जाहल्या काही चुका.. : कधी ऊन वा सावली लागते रे ..! | Investors Big Tech Fang Facebook Apple Amazon Netflix Google international investment amy 95 | Loksatta

जाहल्या काही चुका.. : कधी ऊन वा सावली लागते रे ..!

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारासाठी चालू वर्ष (कॅलेंडर वर्ष २०२२) आणि पुढील वर्ष हे जागतिक आर्थिक वृद्धीदर समाधानकारक नसण्याच्या शक्यतेमुळे प्रतिकूल असतील.

जाहल्या काही चुका.. : कधी ऊन वा सावली लागते रे ..!

वसंत कुळकर्णी
जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या, बिग टेक ‘फांग’ – एफएएएनजी (फेसबुक, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स गूगल या कंपन्यांच्या आद्याक्षरातून बनलेले उपनाम) कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यात घसरण होऊ लागली आहे. या स्थितीत अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे काय करावे हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न..


परदेशातील, विशेषत: अमेरिकेतील आणि नॅसडॅकवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांतील गुंतवणुकीवर मिळविल्या गेलेल्या आकर्षक परताव्यामुळे अनेक भारतीय गुंतवणूकदारांनीदेखील २०२१ ते २०२२ या कालावधीत तेथील कंपन्यांची आपल्या जुन्या गुंतवणुकीत भर घालती. परंतु आंतरराष्ट्रीय फंडांमधील नव्या गुंतवणुकीवर बंदी घालणाऱ्या ‘सेबी’च्या फतव्यामुळे सध्या या फंडातील ‘एसआयपी’ बंद आहेत. जागतिक मंदी आणि विशेषत: अमेरिकेतील मंदीच्या भीतीने, अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे काय करावे हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारासाठी चालू वर्ष (कॅलेंडर वर्ष २०२२) आणि पुढील वर्ष हे जागतिक आर्थिक वृद्धीदर समाधानकारक नसण्याच्या शक्यतेमुळे प्रतिकूल असतील. रशिया-युक्रेन संघर्षांमुळे तेल आणि नैसर्गिक वायूसारख्या इंधनापासून ते गहू आणि खाद्यतेलापर्यंतच्या विविध वस्तूंच्या पुरवठय़ात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, जगभरात महागाईने कळस गाठला आहे. वाढत्या महागाईचा परिणाम ग्राहकांच्या घरखर्चावर परिणाम झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील मागणी घटली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन समजला जाणारा चीन जो सर्वाधिक उपभोग असणारा जगातील सर्वात मोठा ग्राहक देश आहे आणि वस्तू निर्मितीत अग्रेसर असल्याने उत्पादित वस्तूंचा सर्वात मोठा निर्मातासुद्धा आहे. चीनची जिन्नसांची मागणी मोठय़ा प्रमाणावर घटल्याचे दिसत आहे.

जागतिक मध्यवर्ती बँकांनी महागाईशी दोन हात करण्यासाठी आक्रमकपणे व्याजदरात वाढ केली. या आधीच्या वर्षी विपुल रोकड सुलभतेकडून मुद्रास्थिती नियंत्रित करण्याकडे मध्यवर्ती बँकांचा कल आहे. परिणामी, जगभरात कंपन्यांच्या उत्सर्जनात घट झाल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जुलै महिन्यातील ‘वल्र्ड इकॉनॉमिक आउटलुक’मध्ये बहुतांश देशांसाठी, विशेषत: प्रगत अर्थव्यवस्थांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या अंदाजात झपाटय़ाने कपात केली आहे. परंतु बहुसंख्य जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचे मुख्यालय अमेरिका किंवा युरोपीय महासंघांमध्ये आहे हे लक्षात घेता, मंदीमुळे त्यांच्या उत्पन्नाच्या अंदाजात कपात करावी लागली आहे. या वित्तीय संस्थांनी त्यांच्या मिळकतीतील खड्डा भरून काढण्यासाठी त्यांनी विकसित आणि उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसे काढून घेतले. ‘स्टॉक प्राइसेस आर स्लेव्ह्ज ऑफ अर्निग’ अशी म्हण आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून जागतिक अर्थव्यवस्स्थेचा वृद्धीदर झपाटय़ाने घटण्याची भीती आणि रोकड सुलभता कमी होण्याच्या भाकितांच्या जोडीला व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे जागतिक शेअर बाजारात पडझड झाली. या कालावधीत भारतीय शेअर बाजार जगातील उत्तम कामगिरी करणाऱ्या बाजारांपैकी एक असल्याने देशांतर्गत गुंतवणुकीवरील आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवरील परताव्यात टोकाची तफावत दिसत आहे.

अमेरिकेतील शेअर बाजारांत तीन कारणांमुळे तीव्र घसरण झाल्याचे मानण्यात येते. पहिले कारण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत तीव्र मंदी येण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांना दिसत आहे. काहींना या मंदीचे सावट अजून एक वर्ष म्हणजे ऑक्टोबर २०२३ पर्यंत (जुलै – सप्टेंबर २०२३ तिमाहीच्या अखेपर्यंत) राहण्याची शक्यता वाटते. दुसरे कारण अमेरिकेत इंधन आणि खाद्यपदार्थाच्या किमतींमध्ये अपवादात्मक वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला उच्च चलनवाढीचा सामना करावा लागत आहे. किरकोळ महागाई फेब्रुवारी २०२२ मधील ७.९ टक्क्यावरून, जून २०२२ मध्ये ९.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. कैक दशकांच्या उच्चांकी असलेला हा महागाईचा दर भविष्यातदेखील चढा राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांना वाटते. अमेरिकेची अर्थव्यवस्था उपभोगप्रधान असल्याने, ७० टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही ग्राहकांच्या उपभोगावरील खर्चामुळे होते. आज वाढत्या महागाईमुळे उपभोगावरील खर्चावर मर्यादा आल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भूतो न् भविष्यती अशा जोखमीचा सामना करावा लागत आहे. तिसरे कारण, जागतिक मध्यवर्ती बँकांपैकी, अमेरिकेची फेड ही महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवण्यात जगातील सर्वात आक्रमक मध्यवर्ती बँक ठरली आहे. महागाई तात्पुरती आहे असे सुरुवातीला ठामपणे सांगणाऱ्या जेरॉम पॉवेल यांना महागाईवर काबू मिळविण्यासाठी ‘पॉलिसी रेट’ सव्वा दोन टक्क्यांनी वाढवावे लागले. गेल्या चार महिन्यांत पॉलिसी रेट जवळपास शून्यावरून २.२५ टक्क्यांवर त्यांनी नेले असून, डिसेंबपर्यंत व्याजदरात आणखी १ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेत नवीन घर खरेदी या गोष्टीला फार महत्त्व आहे. गृहखरेदी व्याजदर संवेदनशील असल्याने गृह तेजीला मोठय़ा प्रमाणात खीळ बसेल. प्रसंगी कर्जदार बचत मोडून गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करतील अशी भीती वाटते. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपुढील अडचणीत वाढ होईल. खरं तर, अमेरिकेच्या जानेवारी-मार्च आणि एप्रिल-जून या तिमाहीच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीत घसरण झाली आहे. फेडच्या मागील बैठकीत महागाईचे लक्ष्य ९ टक्क्यांवरून २ टक्के निर्धारित केले गेले आहे. सध्याच्या परिस्थितीत भविष्यात फेड व्याजदर कमी करेल अथवा व्याजदर वाढविण्याची तीव्रता कमी होईल अशी चिन्हे अजिबात दिसत नाहीत. महागाई २ टक्क्यांवर आणण्याच्या फेडच्या निर्धारामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा मंदीच्या दिशेने प्रवास अधिक वेगवान होईल असा अर्थतज्ज्ञांचा कयास आहे.

करोनाकाळात तंत्रज्ञानाधारित क्षेत्रातील दिग्गजांच्या नफ्यात मागणी वाढल्याने मोठी वाढ झाली. ई-कॉमर्स सेवा, ओटीटी स्ट्रीिमग, क्लाउड सेवा, वर्क-फ्रॉम-होम सोल्युशन्स इत्यादींची मागणी करोना र्निबध उठल्याने कमी होऊ लागली आहे. जागतिक स्तरावरदेखील बिग टेक ‘फांग’ – एफएएएनजी (फेसबुक, अॅपल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, गूगल या कंपन्यांच्या आद्याक्षरातून बनलेले उपनाम) कंपन्यांच्या विक्री आणि नफ्यात घसरण होऊ लागली आहे. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा उच्च मूल्यांकन असलेल्या समभागांचे ‘डी-रेटिंग’ होते. ‘फांग’ हे पूर्वीच्या तेजीत सर्वात महाग आणि सर्वाधिक वाढ नोंदविलेले समभाग होते. त्यांना आता डी-रेटिंगचा सामना करावा लागला आहे. टेक कंपन्यांकडून बाजाराने वाढीची अपेक्षा (अर्निग डी रेटिंग) झपाटय़ाने कमी केल्याने ‘यूएस एस अॅण्ड पी ५००’ आणि ‘नॅसडॅक १००’च्या किंमत-उत्सर्जन गुणोत्तरात (पीई) मध्ये अधिक तीव्र घसरण झाली.
भारतीय गुंतवणूकदारांना परदेशातील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा रुपयाच्या विनिमय दरावर अवलंबून असतो. जागतिक अस्थिरतेत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार याच आधारे भारतीय बाजारपेठेतून पैसा काढतात. परिणामी, डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरतो. रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याचा फायदा आंतरराष्ट्रीय फंडातील गुंतवणूकदारांना होतो. परकीय गुंतवणूकदरांसाठी अमेरिका ही मुख्य बाजारपेठ आहे. या गुंतवणूकदारांचे अमेरिकेचे सार्वभौम रोखे हे सर्वात आवडते साधन आहे. अमेरिकेच्या सार्वभौम रोख्यावरील परतावा मागील ४० वर्षांतील उच्चांकी असल्याने अमेरिकेचे सार्वभौम रोखे हे गुंतवणूकदारांचे नंदनवन ठरले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात गेल्या एका वर्षांत ६.१ टक्के आणि जानेवारीपासून ५.६ टक्के इतकी घसरण झाल्याने भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या परदेशातील गुंतवणुकीवर होणारा तोटा कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात भारताची चालू खात्यातील तूट वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण होण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

पुढील दोन ते तीन वर्षांचा विचार करून अमेरिकाकेंद्रित आंतरराष्ट्रीय फंडांऐवजी उदयोन्मुख देशात गुंतवणूक करणाऱ्या फंडामध्ये गुंतवणूक करणे ही चांगली रणनीती ठरू शकते. कर कार्यक्षमतेचा विचार करून (तीन वर्षे पूर्ण झालेल्या गुंतवणुका) किंवा नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख देशात गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा नक्कीच विचार करावा.

बिग टेक ‘फांग’ – एफएएएनजी
समभागांचा ९ सप्टेंबरचा बंद भाव (अमेरिकी डॉलरमध्ये) ५२ आठवडय़ातील उच्चांकी व नीचांकी पातळी

फेसबुक
१६९.१५
+७.०९ (४.३७ %)
उच्चांक ३८३.७९
नीचांक १५४.२५

अमेझॉन
१३३.२७
+३.४५ (२.६६ % )
उच्चांक १८८.११
नीचांक १०१.२६

ॲपल
१५७.३७
+२.९१ (१.८८ %)
उच्चांक १८२.९४
नीचांक १२९.०४

नेटफ्लिक्स
२३३.५७
+६.१३ (२.७० %)
उच्चांक ७००.९९
नीचांक १६२.७१

गूगल
११०.६५
+२.२७ (२.०९ %)
उच्चांक १५१.५५
नीचांक १०१.८८
shreeyachebaba@gmail. Com
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
माझा पोर्टफोलियो : ‘एमडीएफ’च्या उभरत्या बाजारपेठेसाठी दावेदारी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार
FIFA WC 2022: ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारने केला नवा विक्रम, रोनाल्डो, मेस्सी आणि पेरिसिक यांच्या पंगतीत सामील
टेक्नॉलॉजीची कमाल! भविष्यात मुलांना सोडण्यासाठी थेट घरात मेट्रो येणार? पाहा Viral Video
फ्लॉवरची भाजी आवडीने खाताय? पण ‘या’ आजारांमध्ये ही भाजी चुकूनही खाऊ नका, नाहीतर…
सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा! सरकार शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार