समीर नेसरीकर
म्युच्युअल फंडांमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या फंडांमार्फत गुंतवणूक करता येते. जगभरात लोकप्रिय असणारे इंडेक्स फंड/ ईटीएफ हे ‘पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग’चे खास नमुने. त्यांच्या अनुषंगाने आणि त्याबद्दल..
समभागसंलग्न म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हटले की, आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता, फंड व्यवस्थापकाचे समभाग निवडीतील कौशल्य अशा अनेक बाबी आपल्यासमोर येत असतात. ‘सेबी’च्या २०१७ च्या परिपत्रकानुसार, लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्झी कॅप, स्मॉल कॅप, हायब्रीड फंड अशा फंडांसोबतच इंडेक्स फंड / एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) या श्रेणींचाही समावेश आहे. म्युच्युअल फंडांमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या फंडांमार्फत गुंतवणूक करता येते. ॲक्टिव्ह फंड चालविताना फंड व्यवस्थापक बाजाराच्या स्थितीप्रमाणे समभाग खरेदी विक्रीचा निर्णय घेत असतो. त्या दृष्टीने तो सक्रियपणे बाजारात कार्यरत असतो. आपण सर्व जाणताच की, प्रत्येक योजनेचा एक मानदंड (बेंचमार्क) असतो. ॲक्टिव्ह फंड व्यवस्थापकाला हा मानदंड ओलांडण्याची जबाबदारी असते, जेणेकरून योजनेचा परतावा हा मानदंडसापेक्ष जास्त राहील. आपण पॅसिव्ह फंडांचा विचार करतो तेव्हा इंडेक्स फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आपल्या समोर येतात.
जॉन बोगल यांना इंडेक्स इन्व्हेस्टिंगचे जनक मानले जाते. त्यांनी जगातील पहिला इंडेक्स फंड ‘व्हॅनगार्ड ५००’ हा १९७६ साली बाजारात आणला. त्यानंतर जगात अनेक इंडेक्स फंड सुरू झाले. भारतातही आज पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळे इंडेक्स/ ईटीएफ आलेले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
एका विशिष्ट निर्देशांकावर आधारित ‘इंडेक्स फंड’ बाजारात आणला जातो. उदाहरणार्थ ‘निफ्टी ५०’, ‘सेन्सेक्स’, ‘निफ्टी १००’ अशा वेगवेगळय़ा निर्देशांकांवर आधारित योजना आज फंड व्यवस्थापन कंपनीकडून बाजारात आणल्या गेल्या आहेत. यात फंड व्यवस्थापकाला फक्त ’इंडेक्स बास्केट’ विकत घ्यायचे असते. फंड व्यवस्थापक निर्देशांकामध्ये असणाऱ्या कंपनीच्या प्रमाणानुसार त्यात गुंतवणूक करतो. उदाहरणार्थ, ‘निफ्टी ५०’ निर्देशांक असेल तर सर्वाधिक गुंतवणूक ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ (१२.८५ टक्के, २८ एप्रिल २०२२ या रोजी) या समभागात केली जाईल. हे प्रमाण दर दिवशी थोडे फार बदलत असते. तसेच इंडेक्स फंडात अॅ क्टिव्ह फंडांच्या तुलनेत खर्च मर्यादित राहतो. परंतु इंडेक्स जेवढा परतावा देईल (योजना खर्च वजा करून) तेवढीच अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. ‘ईटीएफ’ हा कोणत्याही समभागाप्रमाणे बाजारमंचावर विकत घेता येतो. अगदी एक युनिटसुद्धा आपण विकत घेऊ शकतो. त्यासाठी डिमॅट आणि ट्रेडिंग खाते जरुरीचे आहे. ‘ईटीएफ’मध्ये इंडेक्स फंडाच्या तुलनेने खर्च कमी असतो. आपल्याला बाजाराचे ज्ञान असेल तर रणनीतीपूर्वक गुंतवणूक तुम्ही ‘ईटीएफ’मार्फत करू शकता. बाजारात बँकिंग, आयटी, हेल्थकेअर यापासून अगदी गोल्ड, सिल्व्हपर्यंत तसेच निफ्टी ५०, सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकांपासून ते निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी मिडकॅप १५०, नॅसडॅक येथपर्यंत नानाविध ‘ईटीएफ’चे पर्याय उपलब्ध आहेत. ‘स्मार्ट बीटा ईटीएफ’मध्येसुद्धा गुंतवणूक वाढते आहे. ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करताना त्या योजनेतील तरलता (लिक्विडिटी) पाहणे गरजेचे असते. विशेषत: प्रमुख निर्देशांकांच्या (निफ्टी ५० अथवा सेन्सेक्स) पलीकडे जाऊन तुम्ही एका विशिष्ट ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करणार असाल तर हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
ज्या गुंतवणूकदारांना ‘अंतर्निहित निर्देशांक’ (अंडरलाइंग इंडेक्स) जो परतावा देईल हे मान्य असते ते इंडेक्स/ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात. पण ज्यांना मानदंडापेक्षा अधिक परताव्याची अपेक्षा (जोखीम समजून घेऊन) असते ते ॲक्टिव्ह फंडांचा मार्ग स्वीकारतात. ॲक्टिव्ह फंड व्यवस्थापक स्वत:च्या अभ्यासातून, रिसर्च टीमच्या मदतीने गुंतवणूकदारांसाठी ‘मानदंडापेक्षा जास्त’ परतावा देण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या अॅक्टिव्ह फंडांनी वर्षांनुवर्षे गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मिती केली आहे. गुंतवणूकदार म्हणून आपला जोखीमांक, आर्थिक उद्दिष्टे आणि आपला प्राधान्यक्रम यावर ‘अॅमक्टिव्ह/ पॅसिव्ह’ किंवा ‘ॲक्टिव्ह अधिक पॅसिव्ह’ याचा निर्णय घ्यावा लागेल. जगभरात गुंतवणूक ही या दोन्ही मार्गानी येत आहे. भारतात ‘इक्विटी कल्चर’ हळूहळू रुजू पाहतंय अर्थात ‘रिस्क फ्री, फिक्स्ड रिटर्न’चा पगडा अजूनही जनसामान्यांवर मोठय़ा प्रमाणात आहे. भारतात जेथे ‘एयूएम टू जीडीपी’ गुणोत्तर साधारण १४ टक्के आहे (जागतिक सरासरी ७५ टक्के) तिथे ‘ॲक्टिव्ह/ पॅसिव्ह’ची ही ‘वरच्या पायरीवरील चर्चा’ आहे, असे आपण म्हणू शकता. तरीसुद्धा गुंतवणुकीचा हा कर्तरी आणि कर्मणी प्रयोग भारतात कसा रंगत जातो याची उत्सुकता आहेच. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंडाच्या दृष्टिकोनातून पाहता, ‘कोई खलिश है हवाओं में बिन तेरे’ ही भावना आज दोघांचीही असेल.
(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)
sameernesarikar@gmail. com

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज