सुधीर जोशी

खनिज तेलाच्या वाढत्या किमती, घसरलेला रुपया आणि मध्यवर्ती बँकेकडून झालेल्या व्याजदर वाढीमुळे सरलेल्या सप्ताहाची सुरुवात (३ ऑक्टोबर) प्रमुख निर्देशांकांच्या एक टक्का घसरणीनेच झाली, मात्र अमेरिकी बाजारातील उत्साहाचे प्रतिबिंब भारतीय बाजारावर मंगळवारी दिसले. प्रमुख निर्देशांक एकाच दिवसात दोन ते अडीच टक्क्यांपर्यंत वधारले. अमेरिकेतील रोखे बाजाराने पुन्हा उसळी घेतल्यामुळे परताव्याचे दर खाली आले आणि शेअर बाजारात तेजी आली, मात्र नंतरच्या दोन दिवसांत रुपयाचे घटते मूल्य, इंधन दरवाढीचे आणि पर्यायाने महागाईचे संकेत यामुळे वास्तवतेची जाणीव होऊन गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. साप्ताहिक तुलनेत प्रमुख निर्देशांक किरकोळ फरकाने पण सकारात्मक बंद झाले.

टॉरंट फार्मा:

हृदय, रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग, मज्जा संस्थांचे आजार या क्षेत्रातील निगडित औषध निर्मिती करणारी ही कंपनी आहे. नुकतेच तिने क्युरेटिओ या त्वचा आरोग्यासाठी वेगवेगळी मलमे बनविणाऱ्या कंपनीचे दोन हजार कोटी रुपये खर्चून अधिग्रहण केले. यासाठी बऱ्याच अंशी कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी केल्यामुळे नजीकच्या काळात कंपनीच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, मात्र दीर्घ कालावधीत वर्षांला अडीचशे कोटी रुपये उत्पन्नाची वाढ कंपनीला मिळेल. या आधीच्या अधिग्रहणांचा इतिहास पहाता टॉरंट फार्मा या संधीचा फायदा करून घेईल. सध्याच्या पातळीला या समभागांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

एपीएल अपोलो:

एपीएल अपोलो टय़ुब्स ही प्री-गॅल्वनाइज्ड स्टील टय़ूब्सची देशातील आघाडीची उत्पादक आहे. कंपनी हॉट डिप्ड गॅल्वनाइज्ड, प्री-गॅल्वनाइज्ड स्टील टय़ूब्स खेरीज होलो सेक्शन्स आणि स्ट्रक्चरल स्टीलची आघाडीची उत्पादक आणि निर्यातदार आहे. या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीमधील विक्रीचे आकडे उत्साहवर्धक आले आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत विक्रीमध्ये ४१ टक्क्यांची वाढ होऊन ती ६.०२ टन झाली. रायपूर येथे नवीन कारखाना सुरू झाल्यामुळे आगामी काळात विक्री अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेले उत्पादन आता भरून निघेल आणि पोलादाच्या किमतीमधील घसरण कंपनीला नफा वाढवण्यास मदत करेल. अवजड बांधकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या कंपनीच्या उत्पादनाच्या मागणीत वाढ होत आहे. बाजारातील घसरणीच्या दिवशी हे समभाग घेता येतील.

डीएलएफ:

कंपनी प्रामुख्याने स्थावर मालमत्तेच्या व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीकडे स्थावर मालमत्ता विकास आणि भाडय़ाने मिळणाऱ्या कमाईसह एक असाधारण व्यवसाय रचना आहे. डीएलएफने पायाभूत सुविधा, एसईझेड आणि हॉटेल व्यवसायातही प्रवेश केला आहे. ते स्थावर मालमत्ता विकासाच्या सर्व बाबींमध्ये काम करतात. जमिनीच्या संपादनापासून ते प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी, बांधकाम आणि विपणनापर्यंत सर्व कामे पार पाडली जातात. हा समूह वीजनिर्मिती आणि प्रसारण, देखभाल सेवांची तरतूद, आदरातिथ्य आणि मनोरंजनात्मक व्यवसायांमध्ये देखील गुंतलेला आहे. डीएलएफने व्यवसायांची विभागणी धोरणात्मकरीत्या केलेली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालाप्रमाणे २०२३ च्या आर्थिक वर्षांत निवासी घरांच्या व्यवसायात दुप्पट नोंदणी अपेक्षित आहे, तर व्यावसायिक जागांच्या व्यवसायामध्ये मोठी वाढ करून येत्या पाच वर्षांत तो दुप्पट करायचे लक्ष्य आहे. उत्तर भारताखेरीज कंपनी गोवा आणि चेन्नईमध्ये व्यवसायवृद्धी करीत आहे. जरी व्याजदर वाढत असले तरी सध्या घरांच्या मागणीमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे या समभागांचा दीर्घ मुदतीसाठी विचार करता येईल. 

सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत वाहन विक्रीमध्ये ११ टक्के वाढ झाली. पुढील महिन्यादेखील सणासुदीच्या हंगामामुळे विक्री समाधानकारक असेल. भारताच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा एचडीएफसी बँकेने जाहीर केलेल्या सप्टेंबरअखेरच्या पहिल्या सहा महिन्यांत कर्ज वाटपात २३.५ टक्के वाढ झाली असल्याचे सांगितले. बँकेच्या ठेवींमध्येदेखील १९ टक्क्यांची वाढ झाली. इतर खासगी बँकांमध्ये अशीच वाढ पाहायला मिळाली. डी-मार्ट या किराणा विक्री दालनांची साखळी असणाऱ्या कंपनीच्या मिळकतीमध्ये ३६ टक्के वाढ झाली आहे. ही सारी भारतातील अर्थव्यवस्थेशी आणि कंपन्यांशी संबंधित आकडेवारी सर्व काही आलबेल असल्याचे वाटत असले तरी जागतिक पातळीवरचा धोका अजून टळलेला नाही. ओपेक प्लसने इंधन उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे खनिज तेलाचे भाव पुन्हा वाढतील. डॉलरचे वाढते मूल्य भारताच्या आयातीवर आणखी ओझे वाढवेल. अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्र्हकडून आगामी काळात व्याजदर वाढविण्याचा सपाटा सुरूच राहणार आहे. युरोपमधील क्रेडिट सुईस बँकेमधील घडामोडी आणि हेज फंडांना वाचविण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडला करावा लागलेला हस्तक्षेप हे जागतिक अर्थकारणातील तणावच दर्शविते. जागतिक बँकेने २०२३ साली जगाला मंदीचा सामना करावा लागेल असे भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या तेजीच्या वाऱ्याकडे क्षणिक वावटळीप्रमाणेच पाहावे लागेल.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा

ईझी ट्रिप प्लॅनर्सकडून बोनस समभागांची घोषणा

टीसीएस, विप्रो, सायेंट, माइंडट्री, टाटा एलॅक्सी, एल अँड टी इन्फोटेक या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल.

बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय प्रु. लाइफ, श्री सिमेंट या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल.

sudhirjoshi23@gmail.com