वसंत माधव कुळकर्णी

म्युच्युअल फंडाची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून फंड मालमत्तेने २५ लाख कोटींचा टप्पा पार केल्याचे  दिसून आले. त्याच वेळी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने चार लाख कोटींचा ऐतिहासिक स्तर गाठल्याच्या बातमीने लक्ष वेधले. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या यशात या फंड घराण्याचे ‘चीफ बिझनेस ऑफिसर’ असलेल्या डी. पी. सिंग यांनी आखलेल्या रणनीतीचा मोठा वाटा आहे. डी. पी. सिंग मात्र या यशाचे श्रेय ‘एसबीआय’ या नाममुद्रेवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासाला देत असले तरी तो त्यांचा विनयाचा भाग आहे.

‘‘माझ्या जागी कोणीही असता तरी हे घडले असते. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका निभावली आहे,’’ असा त्यांचा नेहमीच सूर असतो.

परंतु सिंग यांनी आखलेल्या रणनीतीने म्युच्युअल फंड उद्योगात दबदबा निर्माण केला. सिंग यांच्या रणनीतीला काटशह देण्याचा प्रयत्न स्पर्धक फंड घराण्यांनी आणि विशेषत: खासगी बँक प्रवर्तक असलेल्या फंड घराण्यांनी करूनही अजून एकालाही एसबीआय म्युच्युअल फंडांच्या उधळलेल्या वारूला वेसण घालणे जमलेले नाही. मागील ३० वर्षांहून अधिक काळ स्टेट बँकेच्या सेवेत असलेले डी. पी. सिंग हे स्टेट बँकेतून एसबीआय म्युच्युअल फंडात प्रतिनियुक्तीवर १९९८ मध्ये आले, आणि इथेच रमले. एसबीआय म्युच्युअल फंडाचे राष्ट्रीय विक्री प्रमुख या पदावर नियुक्ती होऊन दिल्लीहून २०१२ मध्ये मुंबईत आलेले सिंगसाहेब आता पक्के मुंबईकर झाले आहेत.

स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेला हत्ती म्हणत असत. त्यांच्या मते हत्ती हलायला वेळ लागतो पण पळायला लागला की सर्वाना मागे सारतो. एसबीआय म्युच्युअल फंडाने देशातील पहिल्या म्युच्युअल फंडाला मालमत्तेच्या क्रमवारीत मागे टाकले तेव्हाच एसबीआय म्युच्युअल फंडरूपी ‘हत्ती पळू लागल्या’ची पहिली जाणीव विश्लेषकांना झाली.

एसबीआय म्युच्युअल फंडाला स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या व्यवसायाचा हिस्सा केवळ एकूण व्यवसायाच्या २२ टक्के आहे. अन्य बँक-प्रवर्तित फंड घराण्यांना त्यांच्या समूह बँकांतून मिळणाऱ्या व्यवसायाचा वाटा खूप अधिक असल्याचे आकडेवारी सांगते. एसबीआय म्युच्युअल फंडाने वितरकांचे जाळे विणले आहे. आयएफए, एनडी, अन्य राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश असलेले बँकिंग चॅनेल या सर्वाचा आपापल्या परीने वाटा असल्याचे ते सांगतात. प्रदीर्घ काळ क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने २०१६ मध्ये यूटीआयला मागे टाकून क्रमवारीत पाचवे स्थान मिळविले. डी. पी. सिंग यांच्या मते फंड घराण्याने यूटीआय म्युच्युअल फंडाला मागे सारून पहिल्या पाचात स्थान मिळविणे हा आनंदाचा क्षण होता. या यशानंतर प्रत्येक तिमाहीअखेरीस क्रमवारीत वर असलेल्या फंड घराण्याच्या आणि एसबीआय म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेतील फरक कमी होत राहिला.

एसबीआय म्युच्युअल फंडाच्या मालमत्ता वाढीत ‘बँकर टू एव्हरी इंडियन’ असे बिरूद मिरविणाऱ्या स्टेट बँकेच्या शाखा विस्ताराचा थोडा फार वाटा नक्कीच असला तरी या ‘हत्ती’ला चालते करण्याचे काम सिंग यांनी केले. एसबीआयच्या केस स्टडीज या व्यवस्थापन शास्त्राच्या महाविद्यालयात शिकविल्या जातात. एसबीआय म्युच्युअल फंडाची केस स्टडी अशीच एखाद्या महाविद्यालयात नक्कीच शिकविली जाईल. स्टेट बँकेइतक्या शाखांचे जाळे असूनही एलआयसी म्युच्युअल फंडाला जे जमले नाही ते एसबीआय म्युच्युअल फंडाला कसे जमले हा व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टीने नक्कीच औत्सुक्याचा विषय ठरेल.

फंड घराण्यांसाठी बँका हे सर्वात मोठे विपणनाचे माध्यम राहिले आहे. बँकेत कामासाठी आलेल्या ग्राहकांना अनेकदा बँकांचे कर्मचारी फंड खरेदी करण्याचा सल्ला देतात. ताज्या आकडेवारीनुसार एचडीएफसी बँक देशातील अशी सल्लय़ाखालील सर्वाधिक मालमत्ता असलेला म्युच्युअल फंड वितरक आहे. मागील वर्षभरात स्टेट बँकेच्या सल्लय़ाखालील मालमत्तेत मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. सल्लय़ाखालील मालमत्ता वाढविण्याच्या मागे लागलेल्या बँका मालमत्ता संकलनाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहतात. मागील वर्षभरात स्टेट बँकेने या रीतीने वितरित केलेली मालमत्ता ६४ हजार कोटींवरून ८१ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘देशाचे निधी व्यवस्थापक’ बनावे हे लक्ष्य राखले आहे. गुणात्मकतेला फारशी किंमत न देण्याचा भारतीयांच्या मानसिकतेचा विचार करता बाजार जोखमीचे व्यवस्थापन करणे हे एसबीआय म्युच्युअल फंडासमोरचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्याचे सामथ्र्य या फंड घराण्यात आहे असे आज वाटत असले तरी भविष्यातील या फंड घराण्याच्या फंडांची कामगिरी कशी राहते यावर हे यश अवलंबून असेल.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर