फंडाचा ‘फंडा’..: निवृत्त जीवनासाठी नियोजन

तरुण वयातच तुम्ही निवृत्ती साठीच्या बचतीला सुरुवात करण्याचे बरेच फायदे आहेत

भालचंद्र जोशी bhalchandra.joshi@whiteoakindia.com

सध्याचे सामाजिक संक्रमणच असे की, ज्येष्ठांना निवृत्तीपश्चात जीवनमानाचा खर्च भागविण्यासाठी कमावत्या वयातील बचतीवरच प्रामुख्याने अवलंबून राहावे लागेल. मुलांची कितीही इच्छा असली तरी त्यांना पालकांची काळजी घेणे शक्य होईलच असे नाही.

सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी नियोजन हे विशेषत: चाकरमान्यांच्या जीवनाचे महत्त्वपूर्ण वित्तीय ध्येय असते. सेवानिवृत्ती नियोजनाचे आर्थिक उद्दिष्ट प्रामुख्याने निवृत्तीनंतर तुमच्या आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजांची पुरेशी तरतूद करणे होय. पुरेशा अर्थसाक्षरतेच्या अभावामुळे बरेच चाकरमानी सेवानिवृत्तीच्या नियोजनाला प्राथमिकता देत नाहीत अथवा नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात विविध अल्पकालीन वित्तीय ध्येयांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्ती नियोजनाची सुरुवात करतात. निवृत्तीनंतरचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर सेवानिवृत्ती नियोजनाचे महत्त्व जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

बदलत्या सामाजिक संक्रमणामुळे व त्यातून उद्भवलेल्या (एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे) आर्थिक अस्थिरतेमुळे आर्थिक स्रोत मर्यादित आणि केंद्रित झाले आहेत. जुन्या काळी एकत्रित कुटुंब पद्धतीत कुटुंबातील सदस्य ज्येष्ठांची संपूर्ण काळजी घेत असत. विभक्त कुटुंबांमध्ये ज्येष्ठ सदस्यांना त्यांचा निवृत्तीपश्चात जीवनमानाचा खर्च भागविण्यासाठी कमावत्या वयातील बचतीवर प्रामुख्याने अवलंबून राहावे लागणार आहे. जरी विभक्त कुटुंबातील मुलांना आपल्या पालकांची काळजी घ्यायची इच्छा असूनही ते शक्य होईलच असे नाही. उच्च शिक्षणासाठी काढलेले कर्ज, दोन वेगवेगळ्या घरांची देखभाल करण्यासाठी होणारा खर्च, बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला खर्च इत्यादीमुळे सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक स्वातंत्र्य जपण्यासाठी विभक्त कुटुंबांत निवृत्ती नियोजनाला प्राधान्य असले पाहिजे.

मुले कमावती होण्यापूर्वी त्यांचे उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमातील लांबलेले शिक्षण यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पालकांच्या होणाऱ्या खर्चात अतिशय वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला अनेक लोक शारीरिक क्षमतेमुळे ऐच्छिक किंवा अनैच्छिक सेवानिवृत्तीमुळे, अनारोग्यामुळे, आजारी असलेल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यास भाग पडल्यामुळे नियोजित सेवानिवृत्तीपूर्वी, सेवामुक्त होण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळे खर्चाचे नियोजन करताना सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी करायची बचत हा अविभाज्य घटक असायला हवा. जे नोकरदार वित्तीय नियोजकाची मदत न घेता स्वत: हे करीत असतील त्यांना हे कळकळीने सांगणे की, दीर्घायुष्य व महागाई हे वित्तीय नियोजनातील प्रमुख घटक आहेत. सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे आपल्याला किंवा कुटुंबीयांना महागाईमुळे वाढणाऱ्या खर्चाची तरतूद ही पहिल्या पगारापासूनच करणे अत्यंत आवश्यक आहे. निवृत्ती नियोजनातील वेगवेगळ्या आव्हानांमुळे चाकरमान्यांना अगदी लहान वयापासूनच हे नियोजन काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा ते त्यांच्या निवृत्ती कोषाचे लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही. तरुण वयातच तुम्ही निवृत्ती साठीच्या बचतीला सुरुवात करण्याचे बरेच फायदे आहेत. जसे की तरुण वयात कमी जबाबदाऱ्या असतात. वाढत्या वयासोबत कुटुंबातील वाढत्या सदस्यांबरोबर मुलांची शाळेची फी, गृह कर्ज, मुलांचे छंद वर्ग यामुळे एकूण मिळकतीतील बचतयोग्य रकमेचे असलेले प्रमाण घटते. जर तुम्ही या आधी सेवानिवृत्ती नियोजनाचा विचार केला नसेल तर आजच तुमचे सेवानिवृत्ती नियोजन करून घेण्याची योग्य वेळ आहे. लवकर निवृत्ती नियोजन केल्यास आपण केलेली गुंतवणूक वाढण्यास जास्त कालावधी हातात राहतो. निर्धारीत केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमी बचत करावी लागते. वयानुसार जोखीम सहिष्णुता कमी होत जाते. जोखीम आणि परतावा यांच्यातील थेट संबंधांमुळे तरुण वयातच सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू केले तर साहजिकच अधिक परतावा देणाऱ्या मालमत्तांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे दीर्घकाळात उच्च संपत्ती निर्माण करण्याची क्षमता तयार होते.

वयाच्या ३० व्या वर्षी मासिक ३० हजार असलेला खर्च महागाई दर ५ टक्के जरी गृहीत धरला तरी लक्षणीयरीत्या वाढत जातो. निवृत्तीच्या नियोजनात आपल्या मासिक खर्चावर चलनवाढीच्या दराच्या परिणामांचा विचार केला नसेल तर तुमच्या निवृत्ती नियोजनाचे ध्येय गाठण्यासाठी लागणारी रक्कम अर्थातच कमी पडेल. असे समजा की, आपण ३० वर्षांचे आहात आणि आपला मासिक खर्च ३० हजार रुपये आहे. आपण वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हाल आणि महागाईचा दर ५ टक्के गृहीत धरल्यास, आपल्या गरजा फारशा बदलल्या नाहीत तरी वयाच्या ६० व्या वर्षीचा मासिक खर्च १.२३ लाख रुपये, ७०व्या वर्षी २.०१ लाख रुपये आणि ८० व्या वर्षी ३.१२ लाख रुपये असेल.

भारतातील आरोग्याच्या सेवेत सुधारणा झाल्याने सरासरी आयुर्मान वाढले असून वैद्यकीय खर्चही महागाईच्या सरासरी दरापेक्षा अधिक दराने वाढत आहेत. आपले सेवानिवृत्तीचे नियोजन करतानादेखील आरोग्याशी संबंधित खर्चाची पुरेशी तरतूद केलेली असणे अत्यंत गरजेचे असते, कारण वाढत्या वयाबरोबर आरोग्यासंबंधी गुंतागुंत आणि त्यावरील खर्च वाढत असतो. आपण कमावते झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात सेवानिवृत्तीचे नियोजन तातडीने सुरू करावे आणि ते लवकर प्रारंभ करण्याच्या प्रमुख फायद्यांविषयी आज आपण चर्चा केली. आपण आपल्या सेवानिवृत्तीच्या नियोजनात, गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाच्या रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंडांचा विचार नक्कीच करू शकता. आपल्यासाठी सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यास आवश्यक असलेल्या बाबींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराची भेट लवकरात लवकर घ्यायला हवी.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mutual funds for retirement planning best retirement funds zws

Next Story
विमा विश्लेषण : एलआयसीची जीवनमित्र
ताज्या बातम्या