अतुल कोतकर atulkotkar@yahoo.com

जगभर पसरलेल्या करोनाच्या संसर्गामुळे विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीला पूर्ववत करण्यासाठी देश-विदेशातील मध्यवर्ती बँकांनी त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये पुरेशी रोकडसुलभता राहील याची दक्षता घेतली. उपलब्ध रोकडसुलभतेचा लाभ भांडवली बाजारातील तेजीला कारणीभूत ठरला. या तेजीचे सर्वाधिक लाभार्थी ‘फोकस्ड इक्विटी फंड’ ठरल्याचे दिसते. बाजारात अवतरलेल्या या तेजीवर आरूढ झालेला आणि फोकस्ड इक्विटी फंड या फंड गटात परतावा तालिकेच्या अग्रस्थानी असलेल्या फ्रँकलिन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड आणि निप्पॉन इंडिया फोकस्ड इक्विटी फंडाच्या शिफारसीनंतर एल अ‍ॅण्ड टी फोकस्ड इक्विटी फंड येत्या शुक्रवारी ५ नोव्हेंबरला तीन वर्षे पूर्ण करीत असल्याने या फंडाची दखल घेणे आवश्यक वाटते.

गेल्या वर्षी जून २०२० पासून सुरू झालेल्या तेजीमुळे अनेक फंडांनी भरघोस परतावा दिला आहे. ज्या फंड गटांत भरघोस परतावा मिळाला आहे त्यात फोकस्ड इक्विटी फंड गटाचा समावेश आहे. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या ऑक्टोबर २०१८ मधील फंड सुसूत्रीकरणानंतर समभाग केंद्रित पोर्टफोलिओमध्ये ३० पेक्षा अधिक कंपन्या नसलेला हा फंड गट आहे. एल अ‍ॅण्ड टी फोकस्ड इक्विटी फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना ५ नोव्हेंबर २०१८ ते १७ डिसेंबर २०१९ आणि १७ डिसेंबर २०१९ ते २९ नोव्हेंबर २०२१ अशा दोन भागांत विभाजन गरजेचे आहे. फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक विहंग नाईक यांच्याकडे फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे १७ डिसेंबर २०१९ पासून आली. विहंग नाईक हे फंडाचे निधी व्यवस्थापक तर वेणुगोपाल मंगत हे सह-निधी व्यवस्थापक आहेत.

फंडाच्या गुंतवणुकीची रचना मल्टीकॅप प्रकारची असून गुंतवणूक लार्जकॅप केंद्रित आहे. फंडाच्या एकूण गुंतवणुकीच्या ५३.६ टक्के गुंतवणूक लार्जकॅप प्रकारात मोडणाऱ्या कंपन्यांत असून उर्वरित २९.०१ टक्के मिडकॅप, ११.९९ टक्के स्मॉलकॅप आणि ५.४ टक्के अन्य प्रकारांत आहे. करोनाकाळात निधी व्यवस्थापकाने साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययाचा फायदा होऊ शकणाऱ्या कंपन्यांवर केंद्रित पोर्टफोलिओ बनविला. सुदृढ ताळेबंद आणि चांगल्या वृद्धीची शक्यता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आला. करोनामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता असलेल्या कंपन्या पोर्टफोलिओतून पूर्णपणे वगळण्यात आल्या किंवा त्यांचे पोर्टफोलिओतील प्रमाण कमी करण्यात आले. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक माहिती-तंत्रज्ञान त्या खालोखाल तेल आणि नैसर्गिक वायू, बँकेतर वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण या उद्योग क्षेत्रातील समभागांमध्ये आहे. 

फोकस्ड फंडांच्या पोर्टफोलिओचे स्वरूप लक्षात घेता गुंतवणूकदारांनी किमान तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. आता बाजारात तेजी असल्याने मूल्यांकन सर्वोच्च पातळीवर आहे. निधी व्यवस्थापक भविष्याचा वेध घेणाऱ्या कंपन्यांची गुंतवणुकीसाठी निवड करीत असतात. निधी व्यवस्थापकांनी कोलगेट आणि आयटीसी या एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांना वगळून नव्याने सूचीबद्ध झालेल्या झोमॅटो आणि आयटी क्षेत्रातील मिडकॅप ई-क्लर्क्‍सचा नव्याने समावेश केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीतून बँकिंग क्षेत्र पूर्णपणे वगळले असल्याचा परिणाम फंडाच्या कामगिरीवर झाला आहे. या फंड गटातील बरेच फंड अशा उद्योग क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यांना कर्ज वितरणात झालेल्या वाढीचा फायदा होऊ शकेल. भांडवली उत्पादने व गृहनिर्माण क्षेत्रासह एकूण आर्थिक पुनप्र्राप्तीचा फायदा होईल अशा उद्योगात गुंतवणूक करणारा फंड असल्याने या फंडाची तीन ते पाच वर्षांसाठी ही शिफारस आहे. 

एल अ‍ॅण्ड टी फोकस्ड इक्विटी फंड

*  फंड गट     फोकस्ड इक्विटी

*  फंडाची सुरुवात      ५ नोव्हेंबर २०१८

*  फंड मालमत्ता       १,०२३ कोटी (३० सप्टेंबर २०२१रोजी)

*  मानदंड     निफ्टी ५०० टीआरआय

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)