scorecardresearch

Premium

रपेट बाजाराची : जागतिक मंदीचे मळभ

अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीने तेथील भांडवली बाजारात भूकंप झाला.

रपेट बाजाराची : जागतिक मंदीचे मळभ

सुधीर जोशी

जागतिक बाजारांतील सकारात्मकतेला अनुसरून सरलेल्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने ६० हजार अंशांचा टप्पा पार करून आधीच्या सप्ताहातील (गुंतवणूकदारांचे) चैतन्य कायम ठेवले. अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीने तेथील भांडवली बाजारात भूकंप झाला. पण त्याचे पडसाद भारतीय बाजारात उशिराने जाणवले. सप्ताहाच्या पहिल्या दोन दिवसांतील भारतीय उद्योगांच्या कामगिरीवर विश्वास दाखवत बाजाराने केलेली कमाई उरलेल्या तीन सत्रांत नाहीशी झाली. माहिती तंत्रज्ञान या अमेरिका, युरोपावर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असलेल्या क्षेत्राचा निर्देशांक सात टक्क्यांनी घसरला. बँकिंग क्षेत्राने मात्र बाजाराला हात दिला.

Indian Family Found Dead in US House
धक्कादायक! कॅलिफोर्नियातल्या घरात भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळलं, बंदुकीच्या गोळ्या झाडल्याच्या खुणा
young man arrested from Madhya Pradesh in cyber fraud case of chief manager of private bank
खासगी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी तरूणाला मध्यप्रदेशातून अटक
turmeric in Sangli market
सांगली बाजारात हळदीला ३१ हजाराचा उच्चांकी दर
Theft in Kalamboli iron market panvel
कळंबोलीच्या लोखंड बाजारात चोरीचे सत्र सूरुच; ७ लाख ३३ हजारांचा स्टेनलेस स्टील गोदाम फोडून लुटले

एल. जी. बालकृष्णन ब्रदर्स:
वाहन उद्योगांना ‘रोलर आणि ऑटोमोटिव्ह चेन’ पुरविण्यात मक्तेदारी असणारी ही एक स्थिर स्थावर कंपनी आहे. या उत्पादनातील एकूण व्यापाराचा ५० टक्के वाटा ते रॉयल एनफिल्ड आणि बजाज ऑटो कंपन्यांना लागणारा जवळजवळ १०० टक्के पुरवठा ही कंपनी करते. मूळ उत्पादनाखेरीज वाहन दुरुस्तीच्या दुय्यम व्यवसायांकडूनही कंपनीच्या उत्पादनांना मागणी असते. कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांची १० टक्के गुंतवणूक आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने उत्पन्नात सरासरी ११ टक्क्यांनी तर नफ्यात १५ टक्क्यांनी वाढ नोंदवली. पुढील सणासुदीच्या हंगामातील दुचाकी वाहनांच्या विक्रीतील अपेक्षित वाढीचा अप्रत्यक्ष फायदा घेण्यासाठी या कंपनीमध्ये गुंतवणूक करता येईल.

सुंदरम फास्टनर्स:
सुंदरम फास्टनर्स : मुख्यत्वे वाहन उद्योगाला सुटे भाग पुरविणारी ही कंपनी उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी प्रसिध्द आहे. जगातील चार देशांत व्यवसायवृद्धी करत असलेल्या या कंपनीला चांगले प्रवर्तक लाभले आहेत. विद्युत वाहनांबरोबर पवन उर्जा क्षेत्रातील सुटय़ा भागांच्या मागणीसाठी कंपनी प्रत्येकी ३०० ते ३५० कोटींची गुंतवणूक करत आहे. अर्धसंवाहक किंवा सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठय़ामध्ये सुधारणा होत असल्यामुळे वाहन क्षेत्रामध्ये कंपनीच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. पोलाद आणि इतर धातूंच्या किमती गेल्या तिमाहीपेक्षा कमी होत असल्याचा कंपनीला फायदा मिळेल. गेल्या काही दिवसांत कंपनीचे समभाग सातत्याने वाढत आहेत. थोडय़ा घसरणीची वाट पाहून कंपनीमध्ये गुंतवणूक करता येईल.

मारुती सुझुकी:
देशातील या सर्वात मोठय़ा वाहन उद्योगाची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. कंपनीच्या नवीन श्रेणीतील वाहनांना भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. कंपनीच्या एसयूव्ही प्रकारातील वाहनांची मागणी एक लाखावर पोहोचली आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी आठ नवी वाहने सादर करणार आहे. जून अखेरच्या तिमाहीमधील नफ्यावरचे दडपण आता कमी होईल. कारण धातू आणि इतर कच्च्या मालाच्या उतरलेल्या किमती आणि जपानच्या येनमध्ये झालेली घसरण. सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठय़ातील अडथळे आता दूर होत आहेत आणि शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील मागणी येत्या सणासुदीच्या हंगामात वाढणार आहे. त्यामुळे वर्षभरात कंपनीचा समभाग दहा हजार रुपयांचा टप्पा गाठेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

विशाखा इंडस्ट्रीज:
ॲसबेटॉस सिमेंटचे पत्रे आणि इतर बांधकाम साहित्य निर्माण करणारी ही चाळीस वर्षांहून अधिक जुनी कंपनी आहे. या व्यापारात कंपनीचा २० टक्के हिस्सा आहे. पहिल्या तिमाहीत कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडत असतानादेखील कंपनीने चांगले निकाल जाहीर केले. कंपनीच्या उत्पन्नात ३७ टक्के वाढ होऊन ते ४७९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर नफ्याची पातळी कायम राहिली. दुसऱ्या तिमाहीत कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे कंपनीला फायदा होईल. कंपनीने नुकताच चौथा कारखाना तमिळनाडूमध्ये कार्यान्वित करून पश्चिम बंगालमध्ये पाचवा कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनी सौरऊर्जा पॅनेल आणि चार्जिग क्षेत्रात पाय रोवत आहे. समभागांची सध्याची ६०० रुपयांची पातळी गुंतवणुकीस योग्य वाटते.

ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईचा दर थोडा वाढून ७ टक्क्यांवर पोहोचला. रिझव्र्ह बँकेच्या सहनशील पातळीपेक्षा तो एक टक्क्याने जास्त असला तरी बाजाराने हा दर गृहीत धरला असल्यामुळे बाजारावर त्याचा खूप परिणाम झाला नाही. नुकतीच जाहीर झालेली पहिल्या सहा महिन्यांची प्रत्यक्ष कराच्या अग्रिम संकलनाची आकडेवारी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत दिलासा देणारी आहे. १५ सप्टेंबपर्यंत त्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली. जगातील सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या भारतीय बाजारातील ऊर्जा अजून कायम आहे. सध्या बाजाराचे नेतृत्व भांडवली यंत्रसामग्री उत्पादन करणाऱ्या कंपन्या, बँका, हॉटेल्स, संरक्षण क्षेत्र आणि वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे समभाग करीत आहेत. मात्र या सप्ताहाच्या शेवटच्या काही दिवसांत बाजारावर अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि व्याजदर वाढीचे मळभ आले. परदेशी गुंतवणूकदारांनी थोडी नफावसुली केली. या सप्ताहात जाहीर होणारी अमेरिकी मध्यवर्ती बँकेची व्याजदर वाढ व जागतिक औद्योगिक मंदीवरचे भाष्य यावर बाजाराची पुढील दिशा ठरेल. येत्या २२ सप्टेंबरला ॲक्सेंचरचे शेवटच्या तिमाहीचे निकाल माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या भविष्याबाबत संकेत देतील. सध्याच्या अस्थिर काळात गुंतवणूकदारानी कंपन्यांची निवड करताना चोखंदळ राहिले पाहिजे.
sudhirjoshi23@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market sensex investors inflation in america index amy

First published on: 19-09-2022 at 00:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×