आशीष ठाकूर

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात दिसून आलेल्या निफ्टीच्या रटाळ वाटचालीला सर्व गुंतवणूकदार कंटाळलेले होते. त्यामुळे गेल्या लेखात निफ्टीला आर्जव केलेले की, ‘तुझी भूमिती श्रेणीतील झलक दिखा दे.’ ते निफ्टीने मनावर घेत आपल्या ३०० अंशांच्या परिघात १७,८०० वरून सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी १८,१०० च्या समीप – १८,०८८ चा दिवसांतर्गत उच्चांक नोदवला. त्याच रात्री अमेरिकेत महागाईची धग उसळल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाल्याने त्याचे पडसाद अमेरिकन भांडवली बाजारात उमटत, ‘डाऊ जोन्स’वर १,३०० अंशांची घसरण झाली. त्याचे पडसाद आपल्याकडे बुधवारच्या सकाळच्या सत्रात उमटले. सुरुवातच मुळी ३१७ अंशांच्या घसरणीने झाली. येथे आपल्याला निफ्टीच्या भूमिती श्रेणीतील पदन्यासाचे दर्शन झाले होते. त्या दिवशीच्या घसरणीवर मात करत, जीवघेण्या घुसळणीत १७,७७१ च्या नीचांकापासून सावरत पुन्हा १८,०९१ चा उच्चांक आणि १८,००३ चा त्या दिवशीचा बंद भाव तिने दिला. प्रश्न हा की, आपल्याला अपेक्षित भूमिती श्रेणी की मतिगुंग होण्याची स्थिती? निफ्टीने नेमकी कशाची झलक दाखवून दिली? या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

संख्याशास्त्रात (स्टॅटिस्टिक्स) भूमितीय श्रेणी (जीपी – जीओमेट्रिकल प्रोग्रेशन) संकल्पना शिकवली जाते. अतिशय संक्षिप्त स्वरूपात सांगायचे तर अतिशय वेगवान, जलद अशी तेजीची अथवा मंदीची वाटचाल हे एकच सामाईक, व्यवच्छेदक लक्षण विशद करण्यासाठी इंग्रजी सुभाषितांचा आधार घेतल्यास- ‘इफ यू आर इन हरी यू हॅव टू वरी’ अथवा ‘अॅन ओल्ड मॅन इन हरी’ मराठीत ‘अतिघाई संकटात नेई’ अशी ही वाटचाल आहे. कुठल्याही स्तरावर पायाभरणी न करता ती फक्त अतिजलद लक्ष्य साध्य करण्याकरिता आलेली असते. जसे की अवघ्या दोन महिन्यात २,८०० अंशांची अतिजलद वाटचाल. १७ जून २०२२ ला १५,१८३ वरून निफ्टी निर्देशांकाने १९ ऑगस्टला १७,९९२ ही पातळी गाठली. ‘अतिजलद घाई निफ्टी निर्देशांकाला घातक उतारांच्या संकटात नेई.’ जसे की १९ ऑगस्टला निफ्टी निर्देशांक १७,९९२ वरून, २९ ऑगस्टला १७,१६६ आणि ताजा मासला म्हणजे, १३ सप्टेंबरला १८,०८८ वरून १६ सप्टेंबरला १७,४९७. अशी ही आताच्या घडीची भूमितीय श्रेणीतील वाटचाल समजून घेतल्यावर, आता आपण चालू आठवडय़ाच्या निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीकडे वळूया.

आता चालू असलेल्या घसरणीत निफ्टी निर्देशांकाला प्रथम १७,४५० ते १७,३५० आणि द्वितीय आधार १७,२००चा असेल. उपरोक्त स्तरांचा आधार घेत निफ्टी निर्देशांकावर १७,७३५ ते १७,९०० पर्यंत सुधारणा होईल. या सुधारणेत १८,००० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे किमान खालचे लक्ष्य १७,२०० ते १६,८०० असे असेल. ही घसरण ऑक्टोबपर्यंत पूर्ण होत असून ‘डाऊ कालमापन संकल्पने’प्रमाणे मंदीचे एक वर्ष पूर्ण होत आहे.गेल्या वर्षी १९ ऑक्टोबरला निफ्टी निर्देशांकाने १८,६०४ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवत उतरत्या भाजणीतील उच्चांक – नीचांक (लोअर टॉप, लोअर बॉटम) वाटचाल करत, आता मंदी शेवटच्या चरणात आली आहे. ही मंदी लवकरच संपून बाजारात तेजी अवतरेल, अशी अपेक्षा करूया.


चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ संकल्पनेची
गेल्या सहा महिन्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीच्या दडपणाखाली क्षतिग्रस्त झालेले क्षेत्र म्हणजे ‘संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र’ होय. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषणाची जोखीम या स्तंभातील लेखाने पत्करली होती. या स्तंभातील ११ जुलैच्या लेखात मांईड ट्री लिमिटेड समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले होते. त्या समयी समभागाचा बंद भाव २,८८९ रुपये होता. तर निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर २,७०० रुपये होता. प्रत्यक्ष निकालानंतर समभागाने २,७०० चा स्तर राखल्यास निकाल चांगला असून, दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांनी समभाग राखून ठेवावा. चांगल्या निकालानंतर जी तेजी येते त्यात ३,३०० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले. २९ जुलैला समभागाने ३,४७८ चा उच्चांक मारत लेखात नमूद केलेले ३,३०० रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य केले. अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना १४ टक्क्यांचा परतावा मिळविता आला.

खरा प्रश्न हा दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांचा. कारण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संगणक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रावर मंदीचे सावट, त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक संशोधन संस्थांनी या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या भविष्यकालीन मानांकनाचे, वृद्धीदराचे निराशाजनक अहवाल दिले होते. तेव्हा प्रत्यक्ष निकालानंतर समभागाच्या भावांत क्षणिक आतषबाजी ठीक आहे हो, पण आताच्या दातखिळी बसवणाऱ्या मंदीत समभागाने २,७०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखला का? हाच काय तो प्रश्न. या मंदीत आतापर्यंत तरी समभागाने २,७०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखला आहे आणि शुक्रवार, १६ सप्टेंबरचा त्याचा बंद भाव ३,१११ रुपये आहे.

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५८,८४०.७९
निफ्टी : १७,५३०.८५

लेखक भांडवली बाजार विश्लेषक, ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.