गुंतवणुकीची संधी : आदित्य बिर्ला सनलाइफ बिझनेस सायकल फंड

भांडवली बाजारातील परतावे हे वेगवेगळ्या व्यापारचक्रांच्या टप्प्यांमुळे प्रभावित होत असतात.

मुंबई : आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाचा ‘बिझनेस सायकल फंडा’ची प्रारंभिक विक्री (एनएफओ) सोमवार (१५ नोव्हेंबर) खुली झाली असून, ती २९ नोव्हेंबरला बंद होईल. ही व्यापार चक्रावर आधारित गुंतवणूक संकल्पनेचे पालन करणारी आणि गुंतवणुकीस कायम खुली (ओपन एंडेड) समभागसंलग्न योजना आहे.

भांडवली बाजारातील परतावे हे वेगवेगळ्या व्यापारचक्रांच्या टप्प्यांमुळे प्रभावित होत असतात. वृद्धी, मंदी, घसरण आणि फेरउभारी असे व्यापारचक्राचे चार वेगवेगळे टप्पे असतात. मात्र त्यांचे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर एक सकारात्मक गुंतवणूक अनुभव प्राप्त करता येऊ शकतो. व्यापारचक्र कोणत्या टप्प्यावर किती दिवस राहणार किंवा किती लवकर संपुष्टात येणार हे आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेच योग्य वेळी योग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे आवश्यक असून, नवीन ‘बिझनेस सायकल फंड’ गुंतवणुकीची हीच रणनीती अवलंबते.

आदित्य बिर्ला सनलाइफचे व्यवस्थापकीय संचालक ए. बालसुब्रमणियम यांच्या मते, अर्थव्यवस्था वेळोवेळी विस्तारते आणि घसरणीच्या टप्प्यातून देखील जात असते. संशोधनातून असे दिसून येते की, ग्राहकोपयोगी वस्तू (एमएफसीजी), आरोग्यनिगा व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र हे घसरणीच्या टप्प्यात चांगला परतावा देतात. तर धातू, वित्तीय सेवा आणि सिमेंट हे विस्ताराच्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करतात. आदित्य बिर्ला सनलाइफ बिझनेस सायकल फंड सक्रिय रूपात गुंतवणुकीच्या संधी ओळखून, व्यापारचक्राच्या त्या त्या टप्प्याच्या दृष्टीने निधीवाटप करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा निर्माण करण्यास मदत करेल.

ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज मठपाल यांनी स्पष्ट केले की, गुंतवणूकदारांना बाजारचक्र समजून घेऊन आणि कोणत्या क्षेत्रात कधी आणि कशी गुंतवणूक करावी किंवा गुंतवणूक काढावी याचा निर्णय घेता येणे कठीण होते. म्हणूनच अर्थव्यवस्था आणि क्षेत्रवार व्यापारचक्रावर आधारित विचार करून गुंतवणूक करणारा ‘बिझनेस सायकल फंड’ हा गुंतवणूकदारांसाठी एक सोपा उपाय ठरू शकतो आणि त्यांना या फंडाच्या माध्यमातून अनेक लाभ मिळू शकतात. या नवीन फंडामध्ये किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करता येईल.

पीजीआयएम ग्लोबल सिलेक्ट रिअल इस्टेट सिक्युरीटीज फंड ऑफ फंड

मुंबई : पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने देशातील पहिल्या जागतिक स्थावर मालमत्ता क्षेत्रावर बेतलेली योजना ‘पीजीआयएम ग्लोबल सिलेक्ट रिअल इस्टेट सिक्युरीटीज फंड ऑफ फंडा’ची घोषणा केली. 

ही एक गुंतवणुकीस कायम खुली असलेली ‘फंड ऑफ फंड’ धाटणीची योजना असून, भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीची संधी ती उपलब्ध करून देईल. योजनेचा प्रारंभिक विक्री प्रस्ताव (एनएफओ) १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान खुला असेल. या फंडाचा मानदंड निर्देशांक हा ‘एफटीएसई रिअ‍ॅल्टी इंडेक्स’ निश्चित करण्यात आला आहे. रिटस् आणि जगातील विविध भागात कार्यरत असलेल्या स्थावर मालमत्ता विकास कंपन्यांच्या समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारा ‘पीजीआयएम ग्लोबल सिलेक्ट रिअल इस्टेट सिक्युरिटीज फंडा’च्या युनिटमध्ये गुंतवणूक करत दीर्घ कालावधीत भांडवलवृद्धी मिळविणे हा या नवीन फंडाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक पातळीवर स्थावर मालमत्ता हा गुंतवणुकीचा प्रकार उदयास आला असून सध्याच्या महामारीच्या साथीत त्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. जगातील अनेक अर्थव्यवस्था जशाजशा करोनामुक्त होत आहेत, तसतशी हॉटेल्स, रहिवाशी संकुल सुविधा आणि आदरातिथ्य यांना अतिरिक्त वाढलेल्या मागणीचा फायदा होणार आहे. महामारीमुळे क्लाउड कॉम्प्युटिंग, दूरस्थ शाळा, दूरस्थ कार्यपद्धती, ई-कॉमर्स आणि रिटेलसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मागणी वाढताना दिसलेली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रास गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे.

पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मेनन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, भारतीय गुंतवणूकदार आणि सल्लागारांसाठी समर्पक आणि काळानुरूप गुंतवणूक कल्पना आणण्याचा प्रयत्न म्हणून या फंडाकडे पाहता येईल आणि अशा गुंतवणूक प्रकारात ‘पीजीआयएम’ या मुख्य संस्थेचे प्रावीण्य असामान्य आहे.

जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत गुंतवणूक योग्य साधने म्हणून मोठय़ा प्रमाणात ‘अ’ दर्जाच्या वाणिज्य मालमत्ता, भांडारगृहे, मालवाहतूक – साठवणूक गृहे, रिटेल दालने, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारगृहे, शीतगृहे यासारखे विविध उप-प्रकार एकतर भारतात उपलब्ध आहेत किंवा नाहीत. आजच्या घडीला असलेला व्याजदर आणि चलनवाढीच्या दराचा विचार करता नवीन फंडातील गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओत लवचीकता निर्माण करण्याच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा घटक असेल, असे मेनन यांनी सूचित केले.

अ‍ॅक्सिस निफ्टी-५० इंडेक्स फंड

मुंबई : बाजारातील अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने ‘निफ्टी-५० इंडेक्स फंड’ या लोकप्रिय निफ्टी ५० निर्देशांकांवर आधारीत लार्ज कॅप इंडेक्स फंडाची बुधवारी घोषणा केली. नवीन फंड प्रस्तुती १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुली असणार आहे. या फंडाच्या माध्यमातून  ८० ते १०० कोटी रुपये उभारले जाण्याची फंड घराण्याला आशा आहे. 

 फंडाच्या माध्यमातून निफ्टी ५० निर्देशाकांमध्ये एकाच भाराने प्रतिनिधीत्व करणाऱ्या आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे.  गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील १३ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये एकत्रित गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. अ‍ॅक्सिस निफ्टी ५०

इंडेक्स फंडाचे व्यवस्थापन अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडातील समभाग गुंतवणूक विभागाचे प्रमुख जिनेश गोपानी करणार आहेत.

दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी अ‍ॅक्सिस निफ्टी-५० इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्याने एकाच ठिकाणी गुंतवणूक करून निर्देशांकातील आघाडीच्या ब्लू-चिप कंपन्यांमध्ये निधी गुंतविला जाऊन गुंतवणूकदारांना विविधीकरणाचा फायदा मिळू शकतो. शिवाय त्यांना येत्या काही दशकांमधील भारताच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा कमी खर्चिक आणि पारदर्शक पर्याय आहे.  नवीन फंड योजना सादर करताना अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले, नवीन फंडाचे गुणवत्ता आणि वाढ हे प्रमुख तत्व असून यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Investment opportunities zws 70

Next Story
बाजाराचे तालतंत्र : तेजीवाल्यांची सरशी ‘निफ्टी’ला कुठवर नेईल?
ताज्या बातम्या