scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : सखे, पुरे हा बहाणा!

मागील पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी असा राहिला की, निफ्टी निर्देशांकाने १७,२०० ते १७,८०० आणि त्यातही १७,५०० ते १७,८०० परिघात जास्तीत जास्त काळ व्यतीत केला.

बाजाराचा तंत्र-कल : सखे, पुरे हा बहाणा!

आशीष ठाकूर
चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ संकल्पनेची

मागील पंधरा दिवसांहून अधिकचा कालावधी असा राहिला की, निफ्टी निर्देशांकाने १७,२०० ते १७,८०० आणि त्यातही १७,५०० ते १७,८०० परिघात जास्तीत जास्त काळ व्यतीत केला. निफ्टीला १७,५०० चा आधार तर १७,८०० चा अडथळा असे सारखे सुरू होते. अशा साचेबद्ध आणि रटाळ वाटचालीचा आताशी सर्वानाच कंटाळा आला आहे. म्हणूनच समस्त गुंतवणूकदार आता निफ्टीला आर्जव करत आहेत – ‘हा रुसवा सोड सखे! पुरे हा बहाणा, सोड ना अबोला!!’ या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध भांडवली बाजारात जीवघेणी उलथापालथ होत असताना, निफ्टी निर्देशांक मात्र ‘स्थितप्रज्ञ’ होता. ‘भले निफ्टी निर्देशांक झपाटयाने वाढत नसला तरी, इतरांसारखा कोसळतही नव्हता’ ही जमेची बाजू आणि त्यातही दुग्धशर्करा योग म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक असलेले ‘ब’ वर्गातील (मिड, स्मॉलकॅप) मध्ये तेजी अवतरल्याने गुंतवणूकदार देखील सुखावलेला होता. त्यामुळेच त्याला रुचत नसलेली, झेपत नसलेली तरीपण ‘अदर साइड इज ऑल्वेज ग्रीन’ या न्यायाने निफ्टी निर्देशांकाच्या ‘भूमिती श्रेणीतील’ वाटचालीकडे गुंतवणूकदार आता आस लावून बसला आहे. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी तशी आशा देखील निर्माण झालेली होती. सकाळच्या सत्रात निफ्टी निर्देशांक १७,९०० च्या पल्याड झेपावला देखील होता. वाटत होतं आज आस लागलेल्या १८,००० ते १८,१०० पातळीचे दर्शन होईल. पण कसलं काय! सर्वाच्या उत्साहावर पाणी फेरत पुन्हा शुक्रवारचा साप्ताहिक बंद १७,८०० च्या समीप. या आनंदावर विरजण घातल्यानंतरच्या भावनांसाठी वंदनाताई विटणकरांचे शब्द, श्रीकांत ठाकरे यांची श्रवणीय चाल आणि मोहम्मद रफी यांच्या स्वर्गीय आवाजाचा आधार घेत, निफ्टीला केलेले आर्जव आता कधी प्रत्यक्षात येईल त्याचा आढावा घेऊ या.
निफ्टी निर्देशांकाने १७,५०० ते १७,८०० च्या स्तरादरम्यान पायाभरणी (बेस फॉरमेशन) केल्यामुळे, आता निफ्टी निर्देशांकाचा वरचा टप्पा १८,००० ते १८,१०० आणि त्या नंतरचा १८,४०० पर्यंतचा प्रवास सुकर झाला आहे. या सर्व वरच्या वाटचालीला १७,५०० चा आधार असेल.

या स्तंभातील ४ जुलैच्या लेखात ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ (बीईएल) या कंपनीचे निकालपूर्व विश्लेषण केलेले होते. शुक्रवार, १ जुलैचा बंद भाव २२९.८० रुपये होता. तर निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर २३० रुपये होता. प्रत्यक्ष जाहीर झालेला निकाल उत्कृष्ट असल्यास २७५ रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले. प्रत्यक्ष निकालाची तारीख १६ जुलै होती. गुंतवणूकदारांना चिंतन, मनन, तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मानसिक तयारी करण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा अवधी होता व ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’१३ जुलैपर्यंत २३५ रुपयांवरच घुटमळत होता. ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ या संकल्पनेची मांडणी ही मूलभूत विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण शास्त्रातील सोनेरी संकल्पना एकत्र करून विकसित केली आहे. यात प्रत्यक्ष तिमाही निकाल जाहीर झाल्यावर, समभागाच्या बाजारभावाने महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखला तर प्रत्यक्ष जाहीर झालेला निकाल चांगला असून अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी वरचे लक्ष्य साध्य होईपर्यंत समभाग राखून ठेवावा. तर दीर्घमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी निश्चित होऊन हा समभाग दीर्घ मुदतीसाठी राखून ठेवावा. भविष्यात हीच गुंतवणूक निवृत्ती नियोजनाकरता, मुलांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची तरतूद, अथवा गृहकर्ज फेडीकरता आणि तत्सम स्वप्नपूर्ती करता वापरात येऊ शकते. १६ जुलैला जाहीर झालेला प्रत्यक्ष निकाल नितांतसुंदर होता. मूलभूत विश्लेषणाच्या अंगाने ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ने १,५६४.३४ कोटींवरून ३,०६३.५८ कोटींची उलाढाल करत ९५ टक्क्यांचा वृद्धीदर नोंदवला. करपूर्व नफा १५.१७ कोटींवरून ५७८.१० कोटींवर, तर निव्वळ नफा ११.१५ कोटींवरून ४३१.४९ कोटींवर झेपावला, तर ५५ हजार कोटींच्या आँर्डर आजच्या मितीला कंपनीच्या हातात आहेत. या सर्व संख्या एकत्रितपणे खुणावत होत्या की, समभागाचा बाजारभाव २३० रुपयांचा निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत वरचे लक्ष्य अल्पावधीत साध्य करणार. झालेही तसेच.१ ऑगस्टला समभागाच्या बाजारभावाने २८७ रुपयांचा उच्चांक नोंदवत २७५ रुपयांचे लेखात नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य केले. व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना १९ टक्क्यांचा परतावा मिळवून दिला. भविष्यात एखाद्या मंदीत हा समभाग स्वस्तात, २३० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत असल्यास हा समभाग भविष्यातील आपल्या स्वप्नपूर्तीकरता या समभागाचा जरूर विचार करावा. समभागाचा शुक्रवार ९ सप्टेंबरचा बंद भाव ३२८ रुपये आहे.

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५९,७९३.१४
निफ्टी : १७,८३३.३५
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market trends nifty index concepts investors nifty capital market amy

ताज्या बातम्या