scorecardresearch

माझा पोर्टफोलियो : नव‘तरुण’बाज साठीनंतरही !

गॅब्रिएल इंडिया ही सुप्रसिद्ध आनंद समूहाची फ्लॅगशिप कंपनी आहे.

माझा पोर्टफोलियो : नव‘तरुण’बाज साठीनंतरही !

अजय वाळिंबे
सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

गॅब्रिएल इंडिया ही सुप्रसिद्ध आनंद समूहाची फ्लॅगशिप कंपनी आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी केवळ एक उत्पादन असणाऱ्या या कंपनीने काळानुसार बदलत्या बाजारपेठेनुसार, बदलत्या तांत्रिक आणि सामाजिक नवप्रवाहांच्या अनुषंगाने स्वत:ला बदलले आहे. गॅब्रियल इंडिया ही राइड कंट्रोल उत्पादनांची आघडीची आणि मोठी उत्पादक असून आज कंपनी या उत्पादन श्रेणीत ३०० हून अधिक मॉडेल्स बनवते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये शॉक अॅब्झॉर्बर्स, स्टट्र्स, फ्रंट फोर्क्स आदींचा समावेश होतो. २०२५ पर्यंत जगातील पहिल्या पाच शॉक ॲब्झॉर्बर्स उत्पादकांमध्ये स्थान मिळवण्याची कंपनीची मनीषा आहे. भारतामध्ये कंपनीच्या हरयाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट् अशा सहा राज्यांत ७ उत्पादन प्रकल्प असून कंपनी महाराष्ट्रातील चाकण आणि नाशिक तसेच तामिळनाडूमधील होसूर येथील संशोधन आणि विकास केंद्रांमधून तिचे आर अँड डी उपक्रम राबवते. गॅब्रियलने आतापर्यंत २५ पेटंटसाठी अर्ज दाखल केले आहेत. कंपनीचे तिच्या विविध उत्पादनांसाठी यामाहा मोटर हायड्रॉलिक सिस्टीम (जपान), केवायबी कॉर्पोरेशन (जपान), कोनी बीव्ही (नेदरलँड) यांच्याशी तांत्रिक सहयोग आहे. विपणन आणि वितरण सेवेसाठी कंपनीचे उत्तम नेटवर्क असून विक्री-पश्चात सेवेसाठी कंपनी आपल्या ११ एजंट्स, ६६४ डीलर्स आणि संपूर्ण भारतातील १२,००० रिटेल आउटलेट्सचा उपयोग करते.

कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये बजाज, मिहद्र, होंडा, पियाजिओ, रॉयल एनफिल्ड, मारुती सुझुकी, यामाहा, रेनॉ, स्कोडा, फोक्सवॅगन, अशोक लेलँड, डायम्लर, इसुझू आणि भारतीय रेल्वे समाविष्ट आहेत. कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठीदेखील उत्पादने करीत असून यामध्ये ओकिनावा, इथर, अॅम्पीयर तसेच हीरो इलेक्ट्रिकचा समावेश आहे. कंपनीच्या बाजार हिश्शामध्ये दुचाकी आणि तीनचाकी २५ टक्के, प्रवासी वाहने १८ टक्के, वाणिज्य वाहने, रेल्वे – ७५ टक्के, तर आफ्टरमार्केट सेवेतील हिस्सा ४० टक्के आहे. गॅब्रियलच्या एकूण महसुलात निर्यातीचा वाटा केवळ ४ टक्के असला तरीही आगामी कालावधीत कंपनी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील आफ्टर मार्केटमध्ये उपस्थिती वाढवण्यावर ती भर देत आहे.

कंपनीचे जून २०२२ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या कालावधीत कंपनीने ७२७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३ कोटींचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अधिक आहेत. गेल्या ६० वर्षांत गॅब्रियलने नेत्रदीपक कामगिरी करून आपल्या भागधारकांना भरपूर फायदा करून दिला आहे. काळाप्रमाणे आवश्यक बदल करणाऱ्या या कंपनीचा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुमच्या पोर्टफोलिओत असायला काहीच हरकत नाही.

गॅब्रियल इंडिया लिमिटेड
(बीएसई कोड – ५०५७१४)
शुक्रवारचा बंद भाव : रु. १४२/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. १६८/१०२

बाजार भांडवल : रु. २०३६ कोटी
भरणा झालेले भागभांडवल : रु. १४.३६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५५.००

संक्षिप्त विवरण
शेअर गट : स्मॉल कॅप
प्रवर्तक : आनंद समूह
व्यवसाय क्षेत्र : ऑटो ॲन्सिलरी
पुस्तकी मूल्य : रु. ५३.४
दर्शनी मूल्य : रु. १/-
गतवर्षीचा लाभांश : ९०%
परदेशी गुंतवणूकदार १.३८
बँका/ म्यु. फंड/ सरकार ९.२६
इतर/ जनता ३४.३६

शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : ७.६९ रु.
पी/ई गुणोत्तर : १८.४
समग्र पी/ई गुणोत्तर : १९.९
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४२.५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १७.६
बीटा : ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या