अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉकिन्स कूकर्सबद्दल खरं तर जास्त लिहायची गरज नाही. महिला वाचकांना तर या कंपनीच्या सर्वच उत्पादनांची इत्थंभूत माहिती असेल. १९५९ मध्ये स्थापन झालेली हॉकिन्स ही भारतातील किचनवेयर किंवा कूकवेअर उत्पादनांची एक जुनी आणि आघाडीची कंपनी आहे. इंग्लंडमधील एल. डी. हॉकिन्स यांच्या तांत्रिक सहकार्याने एच. डी. वासुदेव यांनी हॉकिन्सची स्थापना केली. कंपनी स्वयंपाकघरातील वस्तूंच्या उत्पादनाच्या व्यवसायात असून कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये त्याचे प्रमुख कूकवेअर म्हणजेच प्रेशर कूकर समाविष्ट आहेत; त्याच्या इतर कूकवेअर उत्पादनांमध्ये तवा, तळण्याचे पॅन, सॉसपॅन, कूक-एन-सव्र्ह बाऊल्स, हंडी, स्टय़ूपॉट इत्यादींचा समावेश होतो. कंपनीने गेल्याच वर्षी आपली ३९ नवीन उत्पादने तसेच काही उत्पादनांची नवीन मॉडेल्स प्रस्तुत केली होती. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर भारतातील प्रमुख ब्रॅंड असलेल्या हॉकिन्सचे प्रेशर कूकर्स आणि कूकवेअरच्या टॉप २० मॉडेल्समध्ये स्थान आहे. कूकर्स विभागात प्रस्थापित स्थान मिळवलेली ही कंपनी प्रेशर कूकर विभागातील आघाडीची उत्पादक असून कंपनी १३ वेगवेगळय़ा प्रकारातील कूकरचे ३०० विविध मॉडेल उत्पादित करते. कंपनीचे हॉकिन्स, फ्यूचर आणि मिस-मेरी हे प्रमुख ब्रॅंड असून भारतीय बाजारपेठेत त्यांचा २५ टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा आहे.

कंपनीच्या एकूण महसुलापैकी ७५ टक्क्यांहून अधिक महसुलाचे योगदान प्रेशर कूकरद्वारे येत असून इतर कूकवेअरचा २१ टक्के वाटा आहे. भारतीय बाजारपेठेत कूकवेअर क्षेत्रात संघटित क्षेत्राचा हिस्सा केवळ ६० टक्के असून असंघटित क्षेत्राकडून ४० टक्के हिस्सा व्यापला गेला आहे. कंपनीचे संपूर्ण भारतात वितरण जाळे असून, देशभरात ६,५०० हून अधिक डीलर्स आहेत.

कंपनीचे ठाणे (महाराष्ट्र), होशियारपूर (पंजाब) आणि जौनपूर (यूपी) असे तीन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीने अलीकडेच तिन्ही कारखान्यांमध्ये कूकवेअर इन-हाऊस बनवण्यास सुरुवात केली असून त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याची तिची योजना आहे. कंपनीचे प्रत्येक कारखाना स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनी नवीन उत्पादने बाजारात आणत आहेत.

यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीने समाधानकारक कामगिरी केली आहे. जून २०२२ अखेर समाप्त तिमाहीत कंपनीने उलाढालीत २९ टक्के वाढ साध्य करून ती १९७.७४ कोटींवर नेली आहे, तर या तिमाहीत नक्त नफ्यातदेखील ३५ टक्क्यांची वाढ होऊन तो २३.०७ कोटींवर गेला आहे. आगामी कालावधीतदेखील कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. गेली अनेक वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून भागधारकांना आता बक्षीस समभागांची अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता केवळ ५.२९ कोटी भागभांडवल असलेल्या आणि फक्त ०.४ बिटा असलेली हॉकिन्स एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोर्टफोलियोत असायला काहीच हरकत नाही.

हॉकिन्स कूकर्स लिमिटेड
(बीएसई कोड – ५०४४८६)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ५,८१०/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :
रु. ६,७५०/ ४,९३२

बाजार भांडवल : रु. ३,०७३ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : ५.२९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५६.०३
परदेशी गुंतवणूकदार ०.३१
बँका/ म्यु. फंड/ सरकार १७.०५
इतर/ जनता २६.६१

संक्षिप्त विवरण
शेअर गट : स्मॉल कॅप
प्रवर्तक : ब्रह्म वासुदेव
व्यवसाय क्षेत्र : प्रेशर कूकर
पुस्तकी मूल्य : रु. ४०३
दर्शनी मूल्य : रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश : १,५००%

शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : १६९.८ रु.
पी/ई गुणोत्तर : ३४.३
समग्र पी/ई गुणोत्तर : ४८.४
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.२०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २२.५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ५०.४
बीटा : ०.४

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My portfolio hawkins cookers readers england kitchenaway cookware company cookware amy
First published on: 26-09-2022 at 00:02 IST