खासगी म्युच्युअल फंड उद्योग दोन दशकांच्या प्रवासाचा साक्षीदार राहिला आहे. हा प्रवास पूर्णत्वास येण्यापूर्वीच फंड व्यवसायावर गेल्या काही महिन्यांपासून काहीसे र्निबध लादले गेले. अर्थातच ते गुंतवणूकदारांच्या हितार्थ होते, असा दावा नियामक यंत्रणा करते. तर बदल हे हवेच, असे फंड कंपन्यांना वाटते. केंद्रातील नव्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात फंडांतील दिर्घ कालावधीची गुंतवणुकीची व्याख्या बदलण्याबरोबरच भांडवली नफ्यावरील कर दुप्पट करण्यात आला. सध्याच्या विक्रमी शेअर बाजाराच्या वातावरणानंतर आगामी कालावधीसाठी फंड म्हणून गुंतवणूकदारांची काय भूमिका असावी याबद्दल सांगताहेत बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील झ्र्
मोदी सरकार सत्तेचे १०० दिवस साजरे करत आहे. वातावरणातील ‘अच्छे दिन’ प्रत्यक्षात येत आहेत, असे वाटते का?
निश्चितच. निदान वातावरण तरी तसेच आहे. मात्र विकासाला वेग येईल आणि प्रत्यक्षातील प्रतिक्रियेला, प्रतिबिंब उमटण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. स्थिर सरकारनंतर अर्थव्यवस्था सावरेल हा विश्वास अधिक वृद्धिंगत होत आहे. निर्णय घेण्याची प्रक्रिया गतिमान होत आहे, असे दिसते. विभिन्न मंत्रालयातील योजना, कार्यक्रम राबविण्यातील सामंजस्य अधिक स्पष्ट होत होत आहे. या साऱ्यांचे गणित मांडण्यास आणखी वेळ लागेल. निकाल तर प्रत्यक्षात सहा ते नऊ महिन्यांनंतर दिसू लागतील.
भांडवली बाजारही त्यांच्या विक्रमी टप्प्याची पुनरावृत्ती करतो आहे. ही केवळ तात्पुरती हालचाल आहे असे मानायचे का?
मेपासूनच आपण पाहिले तर एकूणच अर्थव्यवस्थेने वेग धरला आहे. भांडवली बाजारातही निवडणुकीपासून ते निकाल स्पष्ट होईपर्यंत वाढ नोंदली गेली. एकटय़ा मे महिन्यात ६,००० ते ७,००० कोटी रुपयांचा निधी ओघ बाजारात आला. आताही अवघ्या तीन महिन्यात बाजार नव-नवे विक्रम नोंदवितो आहे. स्थानिक गुंतवणूकदारांबरोबरच विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचाही विश्वास वाढू लागला आहे. त्याचीच ही प्रतिक्रिया आहे.
भांडवली बाजारात जोखीम अधिक असते. तुलनेत मालमत्ता, मौल्यवान धातू अशा हमीदार पर्यायाचे अनुसरण अधिक होते..
हो. सोन्यावरील र्निबधाचा परिणाम आपण पाहत आहोत. मोसमातही सोने ३२ हजार रुपये तोळ्याच्या वर गेलेले नाही. मालमत्तेबाबत परतावा अधिक मिळत असला तरी गुंतवणुकीसाठी लागणारी मोठी रक्कम पाहता भांडवली बाजारातील थेट अथवा म्युच्युअल फंडासारखा अप्रत्यक्ष पर्याय स्वागतार्ह म्हणायला हवा. मालमत्ता आणि मौल्यवान वस्तुंच्या तुलनेतील समभागांशी निगडित गुंतवणूक पर्याय अधिक लाभदायी वाटतो.
गुंतवणूकदारांचा कल स्थिर उत्पन्न योजनांकडून अशा वेगाने हालचाल नोंदविणाऱ्या परताव्याकडे वळला आहे, असे मानावे काय?
किरकोळ गुंतवणूकदार स्थिर उत्पन्न, नफा देणाऱ्या पर्यायाकडे अधिक लक्ष देतो. यासाठी बँकेच्या ठेवी आदी पर्याय अनुसरले जातात. मात्र सध्याची वाढती महागाई पाहता ६ ते ८ टक्के परतावा हा काहीच नाही. तुम्हाला विद्यमान महागाईपेक्षा दोनेक टक्के अधिक लाभ मिळणे आवश्यक आहे. भांडवली बाजाराने ते नोंदविले आहे. म्हणूनच त्याकडे आकृष्ट होण्यास काहीच गैर नाही.
मध्यंतरी स्थानिक पातळीवर रुपया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरांनी धास्ती निर्माण केली. आता हे सावरले आहे, अशी स्थिती आहे का?
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास तूर्त तरी ६० च्या आसपास असेल, असे वाटते. चालू खात्यावरील तूट नियंत्रणात आणण्याच्या सरकारच्या उपाययोजनांना यश येत आहे, हे पाहता स्थानिक चलन आगामी काही कालावधीसाठी स्थिर असेल. कच्च्या तेलाच्या दरांबाबतही आता खूपच शांत परिस्थती आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय, लष्करी घडामोडींनी वेग घेतल्याने ते काहीसे भडकले होते. मात्र अमेरिकासारखा देशही इंधनाबाबत आखाती राष्ट्रांवरील आपले अवलंबित्व कमी करू पाहत आहे. तेव्हा कच्च्या तेलाचे दर आता अधिक वाढणार नाहीत.
फंडांबाबत दिर्घ कालावधीची व्याख्या एक वर्षांवरून तीन वर्षांसाठी विस्तारित करण्यात आली आहे. त्याचबरोबर फंडावरील भांडवली उत्पन्नावरील करदेखील १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे. याच्या विपरित परिणामांची भीती नाही का?
नुकत्याच झालेल्या मध्यान्ही अर्थसंकल्पात याबाबतच्या तरतुदी अद्ययावत करण्यात आल्या. दिर्घकालीनची व्याख्या विस्तारणे योग्य आहे. किमान या कालावधीपर्यंत गुंतवणूकदाराने निश्चिंत राहणे व अधिक लाभाची अपेक्षा करणे हेच या ओघाने येते.
फंड काय किंवा अन्य उद्योग, व्यवसायावरील निबर्ंध हे लाभार्थीच्या हितासाठीच घेतले गेलेले असतात. फंड उद्योग तरी आता त्यातून बाहेर आला आहे. मात्र यानिमित्ताने एक सुचवावेसे वाटते. गुंतवणूकदारांच्या शिक्षणासाठी आणखी प्रसार व्हायला हवा. आमच्यासारख्या अनेक कंपन्या तसे उपक्रम राबवितातही.
क्षेत्र म्हणून कोणत्या उद्योगाशी संबंधिक फंड, इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे आगामी कालावधीसाठी योग्य असेल?
या सरकारचा पायाभूत सेवा क्षेत्रावर भर राहिलेलाच आहे. त्याचबरोबर वित्तशी संबंधित क्षेत्रांमध्येही आगामी कालावधीत मोठय़ा उलाढाली होणार आहेत. बँक, वित्तकंपन्या, वाहन, औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्या, समभाग आणि त्याच्याशी अप्रत्यक्ष गुंतवणूक पर्याय असलेले फंडांना आपल्या पोर्टफोलियोमध्ये स्थान द्यायला हवे. त्याचबरोबर मिड-कॅपही सध्याची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे, यादृष्टिने पसंतीचे ठरू शकेल. व्याजदरांमध्ये जसे बदल होऊ लागतील तसा यातील गुंतवणुकीवर होणारा परिणाम अधिक प्रकर्षांने दिसून येईल. लार्ज कॅपमध्येही आपल्या गुंतवणुकीपैकी काही प्रमाण ठेवावयास हरकत नाही.
भांडवली बाजाराचा सध्याचा विक्रमी वेग पाहता गुंतवणूकदारांच्या ध्येयधोरणात तुम्ही काय बदल सुचवाल काय?
भांडवली बाजाराचा तळ यापेक्षा फार खालच्या स्तरावर असेल, असे वाटत नाही. त्याचा नेमका वरचा टप्पा आणि कालावधी सांगणे आताच योग्य ठरणार नसले तरी अर्थव्यवस्था वेग घेईल तसा तेजीचा वारुही उसळेल. गुंतवणूकदारांनाही या बदलत्या कालावधीत आपला दृिष्टकोन बदलावा लागेल. भूतकाळ बघून जर तुम्ही पुढील वाटचाल करत असाल तर ते चुकीचे आहे. यापेक्षा सुमार परिस्थिती आता नाही, हेच गृहित धरून वाटचाल करावी लागेल. फार मोठय़ा आपटीची, घसरणीची शक्यताही तशी कमी दिसते. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड उद्योगांनी गेल्या दशकभरात दुहेरी आकडय़ातील परतावा मिळवून दिला आहे. इक्विटी फंडांतील गुंतवणूक आता अधिक परतावा देऊ शकेल. डेट आणि इक्विटी फंडांनी गेल्या सहामाहीत चांगला परतावा मिळवून दिला आहे. आमचेच १४ हूून अधिक फंड ४० टक्क्यांहून अधिक वेगाने प्रवास करत आहेत.
भारतीय खासगी म्युच्युअल फंड उद्योगाबरोबरच बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड कंपनीलाही व्यवसायाची २० वर्षे पूर्ण होत आहेत. सध्याच्या बदलत्या वातावरणात कंपनी म्हणून काही बदल तुमच्या ध्येयधोरणांवर आहेत का? फंड योजनांमध्ये काही बदल अथवा नव्या स्वरुपातील काही योजना प्रस्तावित आहेत का?
फंड क्षेत्रात कंपनी आता एक लाख कोटी मालमत्तेच्या वर्गात पोहोचली आहे. अशा चार आघाडीच्या कंपन्यांमध्ये बिर्ला सनलाईफ स्थान राखून आहे. व्यवसाय तसेच उत्पादन बदलाच्या दिशेने कंपनीची पावले नक्कीच पडत आहेत. डेट, इक्विटी फंडांबाबत आगामी कालावधीतही नवीन योजना सादर केल्या जातील. मध्यंतरी एसआयपीसारख्या योजनांना मिळालेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद लक्षात घेता या वर्गवारीतील अधिक उत्पादनेही सादर करण्यास कंपनीला आनंदच होईल.