अतुल कोतकर atulkotkar@yahoo.com

जुलै-सप्टेंबर २०२१ या सरलेल्या तिमाहीचा आढावा घेताना, करसवलतीस पात्र म्युच्युअल फंड (ईएलएसएस) गटातील ‘निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड’ त्याच्या कामगिरीतील सुधारणेमुळे लक्षवेधी फंड ठरला. ज्या फंडांच्या तिमाही कामगिरीची विशेष दखल घ्यायला हवी, त्यापैकी ‘निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड’ हा एक फंड आहे. निधी व्यवस्थापकात झालेला बदल फंडाची कामगिरी सुधारण्यास कारणीभूत ठरला आहे. या आधी फंड व्यवस्थापनाची सूत्रे निधी व्यवस्थापक संजय पारेख आणि आशुतोष भार्गव यांच्याकडे होती. आता १ जुलैपासून संजय पारेख यांच्याऐवजी रुपेश पटेल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली आहेत. या निर्णयाची सकारात्मकता फंड कामगिरीत उमटली असल्याने या फंडाची गुंतवणुकीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

पूर्वीचे निधी व्यवस्थापक अश्विनी कुमार यांच्या गुंतवणूक शैलीमुळे फंडाची कामगिरी खालावली होती. मात्र नवीन व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली फंडाची कामगिरी अधिक सातत्यपूर्ण होणे अपेक्षित आहे. रुपेश पटेल हे टाटा फंड घराण्यातून निप्पॉन फंड घराण्यात दाखल झाले आहेत. टाटा फंड घराण्यात ते निधी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना ते पाहत असलेल्या फंडांची कामगिरी समाधानकारक असल्याने आता या फंडाची दीर्घकालीन कामगिरी देखील समाधानकारक राहण्याची आशा आहे. गुंतवणुकीसाठी फंडाची रणनीती वाजवी-मूल्यांकन व वाजवी-वाढ (ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राईस) असे अबाधित आहे. फंडाच्या गुंतवणूक शैलीत झालेल्या बदलाच्या अंतर्गत. पोर्टफोलिओचीही मानदंडांला अनुरूप पुनर्रचना करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, रुपेश पटेल यांची खासगी बँकांना असलेली पसंती त्यांच्या पोर्टफोलिओच्या रचनेत स्पष्टपणे दिसून येते. शिवाय मानदंड संरेखनाचा परिणाम लार्ज कॅप/मिड कॅप समतोल राखण्यात होतो. पटेल यांनी ‘निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर’ फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून सूत्रे स्वीकारली तेव्हा पोर्टफोलिओत लार्ज कॅपची मात्रा ७२ टक्के होती. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या लार्ज कॅपची मात्रा ७९ टक्के आहे.

गेल्या तीन वर्षांत निप्पॉन इंडिया फंड घराण्याच्या गुंतवणूक चमूत मोठे बदल झाले. मनीष गुणवानी यांनी सुनील सिंघानिया यांच्याकडून समभाग गुंतवणूक प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. निप्पॉन लाईफने रिलायन्स म्युच्युअल फंडाचे २०१९ मध्ये अधिग्रहण केले. या अधिग्रहणानंतर जोखीम व्यवस्थापनावर अधिक लक्ष दिल्याने जोखीम व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाले. फंड घराण्याकडे अनुभवी व्यवस्थापकांचा ताफा असला तरी परिस्थितीजन्य बदलांमुळे या फंड घराण्याच्या फंडांच्या कामगिरीत दीर्घकालीन सातत्य दिसेल अशी आशा आहे.

निधी व्यवस्थापनातील स्पष्ट गुणात्मक बदल गुंतवणुकीसाठी समभाग निवड प्रक्रियेला अधोरेखित करतो. नवनियुक्त निधी व्यवस्थापक रुपेश पटेल कंपनीच्या व्यवस्थापनाची गुणवत्ता, तंत्रज्ञान, अनुकूल सुरक्षितता (मार्जिन ऑफ सेफ्टी), आपल्या उत्पादनांची किंमत ठरविण्याची उपजत क्षमता या घटकांनुसार रणनीती ठरवत आले आहेत. जी कंपनी आपल्या व्यवसाय क्षेत्रात नेतृत्व करते अशा कंपनीची ‘बॉटम-अप’ पद्धतीने ते निवड करतात. त्यांच्या मानदंड जागरूक दृष्टिकोनामुळे पोर्टफोलिओमध्ये नवीन नावे समाविष्ट झाली आहेत. उदाहरणार्थ एसबीआय कार्ड्स, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसव्‍‌र्ह, महिंद्र अँड महिंद्र फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, बाटा इंडिया, रॅडिको खेतान, केएनआर कन्स्ट्रक्शन आणि ओरिएंटल सिमेंट या कंपन्यांचा नव्याने समावेश केला गेला आहे. या कंपन्यांचा समावेश करण्यामागे व्यवस्थापकाचे उद्दिष्ट भांडवली निर्देशांकातील सर्व उद्योग-व्यवसायात कमी अधिक प्रमाणात गुंतवणूक राखण्याचे आहे. मानदंडसापेक्ष उच्च मूल्यांकन असलेल्या कंपन्या खरेदी करून वैविध्य जपून जोखीम कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोन यातून

स्पष्ट होतो. दीर्घकालीन परतावा देणाऱ्या दर्जेदार नावांवर लक्ष केंद्रित करून अतिशय चाणाक्षपणे ‘बॉटम-अप’ पद्धतीने समभागांची निवड करण्याचा त्यांचा दृष्टिकोन या आधीच्या फंड घराण्यातील निधी व्यवस्थापनांत दिसून आला आहे. याच कारणांमुळे ‘ईएलएसएस’ फंड गटात मालमत्ता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला व वार्षिक कामगिरीच्या तुलनेत दुसऱ्या स्थानी असलेल्या या फंडाची शिफारस करण्यात येत आहे.

निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड

*  फंड गट :   ईएलएसएस

*  फंडाची सुरुवात : २१ सप्टेंबर २००५

*  फंड मालमत्ता : १२,४६७ कोटी (३० सप्टेंबर २०२१रोजी)

*  मानदंड: एस अ‍ॅण्ड पी बीएसई २०० टीआरआय

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)