नीलेश साठे

एका पुस्तकात मला पॉलिसीने पॉलिसीधारकाला लिहिलेले इंग्रजी पत्र मिळाले. त्याचा स्वैर अनुवाद असा –

प्रिय मित्रा,

मी तुझी आयुर्विमा पॉलिसी. आपल्या दोघांचाही असण्याचा आणि जगण्याचा उद्देश एकच. आज जेव्हा तू तुझ्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी झटतो आहेस, त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहेस, तेव्हा मी मात्र तुझ्या ‘लॉकर’मध्ये आपली ताकद आणि मूल्य वाढवीत शांतपणे निद्रिस्त आहे. मला तू ‘लॉकर’मध्ये नीट जपून ठेव बरं. मी तोवर निद्रिस्त असेन जोवर तू जागा आहेस आणि एकदा का तू नेहेमीसाठी निद्रिस्त झालास की मी झोपेतून जागी होऊ न तुझी अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागेन…

जेव्हा कधी तुला माझे ओझे वाटेल तेव्हा एक लक्षात ठेव, की मला जगवण्यासाठी जेवढे मोल तू खर्ची घालतो आहेस, त्याहून कितीतरी पट परतावा मी तुला आणि तुझ्या कुटुंबियांना देणार आहे आणि तुझी अपूर्ण स्वप्न मीच पूर्ण करणार आहे. तू निश्चिंतपणे तुझी कर्तव्ये पार पाड, मी योग्य वेळी माझे काम करीन. सर्वस्वी तुझीच जिवलग, आयुर्विमा पॉलिसी.

हे वाचून आपल्याला पटले असेल की विमा घेणे जितके आवश्यक आहे, तितकेच योग्य वेळी विम्याचा हप्ता भरणे पण गरजेचे आहे. मागील लेखात पॉलिसी घेताना लक्षात ठेवायच्या बाबी आपण पहिल्या. या लेखात पॉलिसी घेतल्यानंतर विमेदाराने कोणकोणती काळजी घ्यायला हवी ते बघू या.

१. विमा पॉलिसी मिळाल्यावर लगेच त्यावर छापलेले नाव, पत्ता, नॉमिनीचे नाव, विम्याचा प्रकार, मुदत इत्यादी बाबी नीट तपासून घ्या. जर काही किरकोळ चुका असतील तर त्यांची लगेच दुरुस्ती करून घ्या आणि जर आपण मागितलेला विमा प्रकार, विमा हप्ता किंवा कालावधी अशा महत्त्वाच्या  गोष्टींमध्ये जर तफावत असेल आणि आपण या बद्दल समाधानी नसाल तर पॉलिसी मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत, तुम्ही मिळालेला विमा रद्द करण्यासाठी कंपनीला लिहू शकता. याला ‘फ्री लुक कॅन्सलेशन’ म्हटले जाते. विमा कंपनी तुम्ही भरलेली सर्व रक्कम (नियमानुसार मुद्रांक शुल्क, विविध आरोग्य चाचण्या केल्याचा खर्च अशी काही रक्कम वजा करून) तुम्हास परत करण्यास बाध्य आहे.

२. पॉलिसी दस्तावेज आपण ‘डिजिलॉकर’ या अॅीपमध्ये किंवा ‘रिपॉझिटरी’मध्ये सांभाळून ठेवू शकता. या बद्दल नॉमिनीला तसेच जवळच्या व्यक्तीला सांगून ठेवा.

३. विमा घेतल्यावर बऱ्याच महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते. विम्याचा करार हा दीर्घ मुदतीचा करार असल्याने या मोठय़ा कालावधीत जीवनात अनेक स्थित्यंतरे होतात. सुरुवातीस आपण आई-वडिलांकडे राहत असतो, मग स्वत: चे भाडय़ाचे घर घेतो, लग्न होते, मुले होतात, राहते घर लहान पडते, मग मोठे घर भाडय़ाने घेतले जाते, नंतर स्वत:ची सदनिका होते तरी विमा पॉलिसी मात्र चालूच असते. हे वेळोवेळी झालेले पत्त्यातील बदल विमा कंपनीला कळवणे आवश्यक असते.

४. लग्नानंतर नॉमिनीमध्ये बदल करावा असे वाटल्यास तो करून घ्यावा. २०१५ च्या आधी नॉमिनीला दाव्याची रक्कम मिळवण्याचा फक्त अधिकार होता. त्या रकमेवर हक्क मात्र सर्व कायदेशीर वारसांचा असे आणि त्यांना त्या रकमेत मिळणारा हिस्सा किती हे न्यायालय ठरवीत असे. २०१५ ला झालेल्या विमा कायद्यातील बदलानंतर मात्र ही स्थिती बदलली. विमाधारक लाभधारक नॉमिनी म्हणून आई, वडील, पती/पत्नी/मुले/मुली या पैकी एक किंवा अनेक नेमू शकतो आणि त्यांना दावा किती प्रमाणात मिळेल हे विमा प्रस्तावातच नमूद करू शकतो. अशा लाभधारक नॉमिनीला मिळणारी दाव्याची रक्कम त्याच्या हक्काची असते. इतर नातेवाईकांचा त्या रकमेवर अधिकार राहत नाही. मात्र अशा जवळच्या व्यक्तींव्यतिरिक्त जर नॉमिनी नेमला असेल तर त्याला दाव्याच्या रकमेवर अधिकार मिळत नाही. यात एक गमतीचा भाग असा, की सासूला जर आपल्या सुनेला किंवा एखाद्या सुनेला जर आपल्या सासूला लाभधारक नॉमिनी करायचे असेल तर तसे कायद्याने करता येत नाही. अर्थात त्या केवळ नॉमिनी म्हणून नेमू शकता.

५. २०१५ नंतर झालेला अजून एक बदल म्हणजे पॉलिसीची मुदत संपल्यावर आणि विम्याची रक्कम मिळण्यापूर्वी जर विमेदाराचा मृत्यू झाला तर ती रक्कम नॉमिनीला न मिळता न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना देण्यात येत असे. २०१५ नंतर मात्र नॉमिनीला ही रक्कम मिळू शकते.

६. २०१५ पूर्वी पॉलिसीवर बँकेकडून वा इतर कुठल्याही संस्थेकडून (विमा कंपनी सोडून) घेतलेल्या कर्जाची परतफेड झाल्यावर पुन्हा नॉमिनेशन करावे लागत असे. आता त्याची गरज नाही.

७. विमा कंपन्यांकडे मोठय़ा प्रमाणावर कोणीही दावा न केलेली रक्कम पडून आहे. याची प्रमुख करणे खालील प्रमाणे:

* दावेदारांमधील भांडणे

* घरच्या कुटुंबियांना पॉलिसीबद्दल माहिती नसल्याने दावा केलाच जात नाही.

* मिळणाऱ्या दाव्याची रक्कम कमी असल्याने विमेदार कागदपत्रांची पूर्तता करण्यास अनुत्सुक असतात.

* पत्त्यातील झालेले बदल पुन्हा नव्याने नोंदले नसल्यामुळे विमेदाराला शोधणे कठीण असते.

* विमेदाराच्या मृत्यूपूर्वी नॉमिनीचा मृत्यू झाला असूनही नवीन नॉमिनीची नियुक्ती न झाल्याने वारस प्रमाणपत्र मिळवावे लागते, जे मिळवण्यात अडचणी येतात. वरील गोष्टींचा विमेदारांनी विचार करावा.

८. विमेदार पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी कितीदाही नॉमिनी बदलू शकतो. काही विमा कंपन्या या सेवेसाठी शुल्क आणि त्यावर १८ टक्के सेवाकर आकारतात.

९. साधारणपणे विम्याचा हप्ता देय तारखेनंतर ३० दिवसांच्या आत भरावा लागतो. युलिप योजनेला मात्र ही मुदत १५ दिवसांची असते. पॉलिसी दस्तऐवजात याचा उल्लेख असतो. त्यानुसार वेळेत विम्याचा हप्ता भरावा अन्यथा करार निरस्त होऊ न पॉलिसीचे लाभ बंद होतात. 

१०. आर्थिक अडचणीच्या वेळी विमा ‘सरेंडर’ करण्यापेक्षा त्या विमा पॉलिसीवर कर्ज काढावे.

११. दोन वा अधिक विमा कंपन्यांकडून आरोग्यविमा घेतला असल्यास, दोन्ही कंपन्यांना याबद्दल कळविणे गरजेचे असते. असे न केल्यास दुसरी कंपनी आरोग्यविम्याचा दावा नाकारू शकते. याची काळजी घ्यावी.

१२. समूह विमा योजना ज्या तारखेला सुरू होते त्या तारखेस जे कर्मचारी वैद्यकीय रजेवर असतात, त्यांना त्यावर्षी विम्याचा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

विमा घ्या, त्याचा हप्ता नियमित भरा आणि निश्चिंत व्हा.

* लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.

ई-मेल : nbsathe@gmail.com