सुधीर जोशी
सरलेल्या सप्ताहाची सुरुवात घसरणीने झाली. अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या अधिकाऱ्याने सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षांच्या जॅक्सन होल परिषदेतील भाषणाबद्दल औत्सुक्य वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले असून आठवडाभर जोखीम टाळण्याकडेच बाजाराचा कल राहिला. गेल्या सहा सप्ताहांच्या तेजीनंतर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याची घसरण झाली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. याचबरोबर सरकारी बँकांच्या समभागांना देखील मागणी होती.

इन्फोबिन्स टेक्नॉलॉजी: इन्फोबिन्स टेक्नॉलॉजी ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील १० वर्षांची तरुण कंपनी आहे. कंपनी मोबाइल अ‍ॅप, जावा टेक्नॉलॉजी, बिग डेटा अशा तांत्रिक सेवा पुरविते. जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात ८० टक्के वाढ होऊन ते ५९ कोटींवर पोहोचले आ`हे आणि ९ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली. कंपनीमध्ये प्रवर्तकांचे भांडवल ७५ टक्के आहे. कंपनीला सेल्सफोर्स, मायक्रोसॉफ्ट, सव्‍‌र्हिसनाऊ अशा मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांचे पाठबळ आहे. बावीस वर्षांपूर्वी तीन जणांनी मिळून सुरू केलेल्या कंपनीची कर्मचारी संख्या आता १४०० वर पोहोचली आहे. कंपनीचे दोनशेहून अधिक ग्राहक आहेत. जलद प्रगती करणाऱ्या या कंपनीमध्ये ६३० ते ६४० रुपयांच्या पातळीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र लहान कंपनी असल्यामुळे आगामी तिमाही आर्थिक कामगिरीकडे लक्ष ठेवायला हवे.

बाटा इंडिया: पादत्राणांच्या व्यवसायात मोठे नाव असणारी बाटा इंडिया लिमिटेड विविध उपयोगाची आणि श्रेणीमधील पादत्राणे बनवते. कंपनी लेदर, रबर, कॅनव्हास आणि पीव्हीसी शूज यांसारख्या विविध प्रकारातील पादत्राणांची निर्मिती करते. सध्या कंपनीकडे हश पपीज, डॉ स्कॉल्स, नॉर्थ स्टार, पॉवर, मेरी क्लेअर, बबलगमर्स, अ‍ॅम्बेसेडर, कम्फिट आणि विंड यांसारख्या विविध नाममुद्रांची मालकी आहे. ही कंपनी औद्योगिक फुटवेअरच्या व्यवसायात देखील कार्यरत आहे. कंपनीची जून तिमाहीमधील विक्री गेल्या वर्षांतील २६७ कोटींवरून वाढून ९४३ कोटींवर पोहोचली आहे. नफा देखील ६९ कोटींवरून वाढून ११९ कोटी झाला. अर्थात गेल्या वर्षी हे आकडे करोनामुळे अपवादात्मक कमी होते. कंपनीने फ्रेंचाईझी दुकाने ३०० वरून ५०० पर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. तसेच कंपनी कॅज्युअल प्रकारामधील हिस्सा वाढविणार आहे. कंपनीला स्पर्धा वाढली आहे. पण कंपनीकडे रोकड सुलभता चांगली आहे आणि या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. सध्याची समभागाची १८७० रुपयांची बाजारभाव पातळी खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे.

जेके सिमेंट: ही उत्तर भारतामधील चौथ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी आहे. कंपनीला ४० टक्के उत्पन्न तेथूनच मिळते. कंपनी सध्याच्या १५ मेट्रिक टन उत्पादन क्षमता पुढील ३ वर्षांत २५ मेट्रिक टनांवर नेणार आहे. इतर सिमेंट कंपन्यांप्रमाणे जेके सिमेंटला जूनअखेरचे तीन महिने कठीण गेले. उत्पन्नामध्ये साडेचार टक्के घट झाली असली तरीही कंपनीने नफ्याच्या टक्केवारीत भर घातली आहे. कंपनीने गेली अनेक वर्षे चांगली कामगिरी केली आहे. पायाभूत सुविधा आणि गृह निर्मिती क्षेत्रात होणारी वाढ सिमेंट कंपन्यांसाठी अनुकूल आहे. उत्पादन क्षमतेने इतर सिमेंट कंपन्यापेक्षा लहान असूनही बाजारात कंपनीच्या समभागांना चांगले मूल्य मिळते. सध्याच्या २,६०० ते २,६६० रुपयांच्या पातळीत समभाग खरेदीला वाव आहे.
आयशर मोटर्स लिमिटेड: ही कंपनी वाणिज्य वाहने आणि दुचाकींसाठी प्रसिध्द आहे. बुलेट मोटरसायकलच्या रॉयल एनफील्डची उत्पादक कंपनी आहे. याशिवाय विविध प्रकारच्या गिअर्सचेही कंपनी उत्पादन करते. उच्च श्रेणीमधील मोटरसायकल्सची मागणी भारतासह जगभरात वाढते आहे. रॉयल एनफील्डचा त्यामध्ये ३६ टक्के हिस्सा आहे. या शिवाय मोटरसायकलमध्ये वैयक्तिक आवडी-निवडीनुसार बदल घडवण्यासाठी कंपनीची स्टुडियो स्टोअर्स आहेत. कंपनीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे कंपनीच्या समभागात थोडी घसरण झाली. याबाबतच्या तपशिलाची वाट पाहून कंपनीचे समभाग घेता येतील.

अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्ह पुढील महिन्यात व्याजदर अर्धा टक्क्याने वाढवेल की पाऊण टक्क्याने यावर भांडली बाजारात उलट-सुलट चर्चा सुरू होती. मात्र शुक्रवारच्या जॅक्सन होल परिषदेतील भाषणात बँकेचे अध्यक्ष काय भूमिका मांडतात यावर बाजाराची नजर होती. अध्यक्षांचा रोख व्याजदर वाढविण्याकडे असेल अशा अपेक्षेने मासिक सौदापूर्तीच्या दिवशी सटोडियांनी (स्पेक्युलेटर्स) व्यवहार पुढील महिन्यात वर्ग करण्याचे प्रमाण कमी केले. आज बाजार उघडताना या विषयीची स्पष्टता व अमेरिकन बाजारांची प्रतिक्रिया आपल्या बाजाराला दिशा देईल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सभेमधील मोठय़ा घोषणा आणि रिलायन्स जिओचे भांडवली बाजारातील संभाव्य पदार्पण याकडे देखील बाजाराचे लक्ष असेल.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:
एमएमटीसी, नागार्जुन फर्टिलाइझर्स, बॉंम्बे रेयॉन फॅशन्स या कंपन्या जूनअखेरच्या तिमाही कामगिरीचे निकाल जाहीर करतील.
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा.
रुचिरा पेपर्स बक्षीस समभागांची घोषणा करेल.
जुलै महिन्याचे वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) आणि वाहन विक्रीचे आकडे जाहीर होतील.
sudhirjoshi23@gmail.com