वर्ष १९८१ मध्ये स्थापन झालेल्या नॅटको फार्मा मुख्यत्वे कर्करोगाशी (ओन्कॉलॉजी) निगडित उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत अमेरिकेत कोपाक्झोन, रेवलिमिड आणि तामिफ्लू इ. नवीन ड्रग अ‍ॅप्लिकेशन (एएनडीए) फाइल केले असून मायलन, अक्तावीस, ब्रेक्कन ब्रिजसारख्या जगातील काही मोठय़ा औषधी कंपन्यांबरोबर भागीदारी करारदेखील केले आहेत. भारताखेरीज ब्राझिल, व्हेनेजुएला आणि कॅनडामध्ये कंपनीने आपला व्यवसायाचा विस्तार केला आहे. अमेरिकेत नॅटकोची फार्मसीची रिटेल चेन आहे. ‘हेपेटायटिस सी’साठी डेक्लातस्वीर गोळ्यांचे उत्पादन करण्याचा परवाना मिळवणारी नॅटको फार्मा भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. नॅटडॅक आणि हेप्सिनात एल पी या ब्रँड खाली या गोळ्या लवकरच बाजारात उपलब्ध होतील. कंपनीने या उत्पादनासाठी गेल्याच आठवडय़ात मेडिसिन्स पेटंट पूल आणि ब्रिस्टॉल म्येर्स स्कीव्ब या कंपन्यांशी करार केला आहे. भारताखेरीज नेपाळ आणि इतर ११२ विकसनशील देशांतही कंपनी ही औषधे विकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी व्यवस्थापनाने स्टॉक एक्स्चेंजला नुकतेच कळविल्याप्रमाणे नॅटको आणि त्यांचे अमेरिकेतील भागीदार अलारगन यांनी सेलजेन या कंपनीशी सामंजस्य करून कोर्टातील वाद संपुष्टात आणला आहे. त्यामुळे २०२२ पासून कंपनी अमेरिकेत रेवील्मिड या जेनेरीक औषधाचे मर्यादित प्रमाणात उत्पादन करू शकेल. गेल्या पाच वर्षांत नक्त नफ्यात सरासरी २६% वाढ दाखवणारी नॅटको फार्मा ही सध्या एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. कंपनीचे मूल्यांकन आता थोडे जास्त वाटत असले तरीही पुढील आíथक वर्षांत कंपनी १,००० कोटी रुपयांची तर त्या पुढील आíथक वर्षांत कंपनी १,७०० कोटी रुपयांची उलाढाल साध्य करेल अशी अपेक्षा आहे. कंपनीचे यंदाच्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. ते कसेही असले तरी येत्या दोन वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नॅटको फार्माचा अवश्य विचार करा.

किंमत उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)मधून त्या कंपनीचा नफा प्रत्येक शेअरमागे किती आहे तो कळतो, तर किंमत उत्पन्न (प्राइस अìनग – पी/ई) गुणोत्तरामुळे इतर शेअर्सच्या तुलनेत आपला शेअर किती महाग वा स्वस्त आहे ते कळते.
समभागाचा बाजारभाव / प्रति समभाग उत्पन्न (Market price / EPS) = पी/ई
पी/ई गुणोत्तर जितके कमी तितका शेअर स्वस्त असे हे सोपे गुणोत्तर आहे. मात्र तुम्ही ज्या कंपनीच्या शेअरचे गुणोत्तर तपासत आहात त्या क्षेत्रातील इतर कंपन्यांचे गुणोत्तरदेखील तुलनेसाठी अभ्यासणे जरुरी आहे. जसे, पेपर उद्योगातील कंपन्यांचे सरासरी पी/ई सध्या १०.१ पट आहे. पण तुम्ही घेऊ पाहात असलेल्या त्या क्षेत्रातील कंपनीच्या शेअरचा पी/ई जर १५ पट असेल तर तो शेअर तुलनेत थोडा महाग मानायला हवा.

1

2

अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com