म्युच्युअल फंड कॉर्नर : फार्मा-हेल्थकेअर फंड गुंतवणुकीस खुला

गुंतवणुकीस कायम खुला असलेला हा फंड ‘निफ्टी हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स’ या मानदंड निर्देशांकावर बेतलेला आहे.

मुंबई : आयटीआय म्युच्युअल फंडाचा फार्मा अँड हेल्थकेअर फंड गुंतवणुकीस खुला झाला असून या फंडाच्या युनिट्सची प्राथमिक विक्री १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील. गुंतवणुकीस कायम खुला असलेला हा फंड ‘निफ्टी हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स’ या मानदंड निर्देशांकावर बेतलेला आहे.

औषधनिर्मिती,आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांतून गुंतवणूक करणारा हा क्षेत्रीय (सेक्टोरल) फंड आहे. आरोग्यनिगा क्षेत्राला करोना विषाणूबाधेमुळे आणीबाणीसदृश परिस्थितीस तोंड द्यावे लागले. देशातील या क्षेत्राचा व्याप पाहता गुंतवणुकीसाठी या क्षेत्रात सेवा आणि उत्पादनांशी संलग्न गुंतवणुकीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. हा फंड संशोधनावर आधारित कंपन्यांची निवड करेल. फंड घराणे ‘एसक्यूएल’ म्हणजे सेफ्टी अर्थात पुरेसे मार्जिन (एस), गुणवत्तापूर्ण व्यवसाय (क्वालिटी- क्यू) आणि किमान कर्जभार (लो लिव्हरेज अर्थात एल) या गुंतवणूक पद्धतीचे अनुसरण केले जाते व त्याआधारे गुंतवणूकदारांना भांडवली लाभ मिळवून दिला जातो. या फंडाचे निधी व्यवस्थापक रोहन कोरडे यांना समभाग संशोधनाचा आणि समभाग गुंतवणूक प्रमुख प्रदीप गोखले यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

आयसीआयसीआय प्रु. इंडिया अपॉच्र्युनिटीज फंडाकडून ९९.६८ टक्के परतावा

मुंबई : बाजार स्थितीशी सुसंगत गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा मिळतो. एका वर्षांत तब्बल ९९.६८ टक्के परतावा देणारा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया अपॉच्र्युनिटीज फंड याचे ठळक उदाहरण ठरेल. देशाच्या म्युच्युअल फंड उद्योगात, सर्वोत्तम परतावा देणाऱ्या लार्ज कॅप फंडाचा एका वर्षांचा परतावा ६९.१२ टक्के तर सर्वोत्तम लार्ज अँड मिड कॅपचा परतावा ७९.४० टक्के, मल्टीकॅपचा ७५.८८ टक्के, सर्वोत्तम मिडकॅप फंडांचा परतावा ८५.६९ टक्के त्या तुलनेत हा किती तरी सरस परतावा ठरतो.

नाव सूचित करते त्याप्रमाणे हा फंड ऊर्जा, दूरसंचार, औषध निर्माण, धातू, तेल आणि वायू या क्षेत्रातील भक्कम पाळेमुळे असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. ‘व्हॅल्यू रिसर्च’च्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१९ मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया अपॉच्र्युनिटीज फंडात १,००० रुपये गुंतवणूक केली असल्यास तिचे आजच्या घडीला मूल्य १,८५५ रुपये इतके वाढले आहे, तर याच कालावधीत ‘निफ्टी ५००’ निर्देशांकामधील गुंतवणुकीवर ३९.६ टक्के परतावा मिळाला असता.

एलआयसी म्युच्युअल फंडाचा बीएएफदाखल 

ठाणे : एलआयसी म्युच्युअल फंडने ‘एलआयसी एमएफ बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड (बीएएफ)’ गुंतवणुकीस खुला केला आहे. ही मूलत: एक संकरित (हायब्रिड) योजना असून समभाग संलग्न तसेच रोखेसंलग्न संतुलित प्रकारची गुंतवणूक तिच्याद्वारे मूलभूत आधारित गणितीय प्रतिमानाच्या आधारे अद्वितीयपणे केली जाईल. नवीन फंडाचे युनिट्स प्राथमिक विक्रीसाठी बुधवार, ३ नोव्हेंबपर्यंत खुले असतील. ‘एलआयसी एमएफ बीएएफ’मधून समभाग व स्थिर उत्पन्न अर्थात रोखेसंलग्न गुंतवणुकीसाठी इष्टतम मालमत्ता वाटप पातळी निश्चित करण्यासाठी आधारभूत गणिती प्रतिमानांचा वापर केला जाईल. मालमत्ता वाटपाच्या निकषांमध्ये व्याज दर, एक वर्ष पुढील किंमत/ उत्पन्न गुणोत्तर आणि रोख्यांचा परतावा यांचा वापर केला जाईल, अशी माहिती एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पांगटे यांनी दिली. या फंडाची कामगिरी ही ‘एलआयसी एमएफ हायब्रिड कम्पोझिट ५०: ५० निर्देशांका’वर बेतलेली असेल. ज्यात ५० टक्के वाटा निफ्टी निर्देशांकाचा तर ५० टक्के वाटा हा १० वर्षे मुदतीच्या जी-सेक निर्देशांकाचा अशी त्याची रचना आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून योगेश पाटील (समभाग गुंतवणूक) आणि राहुल सिंग (रोखे संलग्न गुंतवणूक) हे  काम पाहतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mutual fund investment in pharma healthcare fund zws

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या