वसंत माधव कुळकर्णी

करोना संकटामुळे सध्या जगाची फेरमांडणी होत आहे. मग, त्यात वित्तीय नियोजनाचा अपवाद करून कसे चालेल? त्याचीही फेरआखणी झालीच पाहिजे. उत्पन्न कमी झाल्याने खर्चावर नियंत्रण हवे, बचतीवर नव्हे..

मागील आठवडय़ात अभय गानू यांचा फोन आला होता. एप्रिल महिन्याच्या पगारासोबत कंपनीने २५ टक्के वेतन कपात केल्याची मेल आल्याने काही एसआयपी बंद कराव्या अशा आशयाचा हा फोन होता. अभय आणि नेहा यांच्याशी २०१४ मध्ये भेट झाली होती. अभय पुण्यात एका अभियांत्रिकी कंपनीत नोकरीला तर नेहा माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकरीला. त्यांची आर्थिक वर्तणूक इतरांना उदाहरण द्यावे अशी आदर्श राहिली आहे.

मागील सात वर्षांत दरवर्षी वित्तीय नियोजनाचा आढावा घेणे हे एखाद्या कौटुंबिक वार्षिक कुळाचाराइतकेच त्यांच्या लेखी महत्वाचे. वार्षिक आढावा हा केवळ उपचार नसून योग्य ते बदल त्यांनी केले आहेत. या आढाव्याअंती आरोग्य विम्याचे छत्र वाढविणे किंवा शिल्लक गृहकर्जाच्या हप्त्यात वाढ करणे या सारख्या नियोजनातील किरकोळ बदलांव्यतिरिक्त सर्व काही सुरळीत चाललेले होते. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित झाली. व्यावसायिक नोकरदार कामगार सर्वांनाच करोनाने घरी बसण्यास भाग पाडले आहे. टाळेबंदी नक्की केव्हा संपेल, त्याचे परिणाम काय होतील या बाबत सर्वांच्या मनात अनिश्चितता आहे.

काही कंपन्यांनी एप्रिल महिन्याच्या पगारासोबत कोणाचे व्हेरिएबल पे, कोणाच्या प्रोत्साहनपर भत्यात (इन्सेंटिव्ह) कपात केली असल्याचे कळविण्यात आले आहे. हा पगार करोनापूर्व पातळीवर केव्हा जाईल, या आर्थिक वर्षांत कपात इतकीच असेल की पुढे आणखी कपात होईल याबाबत आज नेमकेपणा नाही. पगारात जसे ‘फिक्स्ड पे’ आणि ‘व्हेरिएबल पे’ असे दोन भाग असतात तसेच खर्चाचेसुद्धा असते. काही खर्च अत्यावश्यक म्हणून टाळता न येणारे तर काही टाळता येणारे किंवा पुढे ढकलता येणारे असतात. करोनापश्चात जगाची फेरमांडणी होत असल्याने ‘पुनश्च: हरि ओम’ म्हणत असताना आपल्या वित्तीय नियोजनकडे नव्याने पाहायला हवे.

पगारात २० टक्के कपात होत असेल तर खर्चातसुद्धा २० टक्के (किमान १० टक्के) कपात होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण समज असा आहे की, बचतीत २० टक्के कपात केली की जमा खर्चाचा ताळमेळ जुळविता येईल. पण हे गणित इतके सोपे मुळीच नाही.

खर्चाचे नियोजन करीत असताना मुलांचे शैक्षणिक शुल्क, गृह कर्जाचा हप्ता हे न टाळता येणारे किंवा बचतीला फार वाव नसलेल्या प्रकारात मोडणारे खर्चाचे प्रकार आहेत. तर दरवर्षी किंवा दोन वर्षांआड नियोजित केलेले परदेशी पर्यटन, दोन वर्षांंनी नवीन वाहन खरेदी करण्याचे केलेले नियोजन या प्रकारच्या नियोजित खर्चात कपात शक्य असते. किंवा हे खर्च पुढे ढकलता येतील. खर्चाची नव्याने आखणी करीत असतांना कालची गरज उद्या चैन ठरू शकेल.

वित्तीय नियोजासाठी सल्ला घेणाऱ्यांना खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय :

सर्व खर्चांची नोंद करा (खर्चाचे ‘एबीसी अ‍ॅनालिसीस’) :

प्रत्येकाच्या मासिक उत्पन्नानुसार एक निश्चित रक्कम (समजा १०० रुपये) ठरवून त्यावरील खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाच्या तपशिलाची नोंद करा. दोन महिन्यांच्या आढाव्यानंतर असे अनेक खर्च असतील की जे टाळता येतील किंवा अनावश्यक वाटतील. अनावश्यक खर्चाची नोंद होत नसल्याने भविष्यात खर्च कुठे कमी करायचा ते लक्षात येत नाही. मोबाईलमध्ये ‘एक्सपेंस ट्रॅकर’, ‘मनी मॅनेजर’, ‘खाता बुक’, ‘स्पेंडिंग ट्रॅकर’ या सारखी खर्चाच्या तपशिलाची नोंद ठेवणारी अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यास तुमचे हेही काम सहज होऊ शकेल.

नियोजनबा खर्च टाळा :

अनेक नियोजनबा खर्च हे भावनेच्या आहारी जाऊन खरेदी केलेल्या वस्तूंमुळे  झालेला खर्च असतो. विक्रेते नेहमीच ग्राहकाला ‘इम्पल्स बायिंग’ला बळीपाडून खरेदी करायला भाग पडेल अशी व्यूहरचना करीत असतात. एखाद्या आईसक्रीमवर असलेली चेरी हे उत्तम उदाहरण आहे. स्त्रियांची अंतरवस्त्रे हे व्यवस्थापन शास्त्रात ‘इम्पल्स बायिंग’चे उत्तम उदाहरण असल्याचे शिकविले जाते. गरज नसताना केवळ भावनेच्या आहारी जाऊ  न केलेल्या खरेदीवर होणारा खर्च हा १०० टक्के टाळता येणारा खर्च आहे. अशा खर्चाला आळा घालणे सहज शक्य असते. या खरेदीपासून मिळणारा लाभ हा तात्कालीक असतो. ते चेरीवाले आईस्क्रीम किंवा घालून बघावे असे वाटलेले एखादे अंतरवस्त्र एकदा वापरले की त्यातील नाविन्य संपते. घरात अशा अनेक वस्तू दिसतील की ज्या गोष्टींचे नाविन्य संपल्याने या वस्तू अडगळीत पडलेल्या आहेत. नवीन भ्रमणध्वनी संचाची खरेदी पुढे ढकलणे हे खर्च कमी करण्यासारखे आहे.

नाममुद्रांकित वस्तूंचा मोह टाळा :

खर्चात कपात करायची असेल तर नाममुद्रांकित वस्तू खरेदी करणे टाळायला हवे. एखादी वस्तू बिन नाममुद्रेची असल्यामुळे त्या वस्तूच्या वापरापासून मिळणाऱ्या लाभांमध्ये फार फरक पडणार नाही. परंतु किंमतीत खूप फरक पडतो. प्रसिद्ध नाममुद्रांकित वस्तूच्या मोहात न फसणे हा खर्च कमी करण्याचा उपाय आहे. रोजच्या वापरातील उदाहरण द्यायचे तर टाटांचे मीठ आणि बिन नाममुद्रेचे आयोडाइज्ड मीठ. खारटपणात फरक नसलेले पण टाटांचे मीठ किमान ४० टक्के अधिक किंमत असलेले. असे असताना एखाद्या नाममुद्रेसाठी आपण अतिरिक्त भार का वाहावा? वैयक्तिक वापराच्या महाग वस्तू, महागडे परफ्युम विकत घेणे टाळले तरीही खर्चाचा मोठा हिस्सा वाचू शकतो. महागडी नाममुद्रा असलेल्या जिमचे सदस्यत्व घेण्याऐवजी धावणे किंवा लांब फिरायला जाण्याने तितकीच चरबी जाळता येईल. जिममधील पर्सनल ट्रेनरवर होणारा खर्च टाळता येणे शक्य आहे.

टाळता येण्यासारखा खर्च टाळा :

आमचा एक मित्र शनिवार -रविवारी मिळून श्रमपरिहारात किमान ४,००० रुपये खर्च करतो. महिन्याचे झाले १६ हजार. काल एसआयपी बंद करूया असे सांगायला फोन केला होता. त्याची एसआयपी आहे केवळ ४ हजार रुपयांची. या मित्राने आठवडय़ातून दोन वेळा मद्यपान करण्याऐवजी एक दिवस मद्यपान केले तरी किमान ८ हजार रुपये वाचवून ४ हजाराची अतिरिक्त बचत होऊ शकते. क्रेडिट कार्डाचा वापर टाळून मी खर्च करीन असे ठरविले तर खर्चात बचत होऊ शकते. क्रेडिट कार्डाच्या न भरलेल्या बिलावर द्यावे लागणाऱ्या व्याजाचा दर सर्वात जास्त असतो. क्रेडिट कार्डाच्या बिलाची शिल्लक असलेली रक्कम तात्काळ फेडणे हासुद्धा खर्च कमी करण्याचा जालीम उपाय आहे.

विम्याचे पुनरावलोकन करा :

विम्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसींपैकी जीवन, आरोग्य किंवा अन्य प्रकारचा विमा कमीत कमी पैशासाठी सर्वोत्तम फायदा असलेली पॉलिसी कोणती असेल याचा शोध घ्या. हे लक्षात ठेवा, सर्वात स्वस्त नेहमीच सर्वोत्कृष्ट नसते. म्हणून योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली विम्याच्या गरजेचा आढावा घ्या. कदाचित एखादी गरज नसलेली पॉलीसी बंद करणे हासुद्धा मोठय़ा बचतीचा मार्ग असू शकेल.

एसआयपी बंद करणे हा उपाय नाही

खर्चाची काटकसर करताना एसआयपी बंद करणे हा उपाय नाही. एसआयपी बंद करणे म्हणजे ‘पॉवर ऑफ कम्पाऊंडिंग’च्या तत्वानुसार पाच वर्षे उशिरा सुरुवात केली तर २५ वर्षांंनंतर मिळणारी रक्कम निम्मी होते. २५ वर्षांंऐवजी २३ वर्षे एसआयपी केली तर नियोजित रकमेच्या ७० टक्केच रक्कम हातात येईल. आपण सर्वच वयाच्या ५८ व्या किंवा ६० व्या वर्षी निवृत्त होणार आहोत. करोनामुळे दोन वर्षे वाया गेली म्हणून कोणी वयाच्या ६० व्या किंवा ६२ व्या वर्षांंपर्यंत कामावर ठेवणार नाही. आज जरी अदृश्य रुपात असले तरी एसआयपी स्थगित करण्याने मोठय़ा आर्थिक अरिष्टाला तोड द्यावे लागेल.

यावर खर्चाचे काटेकोर नियंत्रण करणे खंडित केलेल्या एसआयपीची भरपाई करण्यासाठी स्टेप अप एसआयपीचा अवलंब करावा लागेल. यासाठी खर्चाची बचत करण्यासाठी अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हाच उपाय आहे. या ठिकाणी गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांच्या एका वाक्याची आठवण होते, अनावश्यक गोष्टींची खरेदी केली तर आवश्यक गोष्टी विकायला लागतात. म्हणून खर्चाचेसुद्धा ‘एबीसी अ‍ॅनालिसीस’ करावे लागेल. जगाची फेरमांडणी होत असताना त्यात वित्तीय नियोजनाला अपवाद करून चालणार नाही. उत्पन्न कमी झाल्याने खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे, बचतीवर नव्हे. अतक्र्य आणि अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीने वित्तीय नियोजनाची नव्याने फेरआखणी करायला हवी.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर