने सांगू शकाल काय?

‘फ्रँकलिन टेम्पलटन ब्लू चिप’ची कामगिरी खालावलेली होती. २०१९-२० मध्ये केलेल्या आमच्या गुंतवणुकांनी म्हणावी तशी वृद्धी दाखवली नाही. तसेच निर्देशांकात ज्यांचा प्रभाव आहे अशा दोन कंपन्यांत आम्ही निर्देशांकसापेक्ष कमी प्रमाण राखल्याची झळ आम्हाला बसली. परिणामी, आमच्या फंडाचा परतावा लार्ज कॅप फंड गटात बाधित झाला. जून २०२० दरम्यान आम्ही आमच्या चुका सुधारल्या. त्यामुळे तुम्हाला या फंडाच्या कामगिरीत सुधारणा झालेली दिसत आहे. एक वर्ष आणि दोन वर्षे कालावधी परताव्यात मोठी सुधारणा झाली आहे. तीन वर्षे कालावधीच्या परताव्यात सुधारणा होण्यास थोडा वेळ लागेल. एखाद्या वर्षांनंतर आमचा फंड चांगला परतावा देणाऱ्या आघाडीच्या फंडात आलेला दिसेल.

shreeyachebaba@gmail. com
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.