आशीष ठाकूर
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यावर घाबरलेली, बावरलेली निफ्टी १६,७०० वरून १६,४०० वर घसरताना आपण पाहिली. निफ्टी, तू तेव्हा तशी, बरोबर १६,४००च्या केंद्रबिंदू स्तराचा आधार घेत, पुन्हा सुधारणा होत १६,७००च्या वर तू तेव्हा अशी आलीस. या घसरण्याच्या- सावरण्याच्या प्रक्रियेतच सरलेल्या सप्ताहाची अखेर झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ५६,१२४.७२

निफ्टी : १६,७०५.२०

गेल्या लेखात निफ्टीचे भविष्यकालीन आलेखन करतानाच वाक्य होते : निफ्टी निर्देशांकावर १६,४००चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर मानून १६,४०० अधिक २०० अंश = १६,६००, अधिक २०० अंश = १६,८०० हे निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य असेल.

आता काळाच्या कसोटीवर वरील वाक्य तपासता, सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धात सोमवारीच निफ्टी निर्देशांकाने १६,३९५चा आधार घेत, मंदीचे आवर्तन संपविले आणि पुढे निफ्टी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद ऐतिहासिक उच्चांकासमीप झाला. निफ्टी निर्देशांकाच्या घसरण्याच्या- सावरण्याच्या प्रक्रियेत २०० अंशांचा परीघ १६,४००- १६,६००- १६,८००- १७,००० अगदी अचूकपणे काळाच्या कसोटीवर उतरत आहे.

येणाऱ्या दिवसातील एखाद्या हलक्याशा घसरणीत निर्देशांक- सेन्सेक्सवर ५५,८०० आणि निफ्टी निर्देशांक १६,६००चा स्तर राखण्यात अपयशी ठरले तर ही घसरण सेन्सेक्सवर ५४,७०० ते ५३,९०० आणि निफ्टी निर्देशांकावर १६,३५० ते १६,१५० पर्यंत असेल.

दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी आपण निफ्टी निर्देशांकावर १७,००० ते १७,५००चे लक्ष्य निर्धारित केले आहे. पण अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी निर्देशांकाची नवनवीन शिखर जरी सुखावत असली तरी एखाद्या क्षुल्लक कारणावरून- एखादे परिपत्रकदेखील समभागांच्या किमतीत २० ते २५ टक्के घसरण देऊन जाते. मग अल्प मुदतीत जे कमवायचे होते तेच गमावले जाते आणि अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातो. हे टाळण्यासाठी आपण अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना समभाग संच (पोर्टफोलिओ) बांधणीसाठी उपयुक्त आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वाचा आधार घेऊ या.

१) गुंतवणूकदारांनी आपल्या आवडत्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रथितयश अशा किमान पाच व कमाल दहा कंपन्यांच्या समभागांवर लक्ष्य केंद्रित करावे.

२) गुंतवणूकदारांनी लक्ष्य केंद्रित केलेला समभागाच्या सरलेल्या सप्ताहातील उच्चांकाची नोंद करून ठेवावी. जेव्हा समभागाची किंमत या उच्चांकाला पार करत असताना (वीकली ब्रेकआऊट) त्याच वेळेला समभागाच्या किमतीला उलाढालीचा (व्हॉल्यूम) आधार मिळत असल्यास वरची चाल (अप ब्रेकआऊट) मिळण्याची खात्री बाळगून समभाग खरेदी करावेत, १५ ते २० टक्क्यांच्या परताव्याचे लक्ष्य निर्धारित करावे. हे लक्ष्य निर्धारित करताना जोखीम-परतावा (रिस्क : रिवॉर्ड) रेशोचा विचार करावा. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार हा रेशो १:३ असतो.. १ एकांक जोखीम घेत असताना ३ एकांकाचा नफा मिळण्याची खात्री असल्यास समभाग खरेदी करावा. सर्वात महत्त्वाचे लक्ष्य साध्य होण्याच्या मार्गातील मोहाच्या, हव्यासाच्या थांब्यावर न थांबता जलदगतीने विक्री करावी. एखाद वेळेस आपली फसगत झाल्यास मुद्दल सुरक्षित ठेवण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ संकल्पना अमलात आणावी.

गुंतवणूकदारांच्या तोंडचा घास जो इतके दिवस हिरावून घेतला जात होता तो वरील विवेचनावरून गुंतवणूकदारांना पूर्ण नफा मिळवून देईल, अशी अपेक्षा करू या.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू  स्तर’ या संकल्पनेची आताच्या घडीला बाजारात नितांतसुंदर तेजी चालू आहे, निर्देशांक उच्चांकावर आहे, त्यात आपली कंपनी ही त्या क्षेत्रातील प्रथितयश कंपनी त्यामुळे तिमाही वित्तीय निकाल खराब आल्यास भाव थोडाच खाली येणार? अशी समज बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना, सिप्ला, मारुती या समभागांनी त्यांच्या धारणेला धक्का दिला आहे. किंबहुना कंपनी कितीही वलयांकित, तारांकित असली तरी जाहीर झालेला तिमाही वित्तीय निकाल सर्वसाधारण, बाजाराचा अपेक्षाभंग करणारा असल्यास हे घडते. अर्थात ‘या चुकीला माफी नाही’ आणि याच न्यायाने त्या कंपनीचा बाजारभाव लेखात नमूद केलेले खालचे लक्ष्य साध्य करतो.

याच अंगाने ‘कोल इंडिया’ समभागाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. या स्तंभातील ९ ऑगस्टच्या लेखात कोल इंडिया लिमिटेड या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केले होते. त्या समयी समभागाचा बाजारभाव १४६ रुपये होता. निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा १४८ रुपये होता. निकालापश्चात कोल इंडिया महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखण्यास अपयशी ठरला. लेखात नमूद केलेले १३७ रुपयांचे खालचा स्तर २३ ऑगस्टला नोंदविला गेला. (क्रमश:)

  • लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.