आगामी २०२३ साठी गुंतवणूक-पट बदलेल, पण कसा? | Investment Mutual funds Charles Dickens portfolio markets Economy of India amy 95 | Loksatta

आगामी २०२३ साठी गुंतवणूक-पट बदलेल, पण कसा?

तीन म्युच्युअल फंडांच्या प्रमुखांनी मांडलेले विश्लेषण

आगामी २०२३ साठी गुंतवणूक-पट बदलेल, पण कसा?

‘हा काळ सर्वोत्कृष्ट होता, हा काळ सर्वात वाईट होता’ – चार्ल्स डिकन्स यांच्या या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे आशा-निराशेची अनुभूती प्रत्येक जाणारा काळ देतच असतो. कदाचित या ओळीच सध्याच्या बाजार परिस्थितीचेही सुयोग्य वर्णन ठरतील. जगभरावर मंदीची छाया, भू-राजकीय समस्या, उच्च व्याजदर आणि अशाच अनेक संकटांनी आपण वेढलेले आहोत. भारतीय बाजारपेठेत निर्देशांकांच्या जवळजवळ १८ महिन्यांच्या चढाईनंतर, मागील एक वर्ष आपल्यासाठी संमिश्र स्वरूपाचे राहिले. तरी आपल्याकडे अर्थवृद्धीला भरपूर वाव आहे आणि तशी आशावादी भाकिते प्रतिष्ठित वर्तुळातून सुरू आहेत. तरी संतुलित विचार करता आणि जोखीम दक्षता म्हणून गुंतवणूकदारांनी येणाऱ्या काळाकडे कसे पाहावे, हे सूचित करणारे हे टिपण. देशातील आघाडीच्या तीन म्युच्युअल फंडांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी मांडलेले हे विश्लेषण सामान्य गुंतवणूकदारांसाठी दिशादर्शकच ठरेल.

गुंतवणूक-भांडारात तीन बदल गरजेचेच !
जागतिक अर्थव्यवस्थेपुढे नाना आव्हाने आणि अनिश्चितता असताना, भारताची अर्थव्यवस्था मात्र प्रगतिपथावर राहण्याची चांगली बातमी आली. गत पाच वर्षांचा कालावधी पाहता, उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारतीय बाजाराची कामगिरी चांगली राहिली आहे. हे असे असूनही, गुंतवणूकदारांनी जोखमींबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. एक गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही तुमचा गुंतवणूक-भांडार अर्थात पोर्टफोलिओचा नियतकालिक फेरआढावा घेणे आणि प्रसंगी त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आगामी वर्षांचे स्वागत करताना आवश्यक असलेले हे तीन बदल कोणते ते पाहू.
सुयोग्य डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक : रोखेसंलग्न अर्थात डेट फंड हा असा मालमत्ता वर्ग आहे ज्याकडे काही काळ (१८ ते २० महिने) पाठ केली गेली. मात्र आता त्यावरील वाढलेला परतावा पाहता ते पुन्हा एकदा आकर्षक दिसत आहे. किरकोळ महागाई दर अर्थात चलनवाढ रिझव्र्ह बँकेसाठी सुसह्य ६ टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते. अशात या म्युच्युअल फंड श्रेणीतील एक प्रकार ‘फ्लोटिंग-रेट बॉण्ड (एफआरबी)’ उत्तम कामगिरी करू शकतो.

एसआयपी, एसटीपीचा फायदा घ्या : गुंतवणूकदारांनी तीन ते पाच वर्षांसाठी एसआयपीद्वारे (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूक करावी. एसआयपी गुंतवणुकीसाठी बॅलन्स्ड फंड किंवा मल्टी-अॅसेट फंड यांसारख्या मालमत्ता विभाजन पर्यायांचा विचार केला जाऊ शकते. बूस्टर एसआयपी, बूस्टर एसटीपी (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन), फ्रीडम एसआयपी किंवा फ्रीडम एसडब्ल्यूपी (सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन) सारख्या पर्यायांचा विचार करता येईल.

सोने-चांदी ईटीएफ : सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात सोन्या-चांदीसारख्या कमोडिटीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. ते केवळ चलनवाढीविरुद्ध बचाव म्हणून काम करत नाहीत, तर चलनात येणाऱ्या घसरणीविरुद्धही काम करतात. गुंतवणूकदार सोने किंवा चांदीवर बेतलेले एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) द्वारे गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. ज्यांच्याकडे डीमॅट खाते नाही ते म्युच्युअल फंडांच्या गोल्ड किंवा सिल्व्हर फंड ऑफ फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतात.-निमेश शाह, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी,आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड

‘इक्विटी’च सर्वोत्तम पर्याय!
बाजार अस्थिर झाले आहेत; परंतु त्यात असामान्य असे काहीही नाही. समभाग अर्थात ‘इक्विटी’ हा असा मालमत्ता वर्ग ज्यात उच्च जोखीम अंगभूतच आहे आणि म्हणून अस्थिरता हा इक्विटी गुंतवणुकीचा एक अपरिहार्य भागच आहे. तथापि याचे वैशिष्टय़ असेही की, कालावधी जितका जास्त असेल तितका अस्थिरता घटक कमी होत जातो. म्हणूनच, भारतीय बाजाराबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन जोवर सकारात्मक आहे तोवर दीर्घ मुदतीसाठी, इक्विटी हा सर्वोत्तम मालमत्ता वर्ग ठरतो.

सशक्त कर संकलन, सुधारित बचत दर आणि भारतीय कंपन्यांचा सुधारित ताळेबंद आपण सध्या पाहात आहोत. अर्थव्यवस्थेसाठी योग्य विकास मार्गावर असल्याचे हे संकेत आहेत. पाच वर्षांच्या अंतरानंतर उद्योगधंद्यांचा क्षमता वापर ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने, नजीकच्या कालावधीत कॅपेक्स अर्थात भांडवली विस्ताराच्या योजनांना नव्याने धुमारे फुटलेले दिसतील.

तथापि काही धोकेदेखील आहेत ते लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रथम, अनिश्चित भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कटल्याची समस्या अजूनही कायम आहे. दुसरे म्हणजे, एक दशकातील कमी व्याजदर आणि सुलभ तरलता वातावरणाकडून, उच्च व्याजदर आणि तरलता आटत जाण्याच्या परिस्थितीकडे संक्रमण सुरू आहे. महागाई, चलनवाढ ही केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही चिंतेची बाब आहे आणि मध्यवर्ती बँका कठोर पतधोरणाद्वारे त्यावर नियंत्रणासाठी एकत्रितपणे काम करताना पाहिले आहे.

अनिश्चित वातावरण आणि जागतिक वाढीची मंदी लक्षात घेता हे वर्ष बाजारासाठी आव्हानात्मक असू शकते. उच्च व्याजदर नजीकच्या काळात भारतीय बाजारपेठेद्वारे ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यांकनाला धोका निर्माण करू शकतात. तसेच, भारतामध्ये, महत्त्वाच्या राज्यांमध्ये अनियमित मान्सून पाहता, अन्नधान्य महागाई दबा धरून असल्याचे दिसते.

अशा स्थितीत आमची गुंतवणुकीची पद्धत काय असेल, तर या प्रश्नाच्या उत्तरादाखल आम्ही सर्वसाधारणपणे औद्योगिक आणि ग्राहक उपभोगाची क्षेत्रे (वाहननिर्मिती व पूरक क्षेत्र) सकारात्मक आहोत. वित्तीय सेवा, प्रामुख्याने बँकांकडून कर्जाची मागणी तसेच उचल वाढली आहे आणि सशक्त भांडवली सामर्थ्यांसह, दुरुस्त झालेला ताळेबंद हा बँक समभागांच्या पथ्यावर पडणारा ठरेल.-श्रीनिवास राव रावुरी ,मुख्य गुंतवणूक अधिकारी,पीजीआयएम

इंडिया म्युच्युअल फंड
माहिती-तंत्रज्ञान समभागांचे काय कराल?
प्रचंड प्रमाणात साचलेल्या बुडीत कर्जाची समस्या आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उच्च तरतुदी या दुष्टचक्रामधून गेलेले भारतीय बँकिंग क्षेत्र सध्या खूपच अनुकूल स्थितीत आहे. खेळते भांडवल तसेच भांडवली खर्चाच्या योजना या दोहोंच्या आधारे पतपुरवठय़ात वाढीचे आकडे चांगले राहतील असा निर्देश करत आहेत. आघाडीच्या सहा-सात बँकांनी गेल्या पाच-सहा वर्षांत ठेवी आणि पतपुरवठा दोन्ही अंगांनी बाजारातील हिस्सा वाढविला त्या या नव्या परिवर्तनाच्या लाभार्थी ठरतील.

अलीकडच्या काळात, वाहननिर्मिती, बँकिंग, देशांतर्गत भांडवली वस्तू, इंडस्ट्रियल्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये एक प्रकारची वाढ दिसून आली आहे आणि संलग्न समभागांच्या मूल्यांकनाची याच क्रमाने फेरमांडणी होत आहे. याउलट धातू, माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य निगा यांसारख्या काही जागतिक चक्रीय क्षेत्रांमध्ये वाढीची शक्यता कमी होऊ लागली आहे आणि त्यांचे मूल्यांकन घटत चालले आहे.

नवीन युगातील तंत्रज्ञान समर्थ उद्योग क्षेत्रांमध्ये – फिनटेक, एज्युटेक, हेल्थ टेक, फूड टेक अशा नवनवीन गोष्टी उदयास आल्याचे आपण पाहत आहोत. एखाद्याला एक तर व्यवसायाच्या विद्यमान प्रारूपात त्यापायी मोठी उलथापालथ करणे भाग ठरेल किंवा ग्राहकांना सांभाळून ठेवण्यासाठी काही मूल्य वितरणासह नवीन व्यवसाय प्रारूप तयार करावे लागेल.

जागतिक कंपन्यांवर खर्चावर आवर घालून, कामे आऊटसोर्स करण्याचा सततचा दबाव आहे. त्यामुळे आऊटसोर्सिग पुढेही सुरू राहील आणि भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्या या आघाडीवर तुलनेने चांगल्या स्थितीत आहेत. मात्र साथीच्या काळात निर्माण झालेल्या समस्या-अडथळय़ावर मात म्हणून अल्पकालीन लक्ष्याने आखलेल्या प्रकल्पांवर अनेक कंपन्यांनी जे चांगले पैसे खर्च केले, ते प्रकल्प थंडावताना दिसत आहेत. त्याची सुरुवातीची चिन्हे आपल्याला दिसत आहेत. परिणामी पुढील दोन-तीन तिमाहींमध्ये या कंपन्यांच्या नफाक्षमतेवर दबाव, कर्मचाऱ्यांची भरती आणि त्यांचे वेतनमान लक्षणीयरीत्या कमी होईल. तथापि यापैकी बऱ्याच कंपन्या अत्यंत चांगल्या प्रकारे चालविल्या जाणाऱ्या, उच्च रोख उत्पन्न कमावणाऱ्या, चांगला लाभांश देणाऱ्या, भांडवली वाटपाच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध आहेत. म्हणून फार तर तीन महिने ते सहा महिने कळ सोसावी लागल्यानंतर या क्षेत्रात पुन्हा बहार दिसून येईल.-आनंद राधाकृष्णन , मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग – भारत व उभरत्या बाजारपेठा), फ्रँकलिन टेम्पल्टन इंडिया

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2022 at 00:05 IST
Next Story
जाहल्या काही चुका.. :‘एसआयपी’ सोडवी आता शैक्षणिक खर्चाची चिंता