scorecardresearch

करावे कर-समाधान : असूचीबद्ध कंपन्यांच्या समभागातील गुंतवणूक आणि प्राप्तिकर कायदा

असूचीबद्ध कंपनीच्या समभागांतील गुंतवणूकदाराच्या प्राप्तिकराधीनतेच्या टप्प्यानुसार अल्पकालीन भांडवली नफा करपात्र असतो.

प्रवीण देशपांडे
असूचीबद्ध कंपनीच्या समभागांतील गुंतवणूकदाराच्या प्राप्तिकराधीनतेच्या टप्प्यानुसार अल्पकालीन भांडवली नफा करपात्र असतो. त्याचप्रमाणे, विक्रीपूर्वी अशा समभागांचा धारण काळ २४ महिन्यांहून अधिक असल्यास दीर्घकालीन नफा होतो. इंडेक्सेशनच्या लाभासह २० टक्के दराने दीर्घकालीन लाभ कर आकारला जातो.

व्यवसाय करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्यवसाय स्वत:च्या नावाने, भागीदारी संस्थेच्या नावाने असू शकतो, कंपनीच्या रूपातही उद्योग-व्यवसाय केला जातो. या प्रत्येक पर्यायामध्ये करआकारणी वेगवेगळय़ा पद्धतीने होते. खासगी कंपन्यांच्या रूपात (ज्यांचे समभाग शेअर बाजारात सूचीबद्ध नाहीत) उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खासगी कंपनीमध्ये स्वत: किंवा मित्र, नातेवाईकांकडून गुंतवणूक स्वीकारली जाते.
शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या बऱ्याच कंपन्यांचा प्रवास छोटय़ा खासगी कंपनीतून सुरू झाला आहे. ज्यांनी कंपनी शेअरबाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना अनेक पटीत लाभ झाले आहेत. अर्थात परतावा शक्यता जास्त असली तरी यात जोखीमसुद्धा खूप जास्त आहे. असे समभाग बाजारात खरेदी करता किंवा विकता येत नाहीत. अशा समभागांत ज्या करदात्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांनी काही विशेष बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. अशा कंपन्यांच्या समभागांच्या धारणेची माहिती करदात्याला आपल्या विवरणपत्रात दर्शवावी लागते. असे समभाग विकताना समभागाचे ‘वाजवी बाजार मूल्य’ जाणून घेणे गरजेचे आहे. हे जाणून न घेता व्यवहार केल्यास खरेदी करणाऱ्याला किंवा विक्री करणाऱ्याला जास्त कर भरावा लागू शकतो.

अशा खासगी कंपन्यांच्या समभागावर मिळालेल्या उत्पन्नावर करआकारणी कशी होते हे जाणून घेतले पाहिजे. खासगी कंपन्यांनी दिलेला लाभांश हा गुंतवणूकदाराला करपात्र आहे. समभागाच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा असतो. खासगी कंपन्यांचे समभाग खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यास ती संपत्ती दीर्घ मुदतीची होते आणि त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो, अन्यथा तो अल्प मुदतीचा मानला जाईल. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा करदात्याला घेता येतो. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. खासगी कंपनीने समभागांची पुनर्खरेदी (बाय-बॅक) केल्यास गुंतवणूकदाराला कर भरावा लागत नाही.

वाचकांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न : मी, एप्रिल २०२२ मध्ये एका खासगी कंपनीचे समभाग विकले. हे समभाग माझ्या वडिलांनी जून २०१२ मध्ये खरेदी केले होते. वडिलांच्या निधनानंतर मार्च २०२२ मध्ये ते माझ्या नावाने हस्तांतरित झाले. या समभागावर होणारा भांडवली नफा कसा गणला जाईल? आणि त्यावर किती कर भरावा लागेल? – आनंद जोशी
उत्तर : खासगी कंपन्यांचे समभाग खरेदी केल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यास ती संपत्ती दीर्घ मुदतीची होते. आपल्या बाबतीत हे समभाग मार्च २०२२ मध्ये (म्हणजे विकण्यापूर्वी एक महिना आधी) जरी आपल्या नावावर हस्तांतरित झाले असले तरी या बाबतीत हा धारणकाळ ठरवताना वडिलांनी हे समभाग कधी विकत घेतले हे विचारात घेतले जाते. तसेच त्यांनी ज्या मूल्याला ते खरेदी केले होते ते मूल्य विचारात घेतले जाते. महागाई निर्देशांकानुसार गणलेले खरेदी मूल्य आणि विक्री किंमत यामधील फरक हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असेल आणि त्यावर २० टक्के दराने (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल.

प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. उद्गम करासाठी एप्रिल महिन्यात मी नवीन करप्रणालीचा पर्याय (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा पर्याय) माझ्या कंपनीला कळविला होता त्यानुसार त्यांनी तीन महिन्यांचा उद्गम कर कापला. आता मी नवीन घर घेत आहे आणि त्यासाठी गृहकर्जसुद्धा घेत आहे. मी करप्रणालीचा नवीन पर्याय निवडल्यामुळे मला गृहकर्जावरील व्याजाची आणि मुद्दल परतफेडीची वजावट घेता यणार नाही. मी हा पर्याय बदलू शकतो का? – प्रथमेश सावरटकर
उत्तर : ज्या करदात्याच्या उत्पन्नात ‘उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा’ समावेश नाही असे करदाते दरवर्षी करप्रणालीचा पर्याय बदलू शकतात. आपण आपल्या कंपनीला उद्गम करासाठी कळविलेला पर्याय आपण बदलू शकत नाहीत, त्यामुळे कंपनीकडून उद्गम कर हा तुम्ही दिलेल्या पर्यायानुसारच त्या वर्षांत कापला जाईल. परंतु त्या वर्षीचे विवरणपत्र भरताना आपण हा पर्याय बदलू शकता. आपण विवरणपत्र भरताना बदललेल्या निर्णयामुळे उद्गम कर कमी कापला गेला असेल तर तो करदात्याला व्याजासकट भरावा लागेल किंवा उद्गम कर जास्त कापला गेला असेल तर त्याच्या करपरताव्याचा दावा (रिफंड) करावा लागेल.

प्रश्न : मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी परदेशात पैसे पाठविले. असे पैसे पाठविताना बँकेने माझ्याकडून ५ टक्के अतिरिक्त कर (टीसीएस) गोळा केला. हा गोळा केलेला कर मला परत मिळू शकतो का? – एक वाचक
उत्तर : ‘लिबरलाइस्ड रेमिटन्स स्कीम’अंतर्गत एका वर्षांत ७ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायची असेल तर पैसे पाठविणाऱ्याला त्या रकमेच्या ५ टक्के इतकी अतिरिक्त रक्कम टीसीएस म्हणून बॅंकेला किंवा ज्या अधिकृत डिलरकडून विदेशी चलन खरेदी केले आहे त्याला द्यावी लागते. करदात्याला त्या वर्षीच्या त्याच्या उत्पन्नावर जो कर भरावा लागतो त्यातून हा टीसीएस वजा करता येईल आणि करदात्याचे करदायित्व शून्य असेल तर त्याला तो टीसीएस, करपरताव्याचा (रिफंड) दावा करून परत मिळविता येतो.

प्रश्न : मी नुकताच वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. माझ्या व्यवसायाचे उत्पन्न वार्षिक २५ लाख रुपये इतके आहे. मला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे का? – एक वाचक
उत्तर : ठरावीक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी (म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, सनदी लेखाकार, वास्तुविशारद, अभियंता, अंतर्गत सजावटकार, सिने कलाकार वगैरे) मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षांतील व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे. ज्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय या वर्षीच सुरू केला असेल तर या वर्षांची अपेक्षित उलाढाल दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखे ठेवणे बंधनकारक आहे. लेखे कोणते ठेवावे हे ‘प्राप्तिकर नियम ६ एफ’मध्ये नमूद केले आहे. नियमित लेख्यांच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना ‘फॉर्म ३ सी’ रजिस्टर आणि औषधसाठय़ाची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षणासाठी त्या वर्षांची उलाढाल किंवा जमा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखापरीक्षण बंधनकारक आहे. ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी नफा ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविला असेल तर त्यांना ‘कलम ४४ एडीए’नुसार लेखापरीक्षण करून ‘कलम ४४ एबी’प्रमाणे अहवाल दाखल करणे बंधनकारक आहे. ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी ‘कलम ४४ एडीए’प्रमाणे अनुमानित कराच्या तरतुदीनुसार नफा ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दाखविला असेल तर त्यांना लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही आणि लेखे ठेवणेसुद्धा बंधनकारक नाही.
लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार
pravin3966 @rediffmail. Com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment income tax act sale indexation business amy

ताज्या बातम्या