सुधीर जोशी
जॅक्सन होलमधील अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांच्या भाषणाचा परिणाम भारतीय बाजारावर सरल्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या मोठय़ा घसरणीतून दिसून आला. भारतीय अर्थव्यवस्थेची पहिल्या तिमाहीतील वाढ दोन अंकी होण्याच्या अपेक्षेने दुसऱ्याच दिवशी बाजारात उत्साह संचारला आणि बाजाराने जबर उसळी घेऊन आधीच्या सप्ताहातील घसरण भरून काढली. त्यामुळे बाजाराची जागतिक कारणांवर नाराजी आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास दिसून आला. नंतरच्या दोन दिवसांत चीनमध्ये करोनाने परत डोके वर काढण्याच्या बातमीमुळे व युरोपमधील आर्थिक मंदीच्या भीतीने बाजाराने सावध पवित्रा घेतला होता. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला याचा मोठा फटका बसला व तो निर्देशांक ३ टक्क्यांनी खाली आला. वाहन कंपन्या, बँका व व्यापक बाजारातील लहान व मध्यम कंपन्यांमधील तेजीमुळे बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात फारशी वध घट झाली नाही.

डिव्हीज लॅब : औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या ‘एपीआय’ची भारतामधील सर्वात मोठी उत्पादक डिव्हीज लॅबने गेल्या आर्थिक वर्षांत अनेक संकटाना तोंड दिले, तरीदेखील कंपनीचे वार्षिक निकाल उत्तम होते. निकालांनंतरच्या मोठय़ा घसरणीनंतर कंपनीचे समभाग एक ते दोन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी पुन्हा आकर्षक बनले आहेत. कंपनीच्या प्रवर्तकांनी वार्षिक अहवालामध्ये आगामी काळाबद्दल आशादायक भाष्य केले आहे. कंपनीच्या उत्पादन क्षमतेमधील नियोजित विस्तार बाजारातील वाढीव मागणीची पूर्तता करण्यास सज्ज होत आहे. कर्जाचे प्रमाण शून्य असल्याचा फायदा सध्याच्या काळात कंपनीला मिळेल. दोन वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीचे समभाग टप्प्याटप्प्याने जमविल्यास मोठा फायदा होऊ शकेल.

इंद्रप्रस्थ गॅस : सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे इंधन गॅस वितरकांना भारतात उत्पादन केलेल्या गॅसचा वाढीव पुरवठा मिळणार आहे. परिणामी आयात कराव्या लागणाऱ्या महागडय़ा गॅसवरील खर्च कमी होण्यास मदत होईल. सरकारला २०३० सालापर्यंत वायुरूप इंधनाचा वापर सध्याच्या ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर न्यायचा आहे. इंद्रप्रस्थ गॅस ही कंपनी उत्तर भारतात वितरण सेवा क्षेत्र सातत्याने वाढवत आहे. गॅसच्या किमती कमी झाल्यावर पेट्रोलसाठीचा हा पर्याय जास्त किफायतशीर होऊन मागणी वाढेल. कंपनीने पहिल्या तिमाहीतील गॅस विक्री करोनाच्या आधीच्या काळापेक्षा जास्त होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमतीत मोठे चढ-उतार होत असल्यामुळे सरकारकडून या क्षेत्रासाठी अधिक प्रोत्साहनपर योजनांतून पाठबळाची शक्यता आहे. कंपनीच्या समभागात वर्षभरात १५ ते २० टक्के वाढ होऊ शकेल.

ॲफल इंडिया : सध्या जगातील ग्राहकांचा कल मोबाइलला प्राधान्य देणारा आहे. मोबाइलच्या वापरात ३२ टक्के वाढ अपेक्षित आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञानदेखील वेगाने विकसित होत आहे. ॲफल इंडिया मोबाइलवर जाहिराती प्रकाशित करणे व त्याद्वारे गोळा केलेल्या माहितीवर आधारित ग्राहकांच्या आवडीनिवडींचे विश्लेषण करून कंपन्यांना प्रभावी विपणन करायला मदत करते. आतापर्यंत २.५ अब्ज मोबाइल उपकरणांची माहिती ॲफलकडून संग्रहित व विश्लेषित केली जाते. त्यामध्ये सतत भर पडत आहे. कंपनीचे उत्पन्न गेल्या पाच वर्षांत सरासरी ६० टक्क्यांनी वाढले आहे. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षांत कंपनीचे उत्पन्न आधीच्या वर्षांच्या तुलनेत १०९ टक्क्यांनी वाढले होते. या उच्च तांत्रिक क्षेत्रातील सहभागासाठी १३०० रुपयांच्या जवळपास असणारे ॲफल इंडियाचे समभाग गुंतवणुकीसाठी आकर्षक आहेत.

वाढत्या व्याजदरांमुळे गृह खरेदीवर परिणाम होईल हा सर्वसाधारण समज सध्या फोल ठरला आहे. मुंबईमधील नवीन घर खरेदीच्या नोंदणीची आकडेवारी पाहिली तर याचा प्रत्यय येईल. ऑगस्ट महिन्यांत आठ हजाराहून जास्त घर खरेदीची नोंदणी झाली. गेल्या मार्च महिन्यापर्यंत यामध्ये मिळणारी मुद्रांक शुल्क सवलत बंद झाली तरी हे आकडे कमी झाले नाहीत. ग्रामीण व दुय्यम शहरांमध्येदेखील असेच चित्र आहे. वाढत्या मागणीमुळे एचडीएफसी रोख्यांद्वारे नवीन भांडवल उभारत आहे. या पार्श्वभूमीवर गोदरेज प्रॉपर्टीज, ॲस्ट्रल, कजारिया, पॉलिकॅब, एचडीएफसी लिमिटेड, पीएनबी हाऊसिंग असे समभाग आपल्या रडारवर असायला पाहिजेत.

ऑगस्ट महिन्याचे वस्तू व सेवा कर संकलनही १.४३ लाख कोटी रुपये असे घसघशीत झाले. वाहन विक्रीतही मारुती, टाटा मोटर्स व मिहद्र या मोठय़ा कंपन्यांनी अनुक्रमे ३०, ६८ व ८७ टक्क्यांची वाढ जाहीर केली. निर्मिती क्षेत्राचा (पीएमआय) निर्देशांक ५६च्या समाधानकारक पातळीवर राहिला. भारताचा विकास दर पहिल्या तिमाहीत साडेतेरा टक्के होता. ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) कंपन्यांच्या विक्रीत मागील महिन्याच्या तुलनेत ६ टक्के वाढ झाली. हे सर्व येणाऱ्या काळाचे बाजारासाठी असलेले शुभसंकेतच मानायला हवेत. भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित असलेल्या व्यवसायांना हे वर्ष चांगले असेल यात शंका नाही.
sudhirjoshi23@gmail.com