माझा पोर्टफोलियो : शेत सोन्यासारखे पिकवायचे तर..

कंपनीची उत्पादने प्रामुख्याने कृषी क्षेत्र तसेच गृह, औद्योगिक आणि बांधकाम व्यवसायात वापरली जातात.

अजय वाळिंबे
वर्ष १९८१ मध्ये स्थापन झालेली फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आज भारतातील पीव्हीसी – यू पाइप्स आणि फिटिंग्जमधील एक अग्रणी कंपनी असून, पीव्हीसी रेझिनचे उत्पादन करणारी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी उत्पादक कंपनी आहे. फिनोलेक्सचे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि पुण्यात तर गुजरातेत मसार येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून कंपनीची चिंचवड, कटक, दिल्ली आणि इंदूर येथे वितरण केंद्रे आहेत. देशभरात कंपनीची २१,००० हून अधिक विक्री दालने असून ९०० डिलर्स आहेत. पीव्हीसी कॉम्प्लेक्सचा एक भाग म्हणून, कंपनीने भारतीय खासगी क्षेत्रातील पहिलेच खुली सागरी क्रायोजेनिक जेटी रत्नागिरी येथे स्थापित केली आहे.

कंपनीची उत्पादने प्रामुख्याने कृषी क्षेत्र तसेच गृह, औद्योगिक आणि बांधकाम व्यवसायात वापरली जातात. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५१ टक्के उलाढाल पीव्हीसी व्यवसायातील असून सुमारे ४९ टक्के उलाढाल पाइप आणि फिटिंग्समधून आहे. पीव्हीसीची वार्षिक उत्पादन क्षमता २९,००० मेट्रिक टन असून पाइप आणि फिटिंग्सची क्षमता ३,७०,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी क्षेत्रातील युद्ध तसेच खनिज तेलाच्या किमती यांवर कंपनीच्या कच्च्या मालाच्या किमती अवलंबून असल्याने मध्यंतरीच्या काळात कंपनीच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. मात्र आता कच्च्या तेलाच्या किमती थोडय़ा बहुत वाढल्या असल्या तरीही स्थिर असल्याने पीव्हीसी रेझीनच्या उत्पादन खर्चात झालेली घट कंपनीच्या पथ्यावर पडेल. करोनाकाळातही कंपनीने आपली कामगिरी चांगलीच ठेवली. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ३,४६३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७३८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. यंदाच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत ७२ टक्के वाढ नोंदवून ती ९६६ कोटीवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल १५७ टक्के वाढ होऊन तो १४६ कोटींवर गेला आहे. गेल्या ४० वर्षांत कंपनीने आपल्या उत्पादन श्रेणीत मोठी वाढ केली असून शेतीच्या पीव्हीसी पाइपव्यतिरिक्त कंपनी केसिंग पाइप, कॉलम पाइप तसेच विविध प्रकारचे प्लंबिंग आणि सॅनिटेशन पाइप यांचे उत्पादन करते. तसेच कंपनी सॉल्व्हन्ट सीमेंट ल्युब्रिकंट आणि प्राइमरचे उत्पादन करते. कोविडपश्चात यंदाच्या आर्थिक वर्षांकरिता फिनोलेक्सकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असून अत्यल्प कर्ज असलेली फिनोलेक्स एका वर्षांत २५ टक्के परतावा देऊ शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड

(बीएसई कोड – ५००९४०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १६९/-

उच्चांक/ नीचांक : रु. १९९/९२

बाजार भांडवल : रु. १०,४७१ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १२४.१० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक     ५२.४७

परदेशी गुंतवणूकदार  २.८७

बँक/ म्यु. फंड/ सरकार ११.५६

इतर/ जनता ३३.१०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: My portfolio finolex industries industrial and construction industry ssh

ताज्या बातम्या