सुधीर जोशी

अमेरिका आणि ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकांकडून किती व्याज दरवाढ होणार याचे औत्सुक्य आणि धास्तीमुळे सरलेल्या सप्ताहात देशांतर्गत भांडवली बाजारात अस्थिरता जाणवत होती. गेले काही महिने आणि सरलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला भारतीय बाजार जागतिक बाजारांशी फारकत घेऊन ताठ उभा होता. मात्र अमेरिका आणि ब्रिटनच्या व्याज दरवाढीनंतर देशांतर्गत भांडवली बाजारही ढासळला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा जोरदार समभाग विक्रीचा मारा केला. विक्रीवाल्यांचे मुख्य लक्ष बॅंकिंग क्षेत्र राहिले. जागतिक पातळीवर इंधनाचे भाव घसरल्यामुळे तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री मारा झाला आणि दुसरीकडे एफएमसीजी म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांचे भाव वधारले. बाजाराचे प्रमुख निर्देशांक एक टक्क्याहून अधिक घसरले.

सन फार्मा
ही भारतातील सर्वात मोठी औषधी निर्माता कंपनी असून तिची उत्पादने हृदयविकार, मधुमेह आणि चयापचयाशी निगडित विकार, डोळय़ांचे आजार, कर्करोग, वेदना, अॅलर्जी, दमा, स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित आजार अशा विविध शारीरिक समस्या आणि आजारांसाठी वापरली जातात. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल समाधानकारक होते. औषधविक्री आणि नफ्यात वार्षिक तुलनेत साधारणपणे १० टक्के वाढ झाली होती. मार्चअखेरच्या तिमाहीच्या तुलनेत विक्रीत १४ टक्के, तर नफ्यात २५ टक्के वाढ नोंदवली आहे. सर्वसाधारण औषधांपेक्षा डॉक्टरने शिफ़ारस केल्यावरच मिळणाऱ्या विशेष औषधांवर कंपनीने भर दिला आहे. त्याचा नफ्यावर चांगला परिणाम दिसत आहे. अमेरिकी औषध प्रशासनाच्या (एफडीए) जाचक नियमांचा आणि तपासणीचा धोका प्रत्येक कंपनीला असतो; पण या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी डिव्हिज लॅब व सन फार्मा या कमी जोखमीच्या कंपन्या आहेत. सन फार्माच्या समभागांची ९०० रुपयांच्या आसपासची पातळी गुंतवणुकीस योग्य आहे.

केईसी इंटरनॅशनल
आरपीजी समूहातील या प्रमुख कंपनीने आफ्रिका, अमेरिका, मध्य आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामधील ४८ हून अधिक देशांमध्ये पायाभूत विकासाला चालना दिली आहे. पॉवर ट्रान्समिशन या सर्वात मोठय़ा व्यवसायाखेरीज ही कंपनी पॉवर सिस्टम, केबल्स, रेल्वे, दूरसंचार आणि पाणी या क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवीत आहे. या इतर क्षेत्रांचा व्यवसायातील वाटा गेल्या सहा वर्षांत १३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर गेला आहे. कंपनीला नुकतीच १,१०० कोटी रुपयांची कंत्राटे मिळाली. त्यामध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, रेल्वे, इंधन व बांधकाम व्यवसायातील कंपन्यांचा समावेश आहे. आता कंपनीच्या हातात ७,००० कोटींची कंत्राटे आहेत. सरकारने गेल्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांवरील खर्चात भर दिला होता. त्यामुळे पुढील काही वर्षांत कंपनीला मोठय़ा संधी निर्माण होतील. कंपनीची उलाढाल गेल्या वर्षी १३ हजार कोटी होती, जी सरासरी १८ टक्क्यांनी वाढून पुढील तीन वर्षांत २० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. दीर्घ मुदतीच्या उद्देशाने कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

मिहद्र लॉजिस्टिक
ही कंपनी मिहद्र आणि मिहद्र या मोठय़ा समूहातील वाहन कंपनीला तसेच बाहेरील ग्राहकांना मालाची वाहतूक, साठवणूक आणि इतर सेवा (लॉजिस्टिक) पुरविते. कंपनीमध्ये ५८ टक्के भांडवली गुंतवणूक मिहद्र समूहाची आहे आणि दुसरी मोठी गुंतवणूक परदेशी आणि भारतीय गुंतवणूक संस्थांची आहे. सामान्य गुंतवणूकदारांकडे अतिशय अल्प म्हणजेच १ टक्क्याहून कमी वाटा आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीतील उत्पन्न ३७ टक्क्यांनी वाढून १,२०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर या कालावधीत नफा ४२ टक्क्यांनी वाढून १३ कोटी झाला आहे. नव्याने जाहीर झालेले राष्ट्रीय पुरवठा धोरण तसेच सरकारच्या गती शक्ती, सागरमाला, भारतमाला योजना या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविणार आहेत. वस्तू व सेवा करामुळे जसा संघटित आणि मोठय़ा उद्योगांना फायदा मिळाला तसा या धोरणाचा फायदा मोठय़ा कंपन्यांना होईल. या क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही एक चांगली कंपनी आहे.

ॲक्सेंचरचे निकाल आणि प्रवर्तकांचे व्यवसायाच्या भवितव्याबाबतचे भाष्य इतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील गुंतवणुकीसाठी नेहमीच दिशादर्शक मानले जाते. कंपनीने निकालानंतर केलेल्या अंदाजाप्रमाणे कंपन्यांकडून या क्षेत्राला मिळणाऱ्या मागण्यांवर मंदीचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र पुढील काही महिने कठीण जातील. आपल्याकडील बऱ्याच महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे भाव खाली आलेले असल्यामुळे त्यामध्ये खरेदी करायची वा नाही, हा कठीण प्रश्न आहे; पण सर्वसाधारणपणे मोठय़ा कंपन्यांपेक्षा या क्षेत्रातील पर्सिस्टंट, माइंड ट्री, कोफोर्ज, केपीआयटी यांसारख्या लहान कंपन्या परिस्थितीशी लगेच जुळवून घेतील आणि गुंतवणुकीस योग्य मानता येतील.

रिझव्र्ह बँक आणि केंद्रीय अर्थ खात्याचे अहवाल भारतातील आर्थिक विकासाची गाडी रुळावर मजबूत स्थितीत असल्याचे निदर्शनास आणतात. जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थांपैकी काही अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात आल्याने महागाईदेखील कमी होत आहे. इतकेच काय, जागतिक मागणी कमकुवत झाल्यामुळे पुरवठय़ावरील दबावही कमी होत आहेत. उदाहरणार्थ, भारतातील काही वाहननिर्माते अर्धसंवाहकांचा (सेमिकंडक्टर चिप) पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे उत्पादन वाढवण्याविषयी विचार करीत आहेत. सुधारित खरीप पीकपेरणींच्या आकडेवारीनुसार आणि सणासुदीच्या हंगामातून भारतात वस्तूंच्या मागणीला चालना मिळेल, असा विश्वास सरकार आणि मध्यवर्ती बँकेमधील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र जागतिक मंदीच्या फेऱ्यात भारताचा बाजार अलिप्त राहू शकणे कठीण आहे. डॉलरच्या तुलनेत ८१ रुपयांच्या पातळीवर पोहोचलेले चलन आणि महागाईचा दर ७ टक्क्यांवर पोहोचला असताना या सप्ताहात होणारी रिझव्र्ह बँकेची व्याजदर आढावा बैठक बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण करेल.
sudhirjoshi23@gmail.com