दसरा सरला की दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी म्हटली की नवीन खरेदी आलीच. कपडे, सोने याच्या जोडीला शेअर बाजारदेखील लक्ष्मीपूजन व मुहूर्ताचे सौदे करून आपल्या पद्धतीने दिवाळी साजरी करीत असतो. या वर्षी तर बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या नजीक आहे. म्हणून या वर्षीची दिवाळी ही बाजारासाठी खासच! मागील वर्षांपासून दिवाळीच्या मागेपुढे ‘अर्थ वृत्तान्त’सुद्धा दिवाळीसाठी विशेष खरेदी सुचवीत असतो. या वर्षी दसरा व दिवाळी हे दोन्ही सण ऑक्टोबर महिन्यात आले आहेत. म्हणून गतवर्षीप्रमाणेच आम्ही विश्लेषकांना त्यांनी मागील वर्षभरात अभ्यासलेल्या कंपन्यांपकी एका कंपनीची निवड करण्यास सांगितले. असे आठ विश्लेषक आपल्या पसंतीच्या कंपन्या घेऊन येत आहेत ‘अतिथी विश्लेषक’ म्हणून..
आरएस सॉफ्टवेअर
(बीएसई कोड – ५१७४४७)
रु. ६९७.३०
वार्षिक उच्चांक/नीचांक :
रु. ८३० / रु. १३८.८०
दर्शनी मूल्य : ” १०  
 पी/ई : १४.४५
आरएस सॉफ्ट : ‘अलिबाबा पर्वा’च्या उदयाचा लाभार्थी
आरएस सॉफ्टवेअर ही ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांसाठी नवीन कंपनी नाही. परंतु ज्यांनी आधीच या कंपनीत १३०-१३५ रुपये दरम्यान गुंतवणूक केली त्यांच्यासाठी व ज्यांची बस चुकली त्यांच्यासाठीदेखील या कंपनीची नव्याने शिफारस करता येईल. ही कंपनी १९९१ मध्ये सुरू झाली. कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोख रकमेचे व्यवहार (Online Payment) करणे, संगणक प्रणाली तयार करणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. ‘क्लाऊड कॉम्युटिंग’ या क्षेत्रातील ती एक प्रमुख कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय अधिक स्पष्ट करून सांगायचा तर एखाद्या बँकेचे परिचलन हाताळणारे इन्फोसिसचे ऑरेकलसारखी मुख्य संगणक प्रणाली असते. याच जोडीला क्रेडिट कार्डचे पसे वळते करणे, एखाद्या संस्थेकरिता देणगी स्वीकारणे, मोबाइलची देयके स्वीकारणे, सरकारी अनुदाने थेट खात्यात जमा होणे इत्यादीसाठी रक्कम स्वीकारण्यासाठी एक ‘पेमेन्ट गेटवे’ असावा लागतो. त्यासाठी लागणारी यंत्रणा हाताळणी करण्याचे काम आरएस सॉफ्टवेअर करते. हे काम जोखमीचे असल्याने व बँकेच्या मुख्य संगणक प्रणालीशी संबंध येणारे असल्याने बँका सहसा नवीन पुरवठादारापेक्षा आरएस सॉफ्टवेअरसारख्या अनुभव असलेल्या पुरवठादारास प्राधान्य देतात. एखादी संगणक प्रणाली पुरविण्यापूर्वी चाचणी, विक्रीपश्चात सेवा संगणक प्रणालीची निगा, परिचालन या सर्व क्षेत्रांत या कंपनीने लौकिक मिळविला आहे. दोन कंपन्या अथवा बँका यांच्यात होणारे विलीनीकरण होते तेव्हा ‘पेमेन्ट गेटवे’ची पुनर्रचना केली जाते. अर्थव्यवस्थेत वाढणारे ऑनलाइ  व्यवहारांचे प्रमाण कंपनीसाठी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारे आहे. उदाहरण देऊन सांगायचे तर सेबीने प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला (म्युच्युअल फंड) आपली उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विकत घेण्याची सुविधा सक्तीचे केले आहे. ही मुदत येत्या एका महिन्यात संपेल. यासारख्या परिस्थितीत प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीस ‘पेमेन्ट गेटवे’ असणे सक्तीचे झाले आहे. आज नळाद्वारे वायू, मोबाइलची देयके अथवा रिचार्ज हे ऑनलाइन पद्धतीने होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या प्रत्येक व्यवहारासाठी एका ‘पेमेन्ट गेटवे’ची आवश्यकता पडते. ही परिस्थिती कंपनीसाठी व्यवसाय विस्तार करण्याची संधी उपलब्ध करून देणारी आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, जेव्हा ‘लोकसत्ता’सारखे दैनिक ‘सर्व काय्रेषु सर्वदा’सारखा उपक्रम राबवते तेव्हा मोठय़ा प्रमाणावर देणगीदारांचे धनादेश जमा होतात. आजपासून तीन ते पाच वर्षांनी प्रत्येक संस्थेच्या खात्यात थेट रक्कम जमा होणे शक्य होईल. यामुळे मोठय़ा संख्येने जमा होणाऱ्या धनादेशांची हाताळणी टाळणे शक्य होईल. आज तरुणाच्या देशात तरुणाईचा कल हा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे आहे. ऑनलाइन पोर्टल ‘अलिबाबा’च्या नुकत्याच झालेल्या खुल्या समभाग विक्रीला मिळालेला प्रतिसाद हे वाढत्या ई-कॉमर्स व्यवहारांचे द्योतक आहे. प्रत्येक ई-कॉमर्स व्यवहार करणाऱ्या कंपनीला ‘पेमेन्ट गेटवे’ची आवश्यकता असते व ही आवश्यकता आरएस सॉफ्टवेअर पूर्ण करते. म्हणूनच आम्ही या कंपनीची दिवाळी खरेदीसाठी शिफारस करत आहोत.
बी. अनिल कुमार
info@firstcallindia.com
(कुमार हे ‘फर्स्ट कॉल रिसर्च’ या समभाग संशोधन  संस्थेत समभाग विश्लेषक आहेत.)

फोर्स मोटर्स : आयशरच्या कामगिरीचा ‘सिक्वेल’
(बीएसई कोड – ५०००३३)
रु. १३९३.५५
वार्षिक उच्चांक/नीचांक :
रु. १४६३ / रु. २७२
दर्शनी मूल्य : ” १०  
 पी/ई : १८.७९
फोर्स मोटर्स लिमिटेड (फोर्स) म्हणजे आधीची बजाज टेम्पो. कंपनीची स्थापना हस्तीमलजी फिरोदिया यांनी फिरोदिया टेम्पो लिमिटेड नावाने केली. बजाज समूहाने मोठा भांडवली हिस्सा संपादित केल्यावर कंपनीचे नाव बजाज टेम्पो करण्यात आले. २००५ मध्ये पुन्हा कंपनीने नाव बदलून  ‘फोर्स मोटर्स’ हे नाव धारण केले. हस्तीमलजीचे पुत्र अभयकुमार फिरोदिया हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. कंपनीने १९५८ मध्ये मुंबईत गोरेगाव येथे ‘हॅनसीट’ नावाने तीनचाकी टेम्पो उत्पादन व्यवसायास सुरवात केली. १९८२ मध्ये ‘डेल्मर बेन्झ’बरोबर ‘मर्सिडिज बेन्झ ओएम ६१६’ या डिझेल इंजिन उत्पादनास आकुर्डी येथे प्रारंभ केला. १९८७ मध्ये मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे ‘टेम्पो ट्रॅव्हलर’ला प्रारंभ झाला. कंपनीचे महाराष्ट्रात आकुर्डी व मध्य प्रदेशात पिथमपूर येथे कारखाने आहेत. कंपनी टेम्पो ट्रॅक्स, टेम्पो ट्रॅव्हलर, फोर्स वन, गुरखा, बलवान या नाममुद्रेने वाहने विकते. कंपनीचा ६ ते २० प्रवासी क्षमतेच्या वाहनांच्या गटात ५० टक्के बाजारहिस्सा आहे. कंपनीची २६ प्रवासी क्षमतेची बस भारतात आहे. २००३ मध्ये जर्मन कंपनी मॅनसोबत अवजड ट्रक व बस विकसित करण्याचा करार २०१० मध्ये संपुष्टात आला. पुणे व पिथमपूर कारखान्यांची मिळून वार्षकि उत्पादन क्षमता ६६ हजार वाहने आहे. २०१३ मध्ये स्वत: विकसित केलेल्या फोर्स वनसाठी अमिताभ बच्चन यांना सदिच्छा दूत म्हणून नेमले. टाटा सफारी व मिहद्रा स्कॉíपयो या वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या फोर्स वनला उत्तम पसंती आहे. सध्या हे वाहन मिळण्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. कंपनीच्या पहिल्या तिमाहीची विक्री मागील वर्षांच्या तुलनेत ८ टक्के वाढून ५३८.४० कोटी झाली; तर निव्वळ नफा ३५.९ टक्क्य़ांनी वाढून १९.४० कोटी झाला. कंपनीने ३० टक्के लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल १३.२ कोटी असून पुस्तकी किंमत ९३० आहे. कंपनीवर एका नव्या पशाचे कर्ज नाही. प्रवर्तक फिरोदिया कुटुंबाने भागभांडवलातील आपला वाटा ५६.४० टक्क्यांवरून ५९.७२ टक्के वाढविला. कंपनीच्या भागभांडवलातील भारतीय नागरिकांचा वाटा १८.९ टक्के आहे. तिसऱ्या उत्पादन प्रकल्प उभारणीचे काम चेन्नई येथे सुरू असून जानेवारी २०१५ मध्ये उत्पादनास सुरू होईल. कंपनीने वेगवेगळ्या गटात एकूण सहा नवीन वाहने विकसित केली असून आíथक वर्ष २०१६ मध्ये ही वाहने उपलब्ध करून देण्याचा बेत आहे. फोर्स वनला लाभलेल्या ग्राहकांच्या पसंतीनंतर कंपनी टोयोटा इनोव्हा, मारुतीच्या एर्टिगा किंवा मिहद्रच्या झायलो यांच्याशी स्पर्धा करणारी सात प्रवासी क्षमतीचे वाहन पुढील वर्षांत उपलब्ध करून देणार आहे. पुढील चार वष्रे कंपनी क्षमता वाढविण्यासाठी दरवर्षी १०० कोटी भांडवली खर्च करणार आहे. कंपनीने हाती घेतलेल्या विस्तार योजनांची येत्या तीन वर्षांत पूर्ती होणार असून यानंतर कंपनीची विक्री १०,००० कोटींपर्यंत वाढविण्याचा कंपनीच्या योजना आहेत. चौथ्या कारखान्याची उभारणी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाची गुजरात सरकारबरोबर बोलणी सुरू असून साणंद (टाटा मोटर्स) किंवा मेहसाणा (मारुती सुझुकी) येथे ७०० ते ८०० एकर जागा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीची प्रतिसमभाग मिळकत २०१६ मध्ये ९० व २०१७ मध्ये १०७ असण्याची अपेक्षा आहे. कंपनीचा पीई १८.६, तर २०१६ व २०१७ साठीचा पीई अनुक्रमे १६.४ व १३.७ असण्याची अपेक्षा केली तर दिवाळी २०१६ मध्ये या कंपनीचा भाव २००० दरम्यान असेल, अशा अपेक्षेने या गुंतवणुकीची आम्ही शिफारस करत आहोत.
राठी रिसर्च टीम
institutionalresearch@rathi.com
(राठी रिसर्च टीम ही आघाडीची समभाग संशोधन संस्था आहे.)