वसंत कुळकर्णी

म्युच्युअल फंड रेटिंग हे सामान्यत: एकाच फंड गटातील फंडांच्या तुलनेत विशिष्ट फंडांच्या कामगिरीचे मोजमाप असते. परतावा आणि जोखीम या दोन्हींचा समतोल साधणाऱ्या फंडांना फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार रेटिंग मिळते. कॅनरा रोबेको फंड घराण्यांचे निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार हे सर्वाधिक फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार फंड रेटिंग असलेले निधी व्यवस्थापक आहेत.  कॅनरा रोबेको ब्लूचीप (फाईव्ह स्टार) आणि कॅनरा रोबेको इमर्जिग इक्विटीज (फोर स्टार),  कॅनरा रोबेको फ्लेक्झी कॅप (फोर स्टार)  हे फंड सुरुवातीपासून (२०१३ पासून) लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड यादीचा भाग  अर्थात शिफारसपात्र फंड राहिले आहेत.

Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
International Monetary Fund
विकास दराचे आठ टक्क्यांचे सातत्य २०४७ पर्यंत टिकेल; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक सुब्रमणियन यांचा दावा

म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांना भेटून त्यांच्याद्वारे व्यवस्थापित फंडाबद्दल अधिक जाणून घेणे या नित्यनेमात, करोना अडथळय़ामुळे खंड पडलेला नाही. प्रत्यक्ष भेटी ऐवजी संभाषण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवाद होत असतो. परताव्यात सातत्य राखलेल्या या फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख असलेल्या श्रीदत्त भांडवलदार यांच्याशी झालेल्या संभाषणाचा हा गोषवारा..

नव्या आर्थिक वर्षांबाबत दृष्टिकोन:

बाजाराची वाटचाल मुख्यत्वे दोन किंवा तीन बाबींवर ठरेल. पहिली गोष्ट येत्या वर्षांत जगभरात रोकडसुलभता कमी होईल. दुसरी गोष्ट इंधनाच्या किमती. मागील दशकातील किमतींच्या तुलनेत वरच्या पातळीवर असल्याची धग सगळय़ांना जाणवेल. भारत हा जिनसांचा वापरकर्ता असल्याने आणि जिनसांच्या किमतीत वाढ झाली असल्याने कंपन्यांची नफाक्षमता कमी होईल. त्यांच्या मिळकतीतील (उत्सर्जन) वृद्धीदर कमी होईल किंवा कंपन्यांच्या उत्सर्जनात अपेक्षित असलेली वाढ होण्यास एखाद दुसऱ्या तिमाहीचा विलंब लागू शकेल. पहिल्या तिमाहीच्या उत्सर्जनात वाढ किंवा घट अपेक्षित नाही. या तिमाहीचे निकाल समान्य असतील. मात्र पुढील दोन तिमाहीत कंपन्यांच्या उत्सर्जनांत फारशी वाढ अपेक्षित नसून काही उद्योग क्षेत्रांच्या उत्सर्जनांत प्रसंगी घट होण्याचीसुद्धा शक्यता आहे. इंधनांच्या किमती कशा स्थिरावतात त्यावर या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत उत्सर्जनांत वाढ दिसू शकेल. समष्टी अर्थशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास, वाढलेल्या इंधनाच्या आणि अन्य जिनसांच्या किमतींमुळे वित्तीय तूट वाढण्यासोबत आयात-निर्यातीतील तफावत (बॅलन्स ऑफ पेमेंट) रुंदावण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कंपन्यांची पत सुधारण्यात किंवा खालावण्यात होईल. पत सुधारलेल्या कंपन्यांची संख्या पत खालावलेल्या कंपन्यापेक्षा अधिक असेल. दोन वर्षांच्या निरंतर तेजीनंतर सुरू झालेले नवीन आर्थिक वर्ष हे म्हणूनच स्थिरावण्याचे वर्ष असेल. त्यामुळे भांडवली खर्च करून उद्योगांच्या क्षमता वाढीवर मर्यादा येण्याची मोठी शक्यता वाटते. जगभरात ‘चायना प्लस वन’ ही संकल्पना रुजत आहे. या संकल्पनेत भारताला नक्कीच स्थान असून मोठी परकीय गुंतवणूक भारतात येण्याची शक्यता वाटते.  

 फंडांच्या गुंतवणुकीतील कंपन्यांची निवड :      

मागील दीड-दोन वर्षे निर्यातप्रधान उद्योगांच्या उत्सर्जनात वाढ होत होती. देशांतर्गत व्यवसाय करणाऱ्या उद्योगांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आम्हाला असे वाटते की, इथून पुढे स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या उत्सर्जनात वेगाने सुधारणा होईल. कॅनरा रोबेको फंड घराण्याच्या लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप आणि लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंडाच्या गुंतवणुकीत निर्यातप्रधान उद्योगांपेक्षा आत्मनिर्भर कंपन्यांना स्थान दिले गेले आहे. साहजिकच व्यापारचक्राशी निगडित कंपन्या, आर्थिक सेवा, गृहबांधणी, वैयक्तिक वापराच्या वस्तू, सिमेंट, वाहन उद्योग यांच्यावर आमचा भर होता. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर इंधनाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता, सिमेंट आणि वाहन उद्योगाची मात्रा थोडी कमी केली. हा बदल सोडला तर आमची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांत आम्ही फारसा बदल केलेला नाही. फंडांच्या मानदंड सापेक्षाने विचार केल्यास, निर्यातप्रधान व्यवसायांपैकी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र, आर्थिक सेवा यांच्यातील गुंतवणुकीची मात्रा आम्ही अधिक राखली आहे.

गुंतवणूकदारांना सल्ला:

नवीन आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांनी मोठय़ा परताव्याची अपेक्षा ठेवू नये. हे वर्ष स्थिरावणारे वर्ष असल्याने, पर्यायाने परतावा कमी आहे म्हणून गुंतवणुकीत खंड पडू नये. तीन वर्षे थांबण्याच्या तयारीने गुंतवणूक करावी. तीन वर्षांत दोन आकडय़ात परतावा पुन्हा मिळेल. समभाग गुंतवणूक हा मालमत्ता वर्ग अन्य मालमत्ता वर्गाच्या तुलनेत सरस परतावा देईल, याबद्दल खात्री बाळगा. या वर्षांत बाजारातील अस्थिरता शिगेला पोहोचलेली दिसेल. ‘एसआयपी’ हे या अस्थिरतेशी सामना करण्याचे प्रभावी साधन आहे. म्हणून तुमच्या गुंतवणुकीत समभाग गुंतवणुकीला पुरेसे स्थान द्या.

shreeyachebaba@gmail. com

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.